पद्मदुर्ग
प्रकार : जलदुर्ग
जिल्हा : रायगड
उंची : 0
श्रेणी : कठीण
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा किल्ला मुरूड गावाजवळील भरसमुद्रात आजही मराठयांच्या पराक्रमाची गाथा सांगत ताठ मानेने उभा उभा आहे. रायगड जिल्ह्यामधील मुरूड या तालुक्याच्या गावात जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत. मुरुड-जंजिरा या जलदुर्गामुळे हे गाव पर्यटकात चांगलेच प्रसिध्द आहे. मुरुडला जाण्यासाठी अलिबाग रेवदंडा मुरुड असा एक गाडीमार्ग आहे. मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनाऱ्यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी होडीवाल्याकडे चौकशी केल्यास यातील एखादी होडी आपल्याला पद्मदुर्ग किल्ल्याकडे घेवून जावू शकते. सागराची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार पद्मदुर्गकडे येण्यासाठी तयार होतात. एकदऱ्यापासून किंवा मुरुडहून बोटीने अर्ध्यातासात पद्मदूर्ग जवळ पोहचता येते. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर " पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजपुरी केली आहे".
...
असा हा सुंदर किल्ला एकदा तरी पहावा असा आहे. पद्मदुर्ग किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र आजही पुर्णपणे शिल्लक आहे. बोटीने पद्मदुर्ग व त्याचा पडकोट यामध्ये उतरता येते. पद्मदुर्ग पडकोटाचा वैशिष्ट्यपुर्ण कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज दूरुनच आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्याची तटबंदी उंच व मजबूत असून साधारण ६० फुट अंतराने त्यावर सहा बुरूज आहेत. मूळच्या तटबंदीच्या बाहेर सागराच्या बाजूला संरक्षणासाठी आणखी एक अर्धवट तटबंदी आहे. बेटावरील खडकाच्या आकारानुसार दुर्ग बांधल्यामुळे किल्ल्याचा आकार उंच-सखल वाटतो बोटीतून उतरल्यावर प्रथम डाव्या हाताचा असणारा पडकोट पाहून घ्यावा. पडकोटच्या उध्वस्त दरवाजातून आत आल्यावर डाव्या हाताला भग्न वास्तूचे अवशेष दिसतात. तिथून पुढे गेल्यावर आपण पद्मदुर्ग वरील वैशिष्ट्यपुर्ण अशा बुरुजावर जातो. या बुरुजाच्या चर्याना कमळाच्या पाकळ्यासारखा आकार दिलेला आहे. त्यामुळेच या किल्ल्याचे नाव ‘ पद्मदूर्ग’ पडले असावे. या बुरुजाच्या आत तटबंदीत कोठार आहे. बुरुजात सर्व दिशांना तोफा ठेवण्यासाठी झरोके केलेले आहेत. आजही त्यातील तीन तोफा असून त्यांचा रोख समुद्रावर व गडप्रवेशाच्या मार्गावर आहे बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीमध्ये संडास आहे. पडकोटच्या तटबंदीची उंची समुद्रतटापासून २५ फूट असावी. आता समुद्राच्या लाटांच्या माऱ्याने तटबंदीची झालेली पडझड व किल्ल्यात साठलेल्या वाळूमूळे तटबंदीतील जिने, फांजी झाकले गेले आहेत. तटबंदीवरुन पडकिल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते. प्रदक्षिणेत तटबंदीवर व किल्ल्याच्या आत जागोजागी पडलेल्या तोफा दिसतात. याशिवाय तटबंदीला लागून असलेली पडकी वास्तू , दोन हौद व त्यामधील थडगे दृष्टीस पडतात. पडकोटची उत्तरेकडील तटबंदी ढासळलेली असून त्याच्या मुख्य किल्ल्याकडील टोकाला एका पडक्या वास्तूचे अवशेष आहेत. पडकोटच्या सध्या शाबूत असलेल्या तटबंदीच्या बाहेर समुद्राच्या बाजूने तटबंदीचा अजून एक घेर पूर्वी होता. आता त्यापैकी थोडेच अवशेष शिल्लक आहेत. पश्चिमेला एका बुरुजाचे अवशेष शिल्लक आहेत त्यावरुन पद्मदूर्गच्या पडकोटाचे विहंगम दृश्य दिसते. पडकोटच्या समोरच पद्मदुर्गचा मागील दरवाजा आहे. या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करता येतो किंवा उजव्या बाजूने किल्ल्याला वळसा घालून मुख्य दरवाजाने किल्ल्यात जाता येते. किल्ल्याच्या मुख्य बुलंद प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी १० पायऱ्या चढून जावे लागते. