महीमंडणगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : सातारा
उंची : ३०७० फुट
श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रात आजही असे काही किल्ले आहेत जे त्यांच्या भौगोलिक स्थांनामुळे दुर्गम आहेत. या गडावर जाण्याचे मार्ग हे अडचणीचे व दाट जंगलातून जात असल्यामुळे या गडांवर आजही दुर्गप्रेमींचा फारसा वावर नाही. कोयना धरणाचा जलाशय व या भागातील व्याघ्रप्रकल्पामुळे परिसरात असलेले किल्ले त्यांच्याभोवती असलेल्या दाट जंगलांमुळे आपले अस्तित्व हरवुन बसले आहेत. जंगली जयगड, मकरंदगड,महिमंडणगड हि त्याचीच काही उदाहरणे. पण किल्ला आहे म्हटल्यावर तिथे जायलाच हवे. महिमंडणगड हा या दाट जंगलात हरवलेला असाच एक दुर्गम किल्ला.सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी सोयीचा मार्ग मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथुन जातो. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या दिशेने जाताना भरणे नाक्यानंतर शिरगाव खोपी फाटा लागतो. शिरगाव व खोपी या गावातून रघुवीर घाटमार्गे मेटशिंदी या महिमंडणगडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते.
...
खासगी वाहन हा येथे जाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. याशिवाय मेटशिंदी गावापुढे असलेल्या आरव गावापर्यंत जाण्यासाठी खेड बसस्थानकातुन संध्याकाळी ५ वाजता मुक्कामी बस आहे. हि बस सकाळी ७ वाजता तिथुन मागे फिरते. घाट फारसा वापरात नसुन जीपसारख्या वाहनाने जाण्यासारखा आहे. खेड -खोपी अंतर २० कि.मी. असुन पुढील घाटरस्ता १५ कि.मी.आहे. रत्नगिरी-सातारा सीमेवरील खिंडीकडील भागात साधारण २ कि.मी. कच्चा मातीचा रस्ता असुन पुढे मात्र पक्का रस्ता आहे. याशिवाय बामणोली, तापोळे येथुन बोटीने या भागात येता येते. पण पाण्याच्या कमी होत जाणाऱ्या पातळीचा बोट सेवेवर परिणाम होतो व तिचा येण्याचा थांबा रोज बदलत राहतो. त्यामुळे हा मार्गही तितकासा सोयीचा नाही. याशिवाय खेड जवळील आंबिवली गावी येऊन तेथुन चकदेव डोंगर चढुन पुन्हा खाली उतरून महिमंडणगडकडे जाता येते पण हा मार्ग दिवसभराचा व अतिशय थकवणारा आहे. रघुवीर घाटाने माथ्यावरील खिंडीत आल्यावर या ठिकाणी वनखात्याची चौकी आहे. महिमंडणगड वनखात्याच्या अखत्यारीत असल्याने गडावर जाण्यासाठी येथे प्रती माणसी व वाहनाचे प्रवेशशुल्क भरावे लागते. येथुन कच्च्या रस्त्याने दोन वळणे पार करून साधारण ५०० फुट खाली गेल्यावर रस्त्याच्या उजवीकडे वर चढणारी पायवाट आहे. या ठिकाणी कातळा वरील दिशादर्शक लहान बाण वगळता कोणतीही खुण नाही. आम्ही वनखात्याकडे प्रवेशशुल्क जमा करताना या ठिकाणी फलक लावण्याची सुचना केली आहे व त्यांनी लवकरच फलक लावण्याचे आश्वासन देखील दिले आहे. होईल तेव्हा खरे? याशिवाय वनखात्याने गडावर गवा अथवा अस्वल असण्याची शक्यता वर्तवून सावधपणे फिरण्याचा सल्ला दिला. मेटशिंदी गावातुन आल्यास दोन लहान डोंगरावर वसलेल्या गडाचे संपुर्ण दर्शन होते. या गावातुन गडाकडे जाताना प्रथम दगडी पुल लागतो व त्यानंतर दोन वळणे पार केल्यावर डावीकडे गडावर जाणारी वाट दिसते. या वाटेने गड चढायला सुरवात केल्यास १० मिनिटात आपण खालील सपाटीवर असलेल्या एका समाधीजवळ येतो. घडीव दगडात बांधलेल्या या समाधीवर नक्षीदार चौथरा असुन त्यावर तुळशी वृंदावन आहे. या वृंदावनावर