भोवरागड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : गडचिरोली
उंची : ११६० फुट
श्रेणी : मध्यम
नावातच गड असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक गड आहेत पण त्यातील सुरजागड,वैरागड यासारखे एक दोन गड वगळता इतर गड कोणालाच माहीत नाही. आजवर येथे पसरलेला नक्षलवाद व या दुर्गांचा आधार घेणारे नक्षलवादी हे जरी त्यामागचे कारण असले तरी सरकार दरबारी नसलेली या गडांची नोंद व सर्वच पातळीवर असलेली या गडांबद्दलची अनास्था याला कारणीभूत आहे. आजवर नक्षलग्रस्त प्रांत म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या भागात भटक्यांची व अभ्यासकांची पाउले वळलीच नसल्याने हे दुर्ग स्वतःची ओळख हरवुन बसले आहेत. या भागातील नक्षलवाद आता ओसरला असला तरी दुर्गप्रेमींची या भागात भटकंती होताना दिसत नाही. विदर्भाचा हा भाग विरळ लोकवस्तीचा असल्याने या भागात खाजगी प्रवासी वाहने देखील फारशी दिसत नाही. त्यामुळे या भागातील दुर्गांची भटकंती करताना प्रवास व सुरक्षा या दोन्हीच्या दृष्टीने खाजगी वाहनाचा वापर करावा अन्यथा एका दिवसात एक किल्ला पहाणे देखील कठीण आहे. धानोरा या तालुक्याच्या ठिकाणाहुन जवळच भोवरागड नावाचा गड असल्याचे वाचनात आल्याने आम्ही आमच्या गडचिरोली दुर्ग मोहिमेत या दुर्गाची वारी करण्याचे ठरवले.
...
धानोरा हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण गडचिरोली शहरापासुन ३६ कि.मी अंतरावर असुन धानोरा येथुन सोडे गावात जाण्यासाठी फाटा आहे. सोडे गावाकडे जाताना वाटेवर साधारण ३ कि.मी. अंतरावर मुलींसाठी सरकारी आश्रमशाळा आहे. या शाळेकडूनच भोवरागड कडे जाणारा कच्चा रस्ता आहे. याशिवाय धानोरापुढे असलेल्या लेखामेंढा गावाकडुन राजोली गाव व तेथुन कच्चा रस्त्याने भोवरागडच्या पायथ्याशी पोहोचता येते, पण हे अंतर जास्त आहे. आश्रम शाळेकडून जाणारा कच्चा रस्ता व राजोली गावाकडून येणारा कच्चा रस्ता एकच असुन या रस्त्यावरून भोवरागडच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिराकडे जाण्यासाठी फाटा आहे. या मंदिराकडे जाण्याचा मार्ग दर्शविणारा फलक म्हणजे विजेच्या खांबावर असलेले दिशादर्शक बाण. भोवरागड या भागात पसिद्ध आहे तो या गडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिरामुळे. किल्ला दुरून सहजपणे दिसत असला तरी किल्ल्याच्या परीसरात वस्ती नसल्याने व कच्चा रस्ता दाट जंगलातुन जात असल्याने बाजुच्या गावातील स्थानिक वाटाड्या सोबत घ्यावा. कच्च्या रस्त्यावरून आत शिरलेल्या फाट्यावरून साधारण अर्ध्या तासात आपण भोवरागडच्या पायथ्याशी पोहोचतो. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरत असल्याने पायथ्याशी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी हातपंप बसवलेला असुन इतरही बांधकाम आहे. येथून शिवमंदीराकडे जाण्यासाठी सिमेंटमध्ये पायऱ्या बांधलेल्या आहेत. या वाटेने चढण्यास सुरवात केल्यावर अर्ध्या तासात आपण शिवमंदिराकडे पोहोचतो. या मंदिराकडूनच गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट असल्याचे लिहिलेले आम्ही वाचले होते पण मंदिर परीसरात दाट झाडी असुन कोठेही वाटेचा मागमुस लागला नाही. आम्ही धानोरा येथुन थेट गडाकडे आल्याने वाटाड्या घेता आला नाही व ती आमची मोठी चुक ठरली होती. आम्हाला शिवमंदीर पाहुन तेथुन मागे फिरावे लागले. आमची हि दुर्गवारी अर्धवट झाल्याने भोवरागड हा किल्ला आहे कि नाही याची निश्चिती होऊ शकली नाही पण स्थानिकांमध्ये त्याची ओळख मात्र किल्ला म्हणूनच आहे. गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या इतर अनेक वनदुर्गांप्रमाणे भोवरागडचे किल्ला म्हणून कुठलेही संदर्भ वा माहिती उपलब्ध नाही. विदर्भातील हा किल्ला कोणाला परीचीत नसल्याने किल्ल्याचा इतिहास अबोल आहे पण गोंड राजसत्तेचा या भागावर असलेला प्रभाव पहाता हा किल्ला गोंड राजांनी बांधला असावा असे वाटते. गौंड राजांच्या अखत्यारीतील हा किल्ला आज आपली ओळख हरवुन बसला आहे. देवगड भागातुन आलेल्या गोंड राजांनी विदर्भातील गोंडवानात प्रवेश करताना जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला असल्याचे स्थानिक सांगतात. किल्ल्यावर जाणारी वाट मंदिराकडून असुन पुजारी वगळता इतर कोणीही गडावर जात नसल्याचे त्यांनी सांगीतले. भोवरागडचे इतिहासात नाव नसले तरी काही कागदपत्रात राजोरी येथे किल्ला असल्याचे वाचनात येते. भोवरागड किल्ला राजोली गावापासुन जवळच असुन लेखामेंढा येथील किल्ला देखील त्याच अंतरावर आहे. त्यामुळे राजोली येथील नेमका किल्ला कोणता हे ठामपणे सांगता येत नाही.
© Suresh Nimbalkar