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दोन बुरुज आहेत. या ३० फूट उंच बुरुजात तोफा ठेवण्यासाठी झरोके व जागोजागी जंग्या आहेत. तसेच बाजूच्या तटबंदीत असलेल्या जंग्याचा व तोफांचा रोख प्रवेशद्वारावर आहे. पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळते ते म्हणजे बांधकाम साहित्यात वापरलेला चुना. दोन घडीव दगड एकमेकांवर ठेवताना खालच्या व बाजूच्या दरवाजांमध्ये वापरलेलं हे ‘सिमेंटिंग मटेरियल’ इतकं भक्कम आहे की सुमारे १६७० च्या आसपास म्हणजे ३२५-३५० वर्षापूर्वी काळ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याचे दगड समुद्र लाटा, पाऊस व ऊन यामुळे सुमारे ४ इंच झिजलेत, पण चुना तसाच राहिल्याने चुन्याच्या पट्टय़ा वर आलेल्या दिसतात.शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला काही वास्तूंचे अवशेष दिसतात. त्यांच्या पूढे पावसाळी पाण्याचे साठवणीचे तीन हौद आहेत. हौदांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. हौदाच्या मागे बुरुजात/तटबंदीत दोन कोठ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या समोरच तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याने वर गेल्यावर ५ फूटी प्रशस्त फांजी लागते. या फांजीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते. फांजीवरुन मागच्या दारकडे (पडकोटच्या दिशेला) जाताना वाटेत तटबंदीत जागोजागी जंग्या दिसतात. तसेच तटबंदीच्या आतील बाजूस किल्ल्यात पडलेल्या अनेक तोफा आढळतात. मागील दारच्या बाजूला असलेल्या बुरुजांना तोफेसाठी सर्व दिशांना झरोके आहेत. या झरोक्यातून पडकोटच्या कमळ (पद्म) बुरुजाचे अप्रतिम दृश्य दिसते. या दरवाज्या जवळच तटबंदीला लागून अनेक वास्तूंच्या भिंती एका रेषेत आहेत. स्वातंत्र्यानंतर काही काळ हा किल्ला कस्टमच्या ताब्यात होता तेव्हा त्यांनी या बॅरक्स आणि हौद बांधले असावेत. पद्मदूर्गला एकूण ६ बुरुज आहेत. पद्मदूर्ग व पडकोट मिळून गडावर ३८ तोफा आहेत. तटबंदीवरुन मुरुडचा किनारा, जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाला होता. त्याच्या आरमारी सामर्थ्याने त्याने किनारपट्टीवर धाक जमवला होता. सामान्य रयतेची पिळवणूक होत होती. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्दीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेउन पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली. हि बातमी कळल्यावर सिद्दी अस्वस्थ झाला, कारण सिद्दीची राजधानी जंजि-याजवळ, त्यामुळे समुद्रात मराठय़ांचा किल्ला असणे सिद्दीस मानवणारे नव्हते, या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्यामुळे तो या किल्ल्याच्या बांधकामात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या या मा-यात आणि अडथळ्यांमध्येही किल्ल्याचे बांधकाम सुरूच होते. हे काम सोपे नव्हते म्हणून शिवाजी महाराजांनी कांसा किल्ल्याच्या संरक्षणासाठी दर्यासारंग इब्राहिमखान व दौलतखान यांना त्वरित हुकूम पाठविले की, ‘आरमार घेऊन त्वरित कांसा बेटावरील लोकांना संरक्षण द्यावे.’ बेटाभोवती समुद्रात आरमार ठेवायचे म्हणजे मोठी रसद, अन्नधान्य, दारूगोळा व पैसा आवश्यक असल्याने महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळ्यानी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारासाठी लागणारी खर्चाची रक्कम व धान्याचा पुरवठा करण्याचा हुकूम दिला. जिवाजी विनायककडून रसद पोहोचवण्यास दिरंगाई झाली आणि हि गोष्ट शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. त्यामुळे महाराजांनी दि. १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायकचे कानउघाडणी करणारे पत्र लिहिले. त्यात महाराज लिहीतात "एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू पहाल यावरी साहेब रिझतील काय. याउपरि तुमचा मुलाहिजा करणार नाही" हे या पत्रातले शब्द शिवरायांच्या कडक प्रशासनाची ग्वाही देणारे आहेत. ह्या पत्राची तारीख होती १९ जानेवारी १६७५. जिवाजी विनायकला दर्यासारंगास पैसा व रसद उपलब्ध करून देणे भाग पडले व पुढे पद्मदुर्ग किल्ला उभा राहिला. यावरून शिवाजी महाराजांची कर्तव्यदक्षता व उद्दिष्टांची चांगली कल्पना येते. बरीच वर्षे खपुन महत्प्रयासाने बांधलेल्या या किल्ल्याचा पहिला हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते याची निवड केली. इ.स. १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळेच्या नेतृत्वाखाली १०,००० फौज देऊन महाराजांनी जंजिरा किल्ला घेण्याची मोहीम आखली. लढाऊ नौकांनी जंजि-यावर लहान तोफांनी मारा केला, पण उपयोग झाला नाही. तेव्हा मोरोपंताने हवालदार सुभानजी मोहिते, सरनोबत सुभानजी खराडे व कारकून मल्हार नारायण सबनीस यांच्याकरवी अष्टागरातील कोळीवाडीचा प्रमुख लाय पाटील व त्याच्या पद्मदुर्गावर चाकरी करणा-या काही शूर सोनकोळ्यांना पद्मदुर्गावर बोलावून जंजिरा घेण्याची मोहीम सांगितली.शुर लाय पाटलाने ८-१० सहका-यांसह रात्री दोरखंडाच्या शिडय़ा बांधून जंजिरा तटावर प्रवेश मिळविला. हबशांना त्याचा पत्ताही लागला नाही. मोरोपंताच्या सैन्याच्या तुकडीची लाय पाटील आणि त्याचे सहकारी पहाट फुटायच्या वेळेपर्यंत वाट पाहून थकले. सैन्य आले नाही म्हणून निराश होऊन दोराच्या शिडय़ा कापून त्यांनी माघार घेतली. शिवरायांना ही बातमी समजली तेव्हा पालखीचा मान म्हणून एक बोट लाय पाटलास बांधून दिली व तिचे नाव पालखी असे ठेवले. बोटीबरोबरच लाय पाटलास छत्री, निशाण, वस्त्रे व दर्याकिना-यांची सरपाटीलकी मोठय़ा सन्मानपूर्वक बहाल केली. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत व मृत्यूनंतरही १६८० पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्मदुर्ग सिद्दीच्या ताब्यात गेला. राजपुरी खाडीच्या संरक्षणासाठी १६९३ च्या सुमारास हा दुर्ग उभारला असे १८८३ च्या कुलाबा गॅझेटिअरमध्ये म्हटले आहे. बहुधा मूळ किल्ल्यावर समुद्राच्या बाजूने किल्ल्याच्या तटबंदी बांधण्याचा जो प्रयत्न करून ते काम अर्धवट सोडून देण्यात आले त्याबाबत गॅझेटिअरकारांना म्हणायचे असेल. इ.स. १७०२ च्या दरम्यान सुभानजी मोहिते हाच पद्मदुर्गचा किल्लेदार असावा. दि. २८ एप्रिल १७०४ मधील पद्मदुर्गविषयी एक पत्र आहे, त्यानुसार मोरोपंत पिंगळे यांचा मुलगा नीळकंठ पिंगळे व परशुराम त्रिंबक यांनी बहिरो पंडित यांच्या वंशजांना पत्र लिहून कळविले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरे पद्मदुर्ग किल्ल्याच्या खर्चासाठी व देखभालीसाठी बहिरोपंडित प्रधान यांना दोन गावे नेमून दिली होती. कराराप्रमाणे ती गावे आता पद्मदुर्ग किल्ल्याच्या कारकुनाच्या स्वाधीन करावी आणि यात कोणतीही अफरातफर करू नये. यावरून दिसून येते की, महाराजांनी नुसता किल्ला बांधला नाही तर त्याच्या देखभालीचीसुद्धा व्यवस्था लावून दिली होती. नंतर हा किल्ला सिद्दीच्या ताब्यात गेला त्याआधी पद्मदुर्गचा हवालदार जनाजी पवार व मुजूमदार मल्हार नारायण चेऊलकर होता. इ.स. १७३२ मध्ये पेशव्यानी मुरूडला वेढा घातला त्यावेळी सिद्दी व पेशवे यांच्यात तह होऊन जंजिरा, पद्मदुर्ग हे किल्ले आणि मांडले, नांदगाव, दिवे, श्रीवर्धन ही गावे सिद्दीकडे राहिली आणि पेशव्याकडे बिरवाडी, तळे, घोसाळे हे किल्ले व निजामपूर, गोरगाव ही गावे राहिली. इ.स. १७०७ मध्ये पद्मदुर्गचा किल्लेदार सिरुरखान हा होता. त्यावर्षी सिद्दी कासीम मरण पावल्यावर तो जंजि-याचा अधिपती झाला. मराठयांनी पेशवे काळात रघुजी आंगरेने दि. २१ फेब्रुवारी १७५९ रोजी हा किल्ला जिंकून घेतला.
© Suresh Nimbalkar