दिवा लावण्याची सोय केलेली आहे. समाधीचा आकार पहाता हि समाधी एखाद्या मोठया वीराची असावी पण सध्यातरी हा वीर अनामिक आहे. येथुन उजवीकडे जंगलातुन गडावर जाणारी वाट आहे. वनखात्याने हि वाट व्यवस्थित केली असुन वाटेवर काही ठिकाणी प्राणी गणनेसाठी कॅमेरे बसवलेले आहेत. जंगलातुन जाणारी हि वाट पुढे कारवीच्या रानात बाहेर पडते व समोरच गडाच्या जोडशिखरांमध्ये असलेली खिंड नजरेस पडते. या वाटेने खिंडीकडे जाताना काही ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात. पायथ्यापासुन इथपर्यंत येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. खिंडीत आल्यावर उजवीकडील बाजुस आपल्याला गडाची तटबंदी व त्यापुढे एक बुरुज पहायला मिळतो. या ठिकाणी गडाचा दरवाजा असावा पण आज त्याचे काहीही अवशेष पहायला मिळत नाहीत. खिंडीच्या या भागात काही प्रमाणात सपाटी असुन येथे एक उध्वस्त चौथरा पहायला मिळतो. खिंडीच्या दोन्ही बाजुच्या उंचवट्यावर गड पसरलेला असुन गडाचे अवशेष केवळ डाव्या बाजुस असल्याने सर्वप्रथम त्या बाजुस चढाई करायची. येथुन वर जाताना डावीकडे दरीच्या काठावर कशीबशी तग धरून असलेली मातीत गाडलेली तटबंदी दिसते. या तटाला लागुन कातळात कोरलेले पण मातीने भरलेले एक मोठे टाके आहे. गडाला नैसर्गीक तटबंदी लाभल्याने दरवाजा कडील भाग वगळता वेगळी तटबंदी करण्याची गरज भासली नसावी. पुढे वाटेच्या डाव्या बाजुस एक लहानसे गुहाटाके आहे. गडमाथा फारच कमी उंचीवर असल्याने दरवाजातुन पाच मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडाचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडमाथा समुद्रसपाटीपासून २७९० फुट उंचीवर साधारण ६ एकरात सामावला आहे. या भागात कातळात कोरलेल्या लहानमोठया ११ पाण्याच्या टाक्यांचा समूह असुन यातील बहुतांशी टाकी गाळाने भरलेली आहेत. यातील केवळ दोन टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. यातील एका टाक्यावर शिवपुजा करणाऱ्या व्यक्तीचे शिल्प कोरले असुन एका बाजुस चामरधारी तर दुसऱ्या बाजुस सेवक कोरलेला आहे. टाक्याच्या पुढील भागात छप्पर उडालेले मंदिर असुन या मंदिरात घोड्यावर बसलेली काळ्या पाषाणातील भैरवमुर्ती व पितळी मुखवटा असलेली भवानी मातेची मूर्ती आहे. मे महिन्यात या भैरी भवानीची जत्रा असते. मंदिराशेजारी व मागे गवतात लपलेले चौथरे पहायला मिळतात. याशिवाय या भागात इतर कोणतेही अवशेष नसल्याने गडाच्या दुसऱ्या उंचवट्याकडे निघायचे. गडाच्या दक्षिण टोकावर एका बुरुजाचे अवशेष असुन येथुन रघुवीर घाटाचे सुंदर दर्शन होते. या माथ्यावरील झाडीत एक-दोन लहान चौथरे वगळता कोणतेही अवशेष दिसत नाही. येथुन प्रवेश केलेल्या ठिकाणी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गडाचा परिसर फारसा नसल्याने संपुर्ण गडफेरी करण्यास पाउण तास पुरेसा होतो. या गडावर आम्हाला झाडाखाली निवांत बसलेल्या गव्याचे दर्शन झाले त्यामुळे भटकंती सावधपणे करावी. गडावरून रघुवीर घाट,वासोटा किल्ला, चकदेव, पर्वत व दूरवर पसरलेले जावळीच्या खोऱ्यातील जंगल नजरेस पडते. गडावरील खांबटाके पहाता हा किल्ला शिवकाळापुर्वी अस्तित्वात असावा. शिवकाळात व नंतरही या किल्ल्याचे फारसे उल्लेख येत नाही पण गडाचा आकार पहाता याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा.
© Suresh Nimbalkar