YASHWANTGAD

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : RATNAGIRI

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर यशवंतगड नावाचे दोन सागरीदुर्ग आहेत. यातील एक यशवंतगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेडी येथील समुद्रकिनाऱ्यावर असुन दुसरा यशवंतगड रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात जैतापूर खाडीच्या उत्तरेला डोंगरउतारावर बांधला आहे. राजापुर ते यशवंतगड हे अंतर ३० कि.मी. असुन नाटे गावाच्या पश्चिमेस असलेल्या ह्या किल्ल्याला पश्चिम व दक्षिण या दोन बाजुंनी खाडीच्या पाण्याने वेढलेले आहे. किल्ल्यापासून ३ कि.मी. अंतरावर मुसाकाजी बंदर असुन नाटे गावातून आंबोळगडाच्या दिशेने जाताना डाव्या हाताला भगवा झेंडा लावलेला बुरुज व किल्ले श्री घेरायशवंतगड अशी पाटी दिसते. शत्रू थेट किल्ल्याच्या तटाला भिडू नये यासाठी किल्ल्याच्या पठाराकडील सपाट भागात तटाखाली १५ फुट रुंद आणि १५ फुट खोल खंदक खोदलेला आहे. डोंगरी किल्ल्यात ज्याप्रमाणे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडतात त्याप्रमाणे या किल्ल्याचे पडकोट व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असुन आपण डोंगरपठारावर असल्याने आपला थेट बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. ... पठारावरून किल्ल्यात प्रवेश करताना आपल्याला किल्ल्याच्या डाव्या बाजुने खंदकात उतरावे लागते. खंदकात उतरल्यावर डाव्या बाजूस दोन भक्कम बुरुजांमध्ये लपलेले बालेकिल्ल्याचे उध्वस्त प्रवेशद्वार असुन उजव्या बाजुस एक समाधी मंदिर दिसते. खंदकाच्या पुढील भागात शेंदुर फासलेले मारुती शिल्प असुन त्यापुढील झेंडा असलेल्या बुरुजाखालील भागात एक ५०-६० फुट खोल आयताकृती विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी कातळात खाचा कोरलेल्या असुन विहिरीच्या वरील बाजूस बुरुजातून बाहेर आलेले दोन दगडी खांब दिसतात. किल्ल्यातुन बाहेर न येता विहीरीतील पाणी काढण्यासाठी हि योजना केलेली आहे. विहीर पाहुन परत फिरल्यावर किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजातून प्रवेश करून किल्ला पहाण्यास सुरवात करावी. जांभा दगडांच्या घडीव चिऱ्यामध्ये बांधलेली किल्ल्याची तटबंदी आणि बुरूज आजही सुस्थितीत आहे पण बुरुज व तटबंदीमध्ये मोठमोठी झाडे वाढलेली असुन संपुर्ण किल्ला काटेरी झुडुपानी भरलेला आहे. दरवाजाची कमान ढासळलेली असुन त्याच्या दोन्ही बाजूंस असलेल्या पहारेक-याच्या देवड्या मात्र शिल्लक आहेत. किल्ल्याला समुद्राच्या बाजुला परकोटात पुर्वाभिमुख प्रवेशद्वार तसेच पठारावरून बालेकिल्ल्यात शिरणारे उत्तराभिमुख प्रवेशद्वार असे दोन मुख्य दरवाजे असुन परकोटातुन बालेकिल्ल्यात जाण्यासाठी एक दरवाजा व परकोटातुन खंदकात उतरण्यासाठी सध्या बंद असलेला दुसरा दरवाजा तसेच खाडीवरील तटबंदीतील लहान दरवाजा असे एकुण पाच दरवाजे पहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या बाजुने समुद्राकडे उतरत जाणाऱ्या परकोटाच्या तटबंदीतही लहान दरवाजा असण्याची शक्यता आहे पण किल्ल्यात मोठया प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडूपामुळे तेथवर प्रयत्न करूनही जाता येत नाही. