YASHWANTGAD-REDI

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : SINDHUDURG

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्राच्या ७२० कि.मी. लांब किनारपट्टीवरील महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला म्हणून यशवंतगड ओळखला जातो. मॅगेनिजच्या खाणीमुळे व येथील स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्‌ध असणाऱ्या रेडी गावात हा दुर्ग वसलेला आहे. या किल्ल्यास एकापाठोपाठ एक अशी सहा दरवाजांची मालिका असुन गडाची तटबंदी-बुरुज व आतील मोठा वाडा, मंदिर, विहीर आजही सुस्थितीत आहेत. यशवंतगडास भेट देण्यासाठी वेंगुर्ल्याहून रेडी हे गाव गाठावे लागते. वेंगुर्ला ते रेडी हे अंतर २० कि.मी. आहे. रेडी गावातील विठ्ठल मंदिराच्या बाजूने जाणारा गाडी रस्ता आपल्याला थेट खाडीकिनारी असलेल्या गडाजवळ नेऊन सोडतो. एका लहानशा १५० फुट उंचीच्या टेकडावर यशवंतगड बांधलेला असुन सध्या दाट झाडीझुडपांमध्ये वेढलेला आहे. इथूनच पुढे झाडीत जाणाऱ्या पायवाटेने चालत गेल्यावर आपण गडाच्या भक्कम कमानीयुक्त दरवाजाजवळ पोहोचतो. या दरवाजाला लागुनच भक्कम असा बुरुज आहे. ... हे सर्व बांधकाम जांभ्या दगडामधे केलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. गडाच्या आत बाहेर मोठय़ाप्रमाणावर झाडी वाढलेली आहे. दरवाजाच्या आत शिरल्यावर डावीकडे बालेकिल्ल्याकडे जाणारी पायवाट आहे. ही पायवाट जाभ्यांदगडात बांधून काढलेली आहे. या वाटेने पुढे चालत गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजात येतो. त्याला काही पायऱ्याही आहेत. या दरवाजातून आत शिरल्यावर प्रथम आपल्या नजरेत भरतो तो संरक्षणासाठी दोन्ही बाजूने खोदलेला २० फुटाचा खोल खंदक. हा खंदक पूर्ण बालेकिल्ल्याच्या भोवती खणला आहे. तर समोरच एक दरवाजा आणि बुरुज दिसतो. यानंतर लगेच समोर एक भक्कम बांधणीचा दरवाजा दिसतो. हा दरवाजा वैशिष्ट्यपूर्ण असुन मुख्य दरवाजा बंद असल्यास आत प्रवेश करण्यासाठी या दरवाजा शेजारी लहान दिंडी दरवाजा बांधलेला आहे. इथून आत येताच दोन्ही बाजूस असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात तर समोर तीन ओवऱ्या असून पुढील मार्ग कातळ कोरुन तयार केलेला आहे. बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाजामधील जागेत बंदिस्त चौक आहे. ही कमानयुक्त बांधणीची जागा बांधून सरंक्षणाच्या दृष्टीने तिची रचना केलेली आहे. या बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या आत देवडय़ा या चौकापर्यंत परवानगी शिवाय कोणी पोहोचू शकणार नाही अशी सर्व व्यवस्था जाणीवपूर्वक केलेली आहे. येथे समोरच बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाचे गोलाकार बुरुज आवर्जून पाहण्यासारखे आहेत. या गोलाकार बुरुजांमुळे दरवाजाच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. या दरवाजाच्या आत देखील देवड्या आहेत व पुढील मार्ग कातळात कोरलेला आहे. याच मार्गाने पुढे गेल्यावर डावीकडे एक भव्य इमारत दिसते. हीच गडावरची राजवाड्याची इमारत. थोडं पुढे गेल्यावर एका कमानयुक्त प्रवेशद्वारातून आपण भव्य राजवाड्यात प्रवेश करतो. हा राजवाडा म्हणजे एक भुलभुलैय्याच आहे. त्यामुळे आपण कुठून आलो आणि कुठून बाहेर पडलो. हे कळतच नाही. या राजवाड्यात सभागृहासारखी दोन प्रशस्त दालने आहेत. तळमजल्यावर अनेक खोल्या आहेत. इमारतीचा पहिला व दुसरा मजला शाबून नाही. पण तूळ्यांसाठी भिंतीत असलेल्या खाचा, पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या उंचीवर