गडबोरी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : चंद्रपूर
उंची : ८०४ फुट
श्रेणी : सोपी
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात गडबोरी नावाचे लहानसे खेडेगाव आहे. गावात असलेला गड व बोरीची अनेक झाडे यामुळे या गावाला गडबोरी नाव पडल्याचे स्थानिक सांगतात. सिंदेवाही या तालुक्याच्या ठिकाणापासुन साधारण ७ किमी अंतरावर असलेल्या या गावात उमा नदीच्या काठावर एका उंच टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे. गडबोरी गावात प्रवेश करताना दुरूनच किल्ला असलेली टेकडी व त्यावरील मंदीर ठळकपणे दिसून येते. गडावर कोलासुर देवतेचे मंदिर असल्याने गडावर जाण्यासाठी नव्याने पायऱ्या बांधलेल्या आहेत. गावात आल्यावर किल्ला म्हणुन विचारणा करताच आपण या पायऱ्या जवळ तेथुन सहजपणे गडाच्या माथ्यावर पोहोचतो. गडाच्या दरवाजा जवळील मार्ग हा कातळात कोरून काढलेला असुन त्यात असलेली कमान मात्र काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. उत्तरेकडील या दरवाजा शेजारी नव्याने बांधलेले कोलासुरचे मंदीर आहे. या मंदिराचा घडीव दगडात असलेला पाया पहाता येथे पुर्वी घडीव दगडात बांधलेले विष्णुमंदीर असावे. कोलासुर हा विष्णुचा अवतार मानलेला असुन किल्ल्यावर असलेल्या एका घुमटीत विष्णुची सुंदर मुर्ती पहायला मिळते. हि विष्णु मुर्ती पहाता येथील मूळ मंदीर बहुदा विष्णूचेच असावे असे वाटते.
...
गडावर प्रवेश करण्यासाठी उत्तर व दक्षिण असे दोन मार्ग असुन त्यातील उत्तरेकडील मार्ग प्रामुख्याने वापरात आहे. दक्षिणेकडील दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला असुन त्याच्या केवळ खुणा शिल्लक आहेत. या दरवाजाने काही अंतर खाली उतरले असता तटबंदीत असलेला एक बुरुज पहायला मिळतो. दक्षिण दरवाजाच्या वरील वाजूस कातळात कोरलेले चौकोनी आकारचे टाके असुन या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत. टाक्याची देखभाल नसल्याने सध्या ते पूर्णपणे कोरडे पडलेले आहे. गडाचा परीसर साधारण तीन एकरवर पसरलेला असुन गडाचा माथा समुद्रसपाटीपासुन ८०४ फुट उंचावर आहे. गडावर पाण्याचे टाके, कोलासुर मंदीर या दोन वास्तु वगळता अजुन दोन लहान घुमटी पहायला मिळतात. यातील एका घुमटीत विष्णुची मुर्ती असुन दुसरी घुमटी म्हणजे कोलबा वाघ यांची समाधी असल्याचे सांगण्यात येते. गडाच्या पश्चिम भागातील तटबंदी व त्यातील बुरुज आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन हे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात करण्यात आले आहे. हे बांधकाम पहाता संपुर्ण किल्ला घडीव दगडातच बांधण्यात आला असावा. गडाच्या पश्चिम भागातच शिल्लक असलेल्या एका मोठ्या बुरुजावर नव्याने सिमेंट चौथरा बांधलेला असुन त्याला चुना फासण्यात आला आहे. या कबरीवर येण्यासाठी एक खाजगी नवीन पायरीमार्ग बांधण्यात आला आहे. तटाखाली मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडीतुन वाट काढतच येथील तटबंदी व बुरुज पहावे लागतात. संपुर्ण किल्ला पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. गडबोरी किल्ला वैरागडचे