भोरवाडी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : अहमदनगर

उंची : २८०२ फुट

श्रेणी : सोपी

सह्याद्रीची मुख्य रांग सोडुन अहमदनगरच्या दिशेने जाताना उंच उंच डोंगराऐवजी अनेक लहानमोठ्या टेकड्या दिसुन येतात. पारनेर तालुक्यातील अशाच एका मध्यम आकाराच्या टेकडीवर वसलेला दुर्ग नाशिकचे दुर्गप्रेमी सुदर्शन कुलथे यांनी अलीकडील काळात (२०२०) प्रकाशात आणला. गडाचे मुळ नाव अज्ञात असल्याने त्याला गडाच्या एका पायथ्याशी असलेल्या भोरवाडी गावाचे नाव देण्यात आले. गडाच्या दुसऱ्या बाजुस म्हसोबा झाप हे मुख्य गाव असुन या गावातुन खाजगी वाहन कण्हेरवाडी मार्गे थेट गडाच्या पायथ्याशी जात असल्याने तेथुन गडावर जाणे जास्त सोयीचे आहे किंबहुना हाच गडावर जाण्याचा राजमार्ग आहे असे म्हणता येईल. म्हसोबा झाप हे गाव आळेफाटा-राजुरी-बेल्हेमार्गे ४० कि.मी. अंतरावर असुन अहमदनगर शहरापासुन टाकळी ढोकेश्वर मार्गे ६२ कि.मी. अंतरावर आहे. गडाच्या माथ्यावर माऊलाई देवीचे स्थान असुन स्थानिक भाविकांची तेथे ये-जा असल्याने वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. स्थानिक लोक या टेकडीला चुचुळा नावाने ओळखतात. गडाच्या पायथ्याशी दुरून नजरेत भरणारा पत्र्याचा निवारा असुन तेथूनच गडावर जाणारी वाट आहे. या वाटेने सुरवात केल्यावर १० मिनीटात आपण गडाची टेकडी व त्या शेजारी असलेली टेकडी यामधील घळीत येतो. येथे वाट डावीकडे वळुन गडाच्या चढाईस सुरवात होते. ... वाटेच्या सुरवातीस झीज झालेल्या पायऱ्या असुन त्याच्या वरील भागात कातळात अर्धवट कोरलेला दरवाजा व पायऱ्या आहेत. या दरवाजाशेजारी तटबंदीसाठी रचलेले काही घडीव दगड दिसुन येतात. या बांधकामाच्या आसपास काही प्रमाणात दगड फोडण्यासाठी कोरलेले खळगे दिसुन येतात. हे खळगे व येथील अवशेष पहाता हे बांधकाम काही कारणास्तव अपुरे राहीले असावे असे वाटते. येथुन समोरील मातीचा चढ चढुन आपण गडाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचतो. या ठिकाणी माऊलाई देवीचा तांदळा असुन त्याची मुर्ती स्वरूपात हळद-कुंकू व बांगड्या वाहुन पुजा केली जाते. या ठिकाणी किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची २८०२ फूट आहे. या भागातील हि उंच टेकडी असल्याने व आसपास मोठ्या प्रमाणात सपाटी असल्याने येथुन खुप मोठा परीसर नजरेस पडतो. येथुन आपल्या उजवीकडे म्हणजे गडाच्या पुर्व बाजुस पहिले असता उतारावर कातळात कोरलेली पाण्याची दोन टाकी दिसुन येतात. उतारावरून या टाक्यापर्यंत सहजपणे जाता येते. या दोन्ही टाक्यांची लांबीरुंदी २० x ८ फुट असुन यात पाणी असले तरी वापर नसल्याने ते पिण्यायोग्य नाही. येथुन पुन्हा वर न जाता सपाटीवरून उत्तरेकडे म्हणजे दरवाजाच्या दिशेने निघाले असता अजुन एक बुजलेले टाके पहायला मिळते. गडाच्या माथ्यावर अथवा सपाटीवर बांधकामाचे इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. गडाचे मूळ नाव अज्ञात असल्याने त्याचा इतिहास देखील अज्ञातच आहे. भोरवाडीचा किल्ला अहमदनगर, संगमनेर व जुन्नर या शहरांना जोडणाऱ्या मार्गाच्या मध्यवर्ती भागात असुन गडाचे एकंदरीत भौगोलिक स्थान व त्यावरील अवशेष पहाता याचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा. पायथ्यापासुन किल्ला पाहुन परत जाण्यास एक तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!