डूबेरगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : २८५५ फुट
श्रेणी : सोपी
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात ठाणगाव- सिन्नर रस्त्यावर सिन्नरच्या अलीकडे ४ कि.मी.वर डूबेरा नावाचं गाव आहे. डुबेरे गावात जाण्यासाठी मुंबईहून घोटीमार्गे सिन्नरकडे जायचे. सिन्नरच्या थोडं अलीकडे उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावरून १३ कि.मी. आत डुबेरे गाव आहे. गावाला दोन प्रवेशद्वार असुन थोडीफार तटबंदी आहे. डुबेरगावात बर्वेंवाडा असून या वाड्यात थोरल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. गावाच्या मागेच माथ्यावर देवीचे देऊळ असणारा छोटा डुबेरगड दिसतो. डूबेरा गावात डुबेरगड देवीगड म्हणुन ओळखला जातो. डुबेरगडाच्या पायथ्याशी शंकराचे मंदिर असून जवळच पाण्याची विहीर असल्याने या मंदिरात निवासाची सोय होऊ शकते. गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर असून वर जाण्यास सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. या पायऱ्याच्या सुरवातीस एक छोटी घुमटी असुन त्यात सप्तशृंगी देवीची मुर्ती व तांदळा आहे. जवळपास पाचशे पायऱ्या चढून अर्ध्या तासात आपण डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो.
...
किल्ल्यावर एक मोठा तलाव, सप्तशृंगी देवीचं मंदिर, एक पडझड झालेली सिमेंटची इमारत आणि त्याच्यासमोर खालील बाजुस दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गडावर पिण्यास पाणी नसल्याने ते सोबत ठेवावे लागते. याशिवाय गडावर एक दर्गा असुन दोन ठिकाणी पादुकाशिल्प आहे. यातील एक शिल्प पावसाळी साचपाण्याच्या तलावात औदुंबराच्या झाडाखाली आहे. गडाच्या माथ्यावरून वायव्य दिशेला सप्तश्रुंगगड , मार्कंडेय, रावळ्या– जावळ्या हे जोड किल्ले दिसतात. गडफेरी करायला अर्धा तास पुरेसा होतो. डूबेरगडाचा वापर केवळ टेहळणी करीता होत असावा. कोणत्याही ऋतूत डूबेरगडाला सहज भेट देता येते. डूबेरा गाव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे आजोळ. या गावात बर्वेवाडा नावाचा सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा वाडा आहे. अजूनही सुस्थितीत असलेला १ बुरुज अन जाड तटभिंती असणारा हा वाडा म्हणजे मल्हार अंताजी बर्वे यांचा वाडा. हे मल्हार म्हणजे राधाबाईंचे सख्खे बंधू. ताराराणींच्या कारकिर्दीत मल्हार अंताजी बर्वे यांना हे गाव इनाम सोपवले गेले व हे घराणे इथेच स्थायिक झाले. या भागात मोठ्या प्रमाणावर गवत वाढत असल्याने कुरणासाठी हि जागा योग्य होती. बर्वे घराण्यावर गाई बैलांची मोठ्या प्रमाणावर पैदास करून चांगल्या प्रतीचे बैल तोफांचे गाडे हाकण्याच्या कामी पाठवण्याची जबाबदारी होती. राधाबाईंचे माहेर कोकणात परंतु त्या गरोदर असताना पावसाळ्याचे दिवस होते. अशा वेळेस त्यांना माहेरी कोकणात पाठवण्याऐवजी घाटावर त्यांचे बंधू मल्हार यांच्या घरी प्रसूतीसाठी पाठवण्यात आले. याच वाड्यात राधाबाईंच्या पोटी पहिले पेशवे बाजीराव यांचा भाद्रपद महिन्यात सन १७०० मध्ये जन्म झाला. वाड्यातील ती खोली अन पलंग अजूनही सुस्थितीत आहेत. सध्या वाड्यात बर्वे घराण्याची अकरावी पिढी रहात आहे. पूर्वभिमुख असलेल्या बर्वेंवाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे होती पण यातील रस्त्याच्या बाजुला असणारे प्रवेशद्वार आता बुजविण्यात आले आहे. गावाला दोन भव्य वेशी असुन पश्चिमेकडील वेशीजवळ पेशवेकालीन गणपतीची मुर्ती असलेले मंदीर आहे. वाड्यातील बहुतेक गोष्टी आजही सुस्थितीत असुन ४०० वर्षानंतर आजही वापरात आहेत. लाकडी खांबांवरचे नक्षीकाम फार सुंदर आहे. भिंतींमध्ये धान्य साठवण्याचे कोठार तसेच जमीनीत तळघरे आहेत. वाड्यात एक विहीर असून त्या शेजारीच घोड्यांची पागा असायची. वाड्यात काही वर्षांपूर्वी गावातील शाळा भरत असे पण जागा अपुरी पडल्याने ती दुसरीकडे स्थलांतरित झाली. वाड्याशेजारी सटवाई देवीचे मोठे मंदिर आहे. डूबेरगड पहायला आले असता या वाड्याला जरूर भेट द्यावी. १६७९ साली जालन्याची लूट करून मराठी सैन्य परतत असताना मोगल सरदार रणमस्तखानाने त्यांची वाट अडवली. त्याच्या मागून सरदार केसरीसिंह यांची ज्यादा फौज चालून आल्याने खजिन्याची मोंगलांच्या तावडीतुन सुटका कशी करावी हा पेच पडला. त्यावेळी बहिर्जी नाईक याने अत्यंत शिताफीने ही सगळी फौज खजिन्यासकट डूबेरमार्गे पट्टा किल्ल्यावर नेली आणि मोगलांच्या हल्ल्यापासून मराठ्यांची आणि महाराजांची सुटका केली. पट्टा किल्ल्यावर जाताना महाराजांनी एक दिवस येथे मुक्काम केलं व राजे २२ नोव्हेंबर १६७९ रोजी पट्टागडावर गेले अशी माहिती स्थानिकाकडून सांगण्यात येते.
© Suresh Nimbalkar