नागवंशीय माना जमातीचे राजे कुरुमप्रहोद यांनी बांधल्याचे उल्लेख येतात. राजा कुरुमप्रहोद यांनी ९ व्या शतकात प्रथम वैरागड येथे किल्ला बांधून नंतर राजोली, गडबोरी, चिमूर येथे किल्ले बांधले. त्यांनी वैरागडच्या उत्तरेस वैलाचना नदीच्या तिरावर गांव वसवून त्यांच्या नावावरून या गावाचे नांव कुरुखेडा ठेवण्यात आले पण कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन त्याचे कुरखेडा झाले. चालुक्य सम्राट द्वितीय राजेंद्र दिग्वीजयास निघाले असता त्यांनी वैरागड, चक्रकोटय (बस्तर) येथे इ.स. १०७० मध्ये मोठे विजय संपादन केले. त्यावेळी वैरागड येथे नागवंशीय माना जमातीचे राज्य होते. काही वर्षानंतर या वंशातील प्रतापभूषण या पराक्रमी राजानी चालूक्याची सत्ता झुंगारून दिली व पुन्हा आपला स्वतंत्र राज्यकारभार सुरु केला. त्यानी सानगडी, भनारा व पौनी हा प्रदेश जिंकुन आपल्या राज्यात सामील केला. नागवंशीय माना जमातीचे राज्य अस्तित्वात असतांना राज्यकारभाराच्या दृष्टीने चार पदव्या सरदार, सुभेदारांना दिल्या जात होत्या. १) बडवाईक २) मोकासी ३) भोयर ४) दिवाण. बहुतेक बडवाईक व भोयर या पदव्या नारनवरे कुळातील शुर व बुध्दिमान इसमांना दिल्या. मोकासी ही पदवी वाघ कुळातील लोकांना दिली तर दिवाण ही पदवी गजबे कुळातील लोकांना दिली होती. शेवटचे बडवाईक भामडेळी येथील मनोजी बडवाईक होते तर शेवटचे मोकासी गडबोरीचे किल्लेदार कोलबा वाघ होते. गडबोरी किल्ल्यावर इ.स.१७३४ पर्यंत माना वंशाचे कोलबा वाघ यांचे अधिपत्य होते. ते चंद्रपूर म्हणजे चांदागडचे गोंडराजे रामशहा (१६७२- १७३५) यांना समकालीन होते. कोलबा वाघ यांच्या ताब्यात प्रशासकीय तसेच संरक्षणाकरीता गडबोरी, नागभिड, चिमूर, नेरी, मदनागड, नवरगांव, भटाळा, भिसी, चंदनखेडा, वरोरा हा भुप्रदेश व या परगण्यातील एकूण २०९ गांवे होती. इ.स. १७३१ मधे ईरव्याची प्रसिद्ध लढाई गोंडराजा रामशहा याचे सैन्य व महाराज कोलबा वाघ यांचे सैन्यात झाली. महाराज कोलबा वाघ यांचे ताब्यातील ईरवा टेकडीवरचा किल्ला मजबूत व भक्कम तटबंदी असलेला होता. जमिनीपासून ३५० फुट ऊंच टेकडीवरचा हा किल्ला दगडांनी बांधलेला होता. हा किल्ला सर करण्यासाठी रामशहाचा भाचा आगबा मोठ्या सैन्यासह चालून आला. या युद्धात आगबाचे सैन्य पराभूत झाले. या पराभवा नंतर इ.स. १७३४ मधे कोलबा वाघ यांचा पराभव करण्याकरीता रामशहाने सैन्याचे नेतृत्व सेमाजी ऊर्फ शंकर ढुमे या रिसालदाराकडे दिले. त्याने कपटकारस्थान करून महाराज कोलबा वाघ यांना जिवंत पकडले व खजीना घेऊन चांदागडकडे रवाना झाला. चांदागडला आल्यावर दुसरे दिवशी कोलबा वाघ यांना चांदागड येथे फाशी देण्यात आली. एका पराक्रमी माना जमातीच्या राजाचा अंत व त्याच बरोबर माना जमातीच्या राज्याचा शेवट झाला. म. सि. जांभुळे यांनी लिहिलेल्या माना जमातीचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या पुस्तकातील उल्लेखाप्रमाणे बंडाचा झेंडा हाती घेऊन गडबोरी किल्यावर कोलबा वाघ यांनी राज्य केले पण नंतर ते फितुरीने पकडले गेले. त्यांना फाशी दिल्यानंतर त्यांची समाधी या किल्ल्यावर बांधण्यात आली.
© Suresh Nimbalkar