पुर्णगड
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : रत्नागिरी
उंची : 0
श्रेणी : सोपी
रत्नागिरीपासून २५ कि..मी.अंतरावर तर पावसपासून ८ कि.मी. अंतरावर मुचकुंदी नदीच्या मुखाशी पुर्णगड हा लहानसा किल्ला उभारलेला आहे. स्थानिकांच्या मते पूर्णविरामाच्या आकाराचा लहानसा किल्ला म्हणून याचे नाव पुर्णगड तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड. पण प्रत्यक्षात या किल्ल्याची बांधणी शिवकाळात झालेली नसुन अठराव्या शतकात पेशवेकाळात झालेली असल्याने या दंतकथेला इथेच पूर्णविराम मिळतो. मुचकुंदी नदीच्या खाडीपात्रातुन होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व त्याचे संरक्षण करण्यासाठी मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर असलेल्या टेकडीवर पेशवेकाळात पूर्णगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला. पुर्णगड येथे मुचकुंदी नदीवर पुल बांधण्यात आलेला असुन हा पूल पुर्णगडहून गावखडी या गावास जोडण्यात आलेला आहे. या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे.
...
पुर्णगड गावातूनच पाय-यांची छोटी वाट गडाकडे गेली आहे. पायऱ्यांच्या या वाटेने गडावर जाण्यासाठी १० मिनिटे लागतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारासामोरच तटाला लागुनच एक भले मोठे टाके खोदलेले आहे पण सद्यस्थितीत ते कोरडे आहे. या टाक्यामुळे एकप्रकारे दरवाजासमोर खंदक निर्माण झाला असुन दरवाजाला व तटाला अतीरिक्त सरंक्षण लाभलेले असुन या टाक्यातून निघालेला दगड बांधकामासाठी वापरलेला आहे. गडाचा हा वळणदार मुख्य दरवाजा दोन बुरुजांमध्ये लपवलेला असुन दरवाजाबाहेर डाव्या बाजुस असलेल्या मंदिरात मारूतीची भव्य मुर्ती आहे. दरवाजाच्या कमानीवर गणेशाचे शिल्प असुन आजुबाजुला सूर्य व चंद्र कोरले आहेत पण हे बांधकाम जांभा दगडात केले असल्याने या शिल्पांची मोठया प्रमाणात झीज झाली आहे. किल्ल्याची तटबंदी जांभ्या दगडाची असून आजही भक्कम अवस्थेत आहे. गडाला एका मागोमाग एक असे दोन दरवाजे असुन या दोन दरवाजांच्या मधील भागात पहारेकर्यांअच्या देवडय़ा आहेत. हे दोन दरवाजे पार करून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. दुसऱ्या दरवाजाच्या बाहेरील बाजुस भिंतीवर दगडात कमळे कोरलेली आहेत. किल्ल्यात आल्यावर एका नजरेतच संपुर्ण किल्ला दृष्टीस पडतो. आयताकृती आकार असलेला व पुर्वपश्चिम पसरलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीत एकुण सात बुरुज असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण पाउण एकर आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर चढण्यासाठी एकुण चार ठिकाणी जिने असुन दरवाजाशेजारी असणाऱ्या जिन्याने फांजीवर चढुन संपुर्ण गडाला फेरी मारत गडातील वास्तु अवशेष पहाता येतात. गडाच्या मुख्य दरवाजासमोर एक चौथरा असुन या चौथऱ्याच्या मागील बाजुस किल्ल्याचा समुद्राकडील बाजूस उघडणारा दुसरा लहान दरवाजा आहे. या दरवाजाशेजारील तटबंदी बाहेरील बाजुने काही प्रमाणात ढासळली आहे. गडाच्या तटबंदीवरून आतील भागात विखुरलेले ब-याच वास्तूंचे अवशेष दिसतात. यामध्ये घरांचे चौथरे, सदर, कोठारांचे अवशेष, एक समाधी वृंदावन अशा वास्तू दिसून येतात. विशेष म्हणजे किल्ल्यातील शिबंदीला पाणीपुरवठा करण्यासाठी संपुर्ण किल्ल्याच्या आवारात एकही पाण्याचे टाके किंवा विहीर दिसुन येत नाही. जी एक विहीर आहे तीपण किल्ल्याबाहेर व बुजलेली आहे. किल्ल्याच्या तटाबुरुजावर बंदुका व तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या व खिडक्या आहेत पण गडावर एकही तोफ दिसुन येत नाही. तटबंदीवर फेरी मारत परत मुख्य प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. अतिशय दाट झाडी, मुचकुंदी नदीचे पात्र, फेसाळणारा समुद्र आणि टेकडीवर उभा असलेला पुर्णगड असे निसर्गसौंदर्य असलेल्या या पुर्णगडला एकदा तरी भेट दयायला हवी. किल्ल्याचा थोडक्यात इतिहास म्हणजे नानासाहेब पेशवे यांच्या कालखंडात म्हणजेच पेशवेकाळात आनंदरराव धुळप यांनी या किल्ल्याची बांधणी केली व या बांधकामाच्या खर्चासाठी चिपळूणचे ब्रम्हेंद्रस्वामी यांनी पैसे पुरवले अशी नोंद पेशवे दफ्तरात आढळते. १८६२ च्या एक नोंदीनुसार किल्यावर ७ तोफा आणि ७० तोफगोळे असल्याची माहीती मिळते पण सध्या गडावर एकही तोफ नाही.
© Suresh Nimbalkar