दुसखेडे
प्रकार : गढी
जिल्हा : जळगाव
उंची : 0
खानदेशातील जळगाव जिल्ह्यात आजही अशा अनेक गढ्या आहेत ज्या लोकांना फारशा माहित नाहीत. किंबहुंना आता माहित पडत आहेत. कागदोपत्री कुठेही कशाही प्रकारची नोंद नसलेली अशीच एक परीचीत गढी आम्हाला जळगाव जिल्ह्याची भटकंती करताना पाचोरा तालुक्यातील दुसखेडे गावी पहायला मिळाली. कागदोपत्री नोंद असाव व लोकांना हि गढी माहित पडावी यासाठी केलेला हा लेखनप्रपंच. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेली हि गढी पाचोरा या तालुक्याच्या शहरापासुन १२ कि.मी.अंतरावर असुन जळगाव येथुन ४२ कि.मी.अंतरावर आहे. खेडगाव नंदीचे या गावातील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही तेथुन ५ कि.मी.अंतरावर असलेल्या दुसखेडे गावात पोहोचलो. हिवरा नदीच्या काठावर असलेले हे गाव हिवरा व प्रवरा या दोन नदीपात्राच्या सान्निध्यामुळे शेतीबाबत मध्ययुगीन काळापासुनच संपन्न असावे. गावाच्या मध्यवर्ती भागात एका लहानशा उंचवट्यावर चौकोनी आकाराची हि लहानशी गढी असुन गढीचा परीसर साधारण पाव एकर असावा. गढीचा मुख्य दरवाजा पश्चिमाभिमुख असुन गढीत सहजपणे प्रवेश करता येऊ नये यासाठी तो चिंचोळ्या मार्गाने बंदीस्त केलेला आहे. या बोळीतून ६-७ पायऱ्या चढुन आपण गढीच्या मुख्य दरवाजात पोहोचतो.
...
गढीचा मुख्य दरवाजा आजही शिल्लक असला तरी आतील अवशेष पुर्णपणे नष्ट करून त्यावर तटाला लागुन नव्याने घरे बांधली आहेत. गढीच्या आत पहाण्यासारखे काहीच शिल्लक नसल्याने बाहेरील बाजूने तटाला फेरी मारता येते. गढीच्या तटाची उंची साधारण २० फुट असुन त्यातील तळातील अर्धे बांधकाम दगडात तर त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. पुर्वी गढीच्या तटबंदीत चार बुरुज असल्याचे स्थानिक सांगतात पण सद्यस्थितीत गढीचे दोनच बुरुज शिल्लक आहेत. या दोन्ही बुरुजांना व तटाला वरील बाजुस बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. गढीच्या पुर्व व दक्षिण भागात असलेली तटबंदी खूप मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. गढीची प्रदक्षिणा करण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. गढीच्या इतिहासाबाबत स्थानिक पुर्णपणे अनभिज्ञ असुन गावाच्या चौकात तीन सुंदर समाधी पहायला मिळतात. पण त्या कोणाच्या हे स्थानिकांना सांगता येत नाही. जळगाव प्रांत बहुतांशी सपाटीवर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात कोटवजा गढी दिसुन येतात. या भागातील प्रशासन व्यवस्था येथील स्थानिक वतनदाराकडून सांभाळली जात असल्याने मध्यवर्ती राज्यकर्ते कोणीही असो, त्यांच्याशी जुळवुन घेण्याचे काम हे स्थानिक वतनदार करत असत. हे वतनदार त्यांचा कारभार या गढीतुनच सांभाळत असल्याने तेथील सुरक्षाव्यवस्था चोख असे. हि गढी एखाद्या किल्ल्याप्रमाणे तटबुरुजानी बंदीस्त केली असे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढी आता उध्वस्त होत आहेत तर काहींचा उपयोग जुन्या बांधकामात बदल करून राहण्यासाठी केला जात आहे.
© Suresh Nimbalkar