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याचा पसारा सात एकर असुन बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ १ एकर तर परकोटाचे क्षेत्रफळ ६ एकर आहे. बालेकिल्ल्यात डाव्या बाजूस एका मोठया वास्तूचा चौथरा दिसून येतो. त्याच्यासमोर बालेकिल्ल्याच्या मध्यभागी एक उंच सुटा बुरूज असून पाय-यानी या बुरुजावर चढल्यावर एका वास्तुचा चौथरा दिसून येतो. या चौथऱ्यासमोर एक तुळशी वृंदावन आहे. हे तुळशी वृंदावन पहाता येथे असलेली इमारत म्हणजे राहण्याची वास्तु असावी. किल्ल्यावरील हि सर्वात उंच जागा असुन येथून संपूर्ण किल्ला व आसपासचा परीसर नजरेस पडतो. किल्ल्यावर वाढलेल्या प्रचंड झाडीमुळे येथुन समुद्राचे ओझरते दर्शन होते अन्यथा हि झाडी काढल्यास किल्ल्याचा समुद्राकडील भाग व तेथील दरवाजावर येथुन नजरेस पडतील. या बुरुजावरून खाली उतरून दरवाजाशेजारील पायऱ्यांनी वर चढुन बालेकिल्ल्याच्या संपुर्ण तटबंदीला फेरी मारता येते. बालेकिल्ल्यातील तटावर चढण्यासाठी एकुण पाच ठिकाणी पायऱ्या असुन मुख्य दरवाजावर चढुन मागील बाजुस परकोटातुन आत येणाऱ्या दरवाजाशेजारील पायऱ्यांनी खाली उतरता येते. मागील दरवाजाच्या या भागात दरवाजाशेजारी एक कोरडी अर्धवट बुजलेली विहीर असुन तटबंदीत दोन कोठारे दिसुन येतात. पडकोटाचा दरवाजा आजही सुस्थितीत असुन या वळणदार दरवाजासमोर रणमंडळाची रचना केलेली आहे. या दरवाजाच्या अलीकडे तटबंदीच्या कोपऱ्यावरील बुरुजाच्या आतील बाजूस गणेशमूर्ती व दोन कमळफुले कोरलेली आहेत. संपुर्ण किल्ल्याच्या भक्कम तटबंदीस चहूबाजूंनी एकुण २१ बुरुज असुन यातील ९ बुरुज बालेकिल्ल्याच्या तटबंदीत व उर्वरित १२ बुरुज पडकोटाच्या तटबंदीत आहेत. मुख्य दरवाजाशेजारी २, परकोटाच्या दरवाजाशेजारी २, दोन कोपऱ्यावर २, तटबंदीत २ व बालेकिल्ल्याच्या मध्यभागी एक सुटा बुरुज अशी बालेकिल्ल्याच्या बुरुजांची रचना आहे. बालेकिल्ल्यातील परकोटाच्या दरवाजाने बाहेर आल्यावर उजव्या बाजुला परकोटाची दुरवर गेलेली तटबंदी दिसते. या तटबंदीच्या टोकाला व मध्यभागी एक बुरुज असुन तटबंदीवर जाण्यासाठी एके ठिकाणी पायऱ्या आहेत. तटबंदीच्या बाहेरील बाजूस खंदक असुन कोपऱ्यावरील बुरुजावर तोफांचा मारा करण्यासाठी खिडक्या दिसतात पण या बुरुजावर जाणारी वाट मात्र दिसुन येत नाही. या बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या नष्ट झाल्या असाव्यात किंवा त्यावर शिडीने जाण्याची सोय असावी. या बुरुजापासून तसेच पडकोटाच्या दरवाजापासून खाली खाडीकडे उतरत जाणारी तटबंदी दिसते पण या वाटेवर दाट काटेरी झाडी असल्याने बुरुजांच्या टोकापर्यंत जाता येत नाही. हे पाहुन झाल्यावर बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडुन तटालगत समोरच असलेल्या आमराईतून खाडीकडे जाणाऱ्या पायऱ्यानी खाली उतरावे. या वाटेवर असलेल्या विहिरीच्या बाजूने खाडीवरील तटबंदीवर जाता येते. या भागात घेरा यशवंतगड हि १०-१२ घरांची लहानशी वाडी आहे. यशवंतगड समुद्राच्या बाजूनेही भक्कम तटबंदी व बुरूज बांधून अधिक बळकट केलेला दिसतो. पडकोटाच्या समुद्राकडील तटबंदीत लहानमोठे असे सात बुरुज असुन यातील एका मोठया बुरुजावर विश्वनाथ रघुनाथ पत्की यांचे मोडकळीस आलेले घर आहे. पुर्वी हा किल्ला पत्की यांच्या खाजगी मालकीचा होता पण १९१४ साली झालेल्या या गडाच्या खरेदी-विक्री करारानंतर शासनाने एक अधिसुचना जारी करून हा किल्ला ताब्यात घेतला. या बुरुजा शेजारी खाडीलगत असलेला मुख्य दरवाजा पुर्णपणे कोसळलेला असुन त्याचे केवळ अवशेष पहायला मिळतात. या भागात पुर्वी गलबते उभी करण्यासाठी धक्का असल्याचे अवशेष असुन आजही तेथे मासेमारीच्या स्थानिक बोटी दुरुस्तीसाठी उभ्या असतात. या तटबंदीच्या टोकाला एक लहानसा दरवाजा असुन बालेकिल्ल्यापासून खाली येणारी परकोटाची तटबंदी तेथे संपते. या तटबंदीच्या