कोंढवी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रत्नागिरी
उंची : ८३० फुट
श्रेणी : सोपी
रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या पोलादपुर तालुक्यात कशेडी घाटमार्गात कोंढवी हे प्राचिन गाव आहे. गावात दिसणाऱ्या सतीशिळा,विरगळ,कोरीव मुर्त्या तसेच मंदिराचे कोरीव स्तंभ या गावाचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात. कोंढवी गावाच्या पश्चिमेला घाटमाथ्यावरील सातारा व महाबळेश्वर येथे जाणारा आंबेनळी घाट असुन कोंढवी- देवपूर दरम्यान एक लहानसा घाटमार्ग या मुख्य घाटमार्गाला मिळतो. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी. कोंढवी किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर गाठावे. पोलादपूरहून खेड चिपळूणकडे जाताना कशेडी घाटात ६ कि.मी. अंतरावर कोंढवी फाटा आहे. या फाट्यापासून तळ्याची वाडी उर्फ कोंढवी गाव ४ कि.मी. अंतरावर आहे. गावात शिरल्यावर उजव्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. गडाची तटबंदी व दरवाजा नष्ट झाले असुन या रस्त्याने आपण गडमाथ्यावर असलेल्या आठगाव भैरवनाथ या मंदिराकडे पोहोचतो.
...
किल्ल्याची उंची समुदसपाटीपासून ७९० फुट आहे. साधारण गोलाकार आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाचा परीसर ५ एकरमध्ये सामावला आहे. मंदिराच्या आवारात जुन्या मंदिराचे कोरीव व घडीव दगड पडलेले आहेत. भैरव मंदिराचा नव्याने जिर्णोध्दार केलेला असुन मंदिराच्या गाभाऱ्यात भैरोबा व भैरी देवीच्या पाषाणात कोरलेल्या मुर्ती व एक महिषासुर मर्दिनीची मुर्ती पहायला मिळते. या डोंगराच्या पंचक्रोशीत कोंढवी, फणसकोंड, गांजवणे, खडपी, धामणदेवी, चोळई, खडकवणा व गोलदरा अशी आठ गावे असून या गावांचे हे श्रध्दास्थान असल्याने हे मंदिर आठगाव भैरवनाथ म्हणुन ओळखले जाते. गावातुन चालत येण्यासाठी मंदीरासमोरच पाऊलवाट आहे. मंदिराच्या मागील भागात साचपाण्याचे एक लहान टाके आहे पण त्यात डिसेंबरपर्यंत पाणी असते. टाक्याच्या पुढील भागात उतारावर ढासळलेल्या तटबंदीचे दगड दिसुन येतात. मंदिराच्या उजव्या बाजुस जुन्या चौथऱ्यावर नव्याने बांधलेली एक खोली असुन त्यात नवनाथांच्या मुर्ती ठेवल्या आहेत. या खोलीच्या मागील बाजूस ४ X २ फूट आकाराचे शिल्प आहे पण ते नेमके कशाचे आहे ते कळत नाही. या शिल्पापुढे काही अंतरावर दोन भग्न वास्तुंचे अवशेष पाहायला मिळतात. शिल्प पाहुन डांबरी रस्त्यावर येऊन काही अंतर चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजुला एका चौथऱ्यावर हनुमानाची मुर्ती पहायला मिळते. या चौथऱ्याच्या उजव्या बाजुस गाळाने भरलेला तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी दगडात बांधलेल्या १६ पायऱ्या पहायला मिळतात. गडावरील इतर अवशेष नष्ट झाल्याने इथेच आपली गडफेरी पूर्ण होते. मंदिरासमोरून रसाळगड, सुमारगड व महिपतगड हे किल्ले नजरेस पडतात. गड पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. आदिलशाही काळात कोंढवी हा परगणा असुन कोंढवी किल्ल्यावरूनच या परगण्याचा कारभार चालत असे. पोलादजंग हा कोंढवी गडाचा किल्लेदार होता. पोलादजंगची पोलादपुर गावात कबर असुन त्याच्या नावानेच या गावाला पोलादपुर नाव पडल्याचे सांगण्यात येते. शिवकाळात हा प्रदेश जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. इ.स.१७७८-७९ मध्ये रायगड मधील २४४ गावे कोंढवी महाड बिरवाडी तुडील विन्हेरे व वाळण अशा सहा परगण्यात विभागली होती. यातील परगणा कोंढवी मधील उमरठ ढवळे खोपडी दांदके हि चार गावे पंतप्रतिनिधीच्या ताब्यात होती.
© Suresh Nimbalkar