चंदनखेडा
प्रकार : गढी
जिल्हा : चंद्रपूर
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा राजघराण्यापैकी विदर्भातील गोंडराजे हे देखील एक महत्वाचे राजघराणे. या राजघराण्याने विदर्भावर जवळपास ६०० वर्ष राज्य केले. आजचे चंद्रपूर म्हणजे पुर्वीचे चांदा हे त्यांच्या राजधानीचे मध्यवर्ती ठिकाण. त्यांच्या काळात चंद्रपूर शहराच्या आसपास काही गढीकोटांची निर्मिती केली गेली. चंदनखेडा येथे असलेली गढी त्यापैकी एक. त्या काळात चंदनखेडा गढीचा राहण्यासाठी तसेच प्रशासकीय कामासाठी वापर केला गेला. इ.स.१६१९ ते इ.स.१७०४ या काळात चंदनखेडा शहर अगदी भरभराटीस आले होते. चंदनखेडा परीसरात किल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या गढीची आज आपण भटकंती करणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले हे गाव चंद्रपूर शहरापासुन ५० कि.मी.अंतरावर तर भद्रावती या तालुक्याच्या ठिकाणाहुन २५ कि.मी.अंतरावर आहे. गढीच्या दर्शनी भागात माधवराव महाराजांचे मंदीर असल्याने तेथे भक्तांचा बऱ्यापैकी वावर असतो. स्थानिकांना हे ठिकाण किल्ला म्हणुन परीचीत असल्याने विचारणा केली असता आपण सहजपणे या गढीजवळ पोहोचतो. आयताकृती आकाराची हि गढी साधारण एक एकरवर पसरलेली असुन मुख्य गढीत प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत.
...
गढीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन त्यातील दरवाजाची कमान जरी नष्ट झाली असली तरी दरवाजाची चौकट व त्याच्या आसपास असलेली तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. या दरवाजाने आत प्रवेश केल्यावर समोरच माधवराव महाराजांचे मंदीर असुन उजवीकडे गढीत प्रवेश करण्यासाठी दुसरा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाची कमान व त्याच्या आसपासची तटबंदी आजही शिल्लक आही. या दरवाजाने आत शिरल्यावर डावीकडे तटावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी बंदीस्त पायरीमार्ग आहे. या पायरीमार्गाने तटावर गेले असता गढीची दोन बाजुस शिल्लक असलेली तटबंदी व पहिला दरवाजा नजरेस पडतो. सध्या गढीची फक्त दोन बाजुची तटबंदी शिल्लक असुन उर्वरित दोन बाजुची तटबंदी पूर्णपणे नष्ट झाली आहे. गढीच्या आतील बाजूस म्हणजे माधवराव मंदीराच्या मागील बाजूस शिल्लक असलेली एकमेव वास्तु म्हणजे हमामखाना. स्थानिक लोक या वास्तुला भुयार म्हणुन ओळखतात. पण तेथे असलेले खापरी नळ, पाण्याची टाकी, हौद या गोष्टी अभ्यासकांच्या नजरेतुन सुटत नाही. हि एकमेव वास्तु वगळता गढीतील इतर वास्तु पूर्णपणे नष्ट झाल्या असुन त्या ढिगाऱ्यावर मोठमोठी झाडे वाढलेली आहेत. गढीच्या मागील बाजूस असलेल्या तटबंदीचे ढिगाऱ्यात रुपांतर झालेले आहे. गढीच्या दुसऱ्या बाजूस शिल्लक असलेल्या तटबंदीवर पाकळीच्या आकाराच्या कमानी पहायला मिळतात. गढीच्या आत पुर्वी पाण्याची सोय असावी पण सध्या तिचा मागमुसही दिसत नाही. गढीत इतर काही अवशेष शिल्लक नसल्यने अर्ध्या तासात आपले गढी दर्शन पुर्ण होते. आता थोडे आपण गढीच्या इतिहासाकडे वळुया. पुरातत्व विभागाने चंदनखेड़ा येथे केलेल्या उत्खननानुसार चंदनखेड़ा गावाचा इतिहास थेट सातवाहन काळापर्यंत मागे जातो. सातवाहन काळात हे शहर कपीशकट वा चंदनपुर या नावाने ओळखले जात होते. येथे झालेल्या उत्खननाची माहीती माधवराव मंदिरात लावण्यात आली आहे. पण आपण केवळ या गढीपुरता इतिहास पाहुया. इ.स.१६१९ ते इ.स.१७०४ दरम्यान चांदागड येथे बिरशहा राजा राज्य करीत असता चंदनखेड़ा येथे त्याच राजवंशातील एक वंशज गोविंदशहा हा वतनदार होता. गोंड राजा बिरशहा याने आपल्या कौटुंबिक कलहातुन आपला जावई व देवगढचा राजपुत्र दुर्गपालशहा याची हत्या केली पण हा वाद येथेच शमला नाही तर देवगढ़चा राजा बख्त बुलंदशाह याने आपला सरदार हिरामण याच्या करवी गोंडराजा बिरशहा याची हत्या करवली व आपला बदला पुर्ण केला. त्यानंतर अगदी इ.स.१७०४ पर्यंत हि दुष्मनी कायम होती. राजा बिरशहा याच्या मृत्युनंतर त्याची पत्नी हिराईदेवी यांनी राज्य कारभाराची सूत्रे हातात घेतली. राणी हिराईदेवी यांनी गादीला वारस म्हणुन त्याच वंशातील असलेला गोविंदशहा यांचा तीन वर्षाचा मुलगा रामशहा दत्तक घेतला. कालांतराने गोविंदशहा हे देखील चांदागड येथे राहावयास गेले पण त्यांनी जाताना माधवराव यांची या वतनावर व गढीवर नेमणूक केली. याच माधवरावांचे मंदीर आपल्याला गढीच्या आतील बाजूस पहायला मिळते.
© Suresh Nimbalkar