डांगरी
प्रकार : नगरकोट/गढी
जिल्हा : जळगाव
उंची : 0
गढीकोटांची भटकंती करताना आपल्याला अनेकदा स्थानिक लोकात गढी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वेगळ्याच वास्तु नजरेस पडतात. अशीच एक वेगळ्या धाटणीची वास्तु आम्हाला जळगाव जिल्ह्यातील भटकंती करताना प्रगणे डांगरी या गावात पहायला मिळाली. अमंळनेर तालुक्यात असलेले प्रगणे डांगरी हे गाव तालुक्याच्या ठिकाणाहुन म्हणजे अंमळनेर शहरापासून १५ कि,मी. अंतरावर तर जळगाव येथुन ८५ कि.मी.अंतरावर आहे. प्रगणे डांगरी गावात दोन गढी असल्याची माहिती आधीच माझ्या वाचनात आली असल्याने त्याच अनुषंगाने आमची शोध मोहीम सुरु झाली. प्रगणे डांगरी हे गाव कधीकाळी नगरकोटाच्या आत वसले होते हे दर्शविणारे कोटाच्या भिंतीचे अवशेष आज जरी नष्ट झाले असले तरी कोटाचा मुख्य दरवाजा मात्र आजही शिल्लक आहे. हा दरवाजा १५ फुट उंच असुन त्याला ३ कमानी आहेत. दरवाजाचे तळातील ८ फुट उंच बांधकाम घडीव दगडात केले असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. दरवाजाच्या वरील भागात ग्रामपंचायत कार्यालय असुन दरवाजाला लागुनच साने गुरुजींनी सर्वांसाठी खुले केलेले राममंदीर आहे. गावात आल्यावर ग्रामपंचायत कार्यालय विचारले असता आपण सहजपणे या दरवाजा जवळ पोहोचतो.
...
कोटाच्या या दरवाजात उभे राहिले असता आपल्याला गावाबाहेर समोरील बाजुस दुसरा भव्य दरवाजा पहायला मिळतो. हा दरवाजा गढीचा दरवाजा म्हणुन सांगीतला जात असला तरी ते राजपरीवाराचे शाही कब्रस्तान असुन त्याच्या सभोवती असलेल्या तटबंदीतील हा दरवाजा आहे. पुर्णपणे विटांनी बांधलेल्या या दरवाजा शेजारी दोन्ही बाजुस शोभेच्या कमानी असुन आतील भागात राहण्यासाठी दालन आहे. सध्या एका स्थानिकांनी तेथेच मुक्काम ठोकलेला आहे. या दरवाजाने आत प्रवेश केल्यावर समोरच अनेक प्रशस्त चौथरे व त्यावरील थडगी नजरेस पडतात. या चौथऱ्याचा आकार व त्यावरील नक्षीकाम पहाता या राज परीवारातील लोकांच्या समाधी असाव्यात. या समाधींच्या अलीकडे उंच चौथऱ्यावर बांधलेली मशीद असुन या मशीदीच्या चार टोकावर चार मनोरे आहेत. हि मशीद तीन कमानीवर तोललेली असुन मशिदीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कमानीवर पर्शियन शिलालेख आहे. मशीदी शेजारी कारंजे असलेला मध्यम आकाराचा हौद असुन दुर्लक्ष झाल्याने त्याची रया गेलेली आहे. मशिदीच्या समोर काही अंतरावर एका उंच चौथऱ्यावर घुमट असलेली चौकोनी आकाराची अजुन एक इमारत असुन तिच्या वरील बाजुस चार टोकावर चार मिनार आहेत. या इमारतीच्या तीन बाजुच्या भिंतीत मोठमोठ्या जाळीदार खिडक्या बसवलेल्या आहेत. या इमारतीत असलेले थडगे पहाता हि एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची समाधी असावी. येथे आपली या ठिकाणची भटकंती पुर्ण होते. हा संपुर्ण परिसर साधारण दीड एकर असावा. येथुन नजर फिरवली असता गावाच्या मध्यवर्ती भागात झेंडा फडकत असलेले उंच ठिकाण दिसते. हे ठिकाण म्हणजे डांगरी गावातील गढी आहे. या ठिकाणाला घरांचा वेढा पडलेला असल्याने त्यातुन वाट काढतच गढीवर जावे लागते. काळाच्या ओघात या संपुर्ण गढीची व त्यातील वास्तूंची पडझड झाली असुन गढीची खुण सांगणारा केवळ एक बुरुज एका टोकावर अर्धवट ढासळलेल्या स्थितीत आहे. गढीच्या मध्यात नव्याने एक थडगे रचण्यात आले आहे. येथे आपली दुसरी वास्तु पाहुन पुर्ण होते. संपुर्ण डांगरी गावाची भटकंती करण्यास दीड तास पुरेसा होतो. आता थोडा डांगरी गावाचा इतिहास पाहुया. इ.स.१५३६ ते १५६६ दरम्यान मिरान मुबारक शहा फारुकी याच्या काळात डांगरी येथे मोठी लढाई झाली होती. गुजरातचा उमराव इमाद उल मुल्क हा बुऱ्हाणपूर येथे आला असता मिरान मुबारक शहा फारुकी याने त्याचे जंगी स्वागत केले. पण वऱ्हाडचा मुघल सरदार दर्या इमादशाह याने मिरान मुबारक शहा फारुकी यास इमाद उल मुल्क ला अटक करून आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. मिरान मुबारक शहा फारुकी याने हि मागणी धुडकावली व इमाद उल मुल्क यास गुजरात सुलतान व दर्याखान विरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. यानंतर झालेल्या लढाईत मात्र मिरान मुबारक शहा फारुकी व इमाद उल मुल्क यांच्या संयुक्त सेनेचा पराभव झाला व इमाद उल मुल्क माळवा सुलतानाच्या आश्रयास गेला. मिरान मुबारक शहा फारुकी येथुन अशीरगडावर परतला. हि लढाई पहाता डांगरी येथील गढी पुर्वीपासूनच अस्तित्वात असावी. येथील लढाईत मृत पावलेल्या महत्वाच्या व्यक्तींसाठी हे कब्रस्थान व त्यातील मशीद नंतरच्या काळात बांधली गेली असावी असे वाटते.
© Suresh Nimbalkar