YAWAL

TYPE : GROUND FORT

DISTRICT : JALGAON

HEIGHT : 0

GRADE : EASY

सातपुडा पर्वत रांगेतील तापी नदीच्या खोऱ्यात असलेले यावल शहर महाभारताचे रचयिता श्री महर्षी व्यास यांची भुमी म्हणुन प्रसिध्द आहे. महर्षी व्यास मुनी यांच्या भारतात असलेल्या दोन मंदिरापैकी एक मंदिर यावल शहरात आहे. या शहरात सुर नदीच्या काठावर निंबाळकर राजे यांचा किल्ला म्हणुन ओळखला जाणारा भुईकोट एका लहानशा टेकडीवर उभा आहे. यावल शहराच्या पश्चिमेस सुर नदीच्या काठावरील टेकाडावर वसलेला हा चौकोनी आकाराचा किल्ला साधारण दिड एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत लहानमोठे असे ९ बुरुज आहेत. मध्ययुगीन काळातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा सुंदर किल्ला आज केवळ दुर्लक्षामुळे उध्वस्त होत आहे. वेळीच या किल्ल्याची डागडुजी न केल्यास हा किल्ला केवळ ढिगाऱ्याच्या रुपात शिल्लक उरेल. यावल हे तालुक्याचे शहर भुसावळपासुन २० कि.मी. तर जळगावपासुन ४० कि.मी. अंतरावर आहे. ... यावल गावातून एक रस्ता किल्ल्याशेजारी असलेल्या न्यायालयापर्यंत जातो. न्यायालयाच्या आवारातुन किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी यांचे दर्शन होते. किल्ल्याच्या बुरुज-तटबंदीचा खालील भाग घडीव दगडात बांधलेला असून वरील भाग विटांनी बांधलेला आहे. किल्ल्यावर जाणारी वाट न्यायालयाच्या आवारातुनच वर जाते. किल्ल्यावर फारसा वावर नसल्याने या वाटेवर मोठ्या प्रमाणात झुडुपे वाढली आहेत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असलेला पहीला पुर्वाभिमुख दरवाजा व दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आज केवळ अवशेष रूपाने शिल्लक आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. किल्ल्याची नदीच्या दिशेने असलेली तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली असुन बुरुजांची काही प्रमाणात पडझड झाली आहे. तटाची उंची जमिनीपासुन ४० ते ५० फुट असुन तटबंदी बुरुजावर बंदुक तोफांच्या मारगीरीसाठी असलेल्या जंग्या पहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी एका वाड्याचा चौथरा असुन या वाडयाच्या आवारात एक खोल विहीर आहे. किल्ल्यावर फेरी मारताना वाटेत चुन्यात बांधलेले दोन लहान व एक मोठा हौद पहायला मिळतो. किल्ला उंचवट्यावर असल्याने किल्ल्यावरून संपुर्ण यावल शहर नजरेस पडते. संपुर्ण किल्ला पहायला अर्धा तास पुरेसा होतो. किल्ला पाहुन नदीच्या बाजुने बाहेर पडताना किल्ल्यापासुन वेगळा असलेला एक बुरुज पहायला मिळतो. याशिवाय नदीच्या दुसऱ्या बाजुला किल्ल्यासमोरील लहान टेकडावर असलेले व्यास मंदिर प्रेक्षणीय आहे. शिरपुर-चोपडा-यावल–बुऱ्हाणपूर या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर असलेले यावल शहर इतिहासात एक महत्वाचे ठिकाण होते. सातपुड्यातील घाटातुन येणारा माल या मार्गाने येत असल्याने या व्यापारी मार्गावर यावल आणि पाल या दोन्ही ठिकाणी किल्ले बांधलेले होते. मराठा काळात शिंदे यांच्या ताब्यात असलेले यावल त्यांनी १७८८ सालीं धार येथील पवार म्हणजेच निंबाळकराना जहागीर म्हणुन दिले. त्यानंतर त्यांनी यावल किल्ल्याची उभारणी केली. या नंतरच्या काळात यावल येथील सूर्याजीराव निंबाळकर यांनी काही काळापुरता लासुर किल्ल्याचा ताबा घेतल्याच्या नोंदी आढळतात. नंतरच्या काळात १८३७ साली यावल पुन्हां शिंद्याकडे गेलें ते १८४३ पर्यंत त्यांच्याकडे होते. १८४४ ला यावल शहर व यावल किल्ला या दोन्ही गोष्टींचा ताबा इंग्रजांनी घेतला. १९८८ मध्ये झालेल्या यावल शहर विकास योजना आराखड्यात याच्या नोंदी आढळतात. तसेच झांबरे देशमुख यांना काही काळाकरिता यावल परगणा जहागीर म्हणुन मिळाल्याच्या नोंदी आढळतात पण हा काळ नेमका कोणता याची निश्चिती करता येत नाही. या भागातील भटकंती करताना यावल किल्ल्यासोबत पाल,लासुर, रसलपुर सराई हे किल्ले एका दिवसात सहजपणे पहाता येतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!