बाहेरील बाजुस कब्रस्तान आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. यशवंतगड पुर्णपणे फिरण्यासाठी सर्वप्रथम बालेकिल्ला व शेजारील परकोट पाहुन नंतर डोंगरउतारावरील खाडीच्या बाजुने असणारी तटबंदी पहावी. बालेकिल्ला ते परकोट असा संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी तीन तास लागतात. यशवंतगड कोणी आणि कधी बांधला याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही पण जैतापूर, राजापूर व , मुसाकाजी या बंदरांच्या संरक्षणासाठी व व्यापारावरील देखरेखीसाठी १६व्या शतकात जैतापूर खाडीच्या किनाऱ्यावर विजापूरकरांनी यशवंतगड किल्ला उभारला असावा. राजापूर बंदर व आसपासचा मुलूख ताब्यात आल्यावर या बंदराच्या संरक्षणासाठी आणि जैतापूर खाडीतून राजापूरकडे जाणाऱ्या बोटींवर नजर ठेवण्यासाठी यशवंतगड जिंकल्यानंतर शिवाजीमहाराजांनी महादरवाजा ते खाडीपर्यंत पडकोट अशी तटबंदी बांधली. नोव्हेंबर १६५९ मध्ये अफझल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी अफझल खानाची दाभोळ बंदरात असलेली मालाने भरलेली तीन गलबते ताब्यात घेण्यासाठी दोरोजी या सरदारास पाठविले. ही गलबते अफझल खानाचा सरदार महमूद शरीफ याच्या ताब्यात होती. विजापूरचा कोकणातील सुभेदार रुस्तमेज खान याचा महाराजांनी पराभव केल्याचे वृत्त राजापूरला समजले. महमूद शरीफने अफझलखानाची तीन गलबते राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याच्या ताब्यात दिली होती. रुस्तमेज खानाच्या पराभवाची बातमी समजताच घाबरलेले महमूद शरीफ व अब्दुल करीम जैतापूरला पळून गेले. पाठोपाठ दोरोजी सात-आठशे सैनिकांसह राजापूरला येऊन पोहोचला. गलबते जैतापूरला पळवून नेल्याचे समजताच त्याने पाच-सहाशे लोक राजापूरला ठेवून दोनशे लोक जैतापूरला पाठविले. जैतापूरला महमूद शरीफ व अब्दुल करीम यांनी राजापूरच्या इंग्रजांशी संधान साधून ती गलबते आपली आहेत म्हणून मराठय़ांना सांगावे असे राजापूर वखार प्रमुख बोलणे लावले. हेन्री रेव्हिंग्टनने एक गलबत ताब्यात घेऊन ते इंग्रजांचे असल्याचे खोटे दस्तऐवज तयार केले व उर्वरित दोन गलबते सुरत बंदरांकडे नेण्याचा सल्ला दिला. रेव्हिंग्टनच्या सल्ल्यानुसार महमूद शरीफ व अब्दुल करीम परतले पण जहाजावरील घाबरलेल्या खलाशांनी आपण शिवाजीची माणसे आहोत असे सांगुन बंड पुकारले. शरीफ व करीमला त्याच्याच लोकांनी जहाजात न घेतल्याने त्यांना वेंगुर्ल्यास डचांच्या आश्रयाखाली पळून जावे लागले. रेव्हिंग्टनचा खोटेपणा दोरोजीच्या लक्षात आला व अफझलखानाचा माल दोरोजीच्या ताब्यात द्यावा लागला. जैतापूरला आल्यावर जहाजावरील खलाशी मराठय़ांवर उलटले. हे सर्व रेव्हिंग्टनचे कारस्थान आहे हे लक्षात येताच दोरोजीने गिफर्ड व वेलजी या इंग्रज दलालास कैद करून खारेपाटण किल्ल्यात कैदेत ठेवले. राज्याभिषेकानंतर इ.स.१६७४ साली महाराजांनी जैतापूर किल्ल्याखालील बंदरात आरमार बांधण्याचे कार्य सुरू केले. १६९० साली हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. पुढे मराठय़ांच्या ताब्यातील हा किल्ला १८१८ मध्ये ब्रिटीश कर्नल इमलाक याने जिंकला. १८६२ मधील एका पाहणीत यशवंतगडावर २८ तोफा आढळल्या. १८ जानेवारी १८७१रोजी जनरल औट्रमची बोट वादळात या किल्ल्याखाली खाडीत जैतापूर द्वीपगृहाच्या उत्तरेस सहा कि.मी. वर असलेल्या एका खडकावर आपटून फुटली होती. १९ व्या शतकात रघुनाथ पत्की यांना इंग्रज सरकारची सेवा केल्याबद्दल हा किल्ला बक्षीसादाखल देण्यात आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!