असलेले दरवाजे, खिडक्या, कोनाडे, झरोके पाहाता येतात. या इमारतीच्या भिंतीवर वाढलेल्या वृक्षांच्या मुळांमुळे अनेक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार झालेले आहेत. इमारतीच्या एका चौकात २०×२० फूट आकाराचा हौद असून त्यात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. हौदाच्या काठावर दगडी स्तंभ असून त्यावर चुन्यात रेखलेली पानफूल आहेत. अशा या सुंदर आणि प्रशस्त राजवाड्यातून आपण तटबंदीकडे चालत जातो. तटबंदीवर झाडी खूप वाढल्यामुळे तटबंदीवर फरी मारता येत नाही. या तटबंदीवरुन फेरी मारताना काही ठिकाणी पंचविस ते तीस फुट उंचीची तटबंदी आहे. शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या केलेल्या दिसतात तसेच मजबूत बुरुजही दिसतात. उत्तरेकडील व पूर्वेकडील तटात आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण पहार्या च्या जागा पाहायला मिळतात. तटाच्या आत जाण्यासाठी चोर दरवाजांप्रमाणे छोटे दरवाजे ठेवलेले आहेत. त्याच्या आत ३ फूट उंच भिंतीचा आडोसा केला असून त्या भिंतीच्या आड बसून दूर पर्यंतच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. तटबंदीवर वाढलेल्या झाडीमुळे मात्र त्यांची पार रया गेलेली आहे. तटबंदीकडे जात असताना वाटेत एक आयताकृती मोठी विहीर लागते. या विहिरीत उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत. पण पुढे फक्त माती असल्यामुळे सांभाळतच पुढे जावे लागते. विहीर पाहून तटावरून गड-फेरी चालू ठेवत, बुरुज-जंग्या पाहत, सिंधुसागाराचे-पुळणीचे तसेच केरवाडा येथील नौकांचे दर्शन घेत आपण एका बुरुजापाशी येतो. या तटाजवळ तटबंदीत पहारेकर्यांसाठी बांधलेल्या दोन खोल्या आहेत. या खोल्या पाहून परत तटफेरी चालू ठेवत. आपण एका भव्य अशा मोठ्या भक्कम बुरुजावर येतो. इथून मधल्या भागामधे भव्य वाडा त्याच्या काही भिंतीसकट उभा असलेला दिसतो. त्याचे दरवाजे, तुळ्या कालौघात नामशेष झालेले असले तरी वाडय़ाची भव्यता लक्षवेधक आहे तसेच रेडी बंदरापासून खाडीपलीकडील केरवाडा पर्यंतचा परिसर दिसतो. उत्तर बुरुजावरुन अरबी समुद्र व रेडीची खाडी यांच्या संगमाचे अप्रतिम दृश्य दिसते. इथून पुढे चालत आपण बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या माथ्यावर येतो. इथल्या खिडकीतून बंदिस्त चौकाचे आणि तिसऱ्या दरवाजाचे दर्शन होते. पुढे तटावर झाडी माजल्यामुळे जास्त फेरी मारता येत नाही. पुढे फक्त एक बुरुज पाहून व प्रस्तराने खाली उतरून दरवाज्यापाशी येतो. इथे आपली बालेकिल्ल्याची फेरी संपते व परत आपण किल्ल्याच्या खालील भागात येतो. येथुन वाटेने समुद्रकिनाऱ्याकडे चालत गेल्यास एक अर्धा फुटका बुरुज लागतो. हा बुरुज चढून वर गेल्यावर समोरच जांभ्या दगडात कोरलेली गणेशाचे भग्न शिल्प दिसते. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिल्प व रेडी गावातील प्रसिद्ध गणेशमूर्ती हुबेहूब आहेत. बाप्पाचे दर्शन घेऊन पुढे चालत गेल्यावर एक छोटेखानी विहीर लागते. या विहीरीत उतरण्यासाठी चार पायऱ्या आहेत. स्थानिक लोक या विहिरीला घोड्याची विहीर संबोधतात. तिथेच वाटेत एक अजून कोरडी विहीर आहे. हे सर्व पाहुन आपण एका लहान दरवाजाने समुद्रावर बाहेर पडतो. यशवंतगडावरून समुद्रकिनाऱ्याचे फार सुंदर दर्शन होते. संपुर्ण यशवंतगड फिरण्यास दोन ते अडीच तास लागतात. प्राचीन काळापासून कोकणातील बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. त्यापैकीच एक महत्त्वाचे बंदर होते रेडी. प्राचीनकाळी रेडी गाव ‘रेवतीद्वीप’ या नावाने ओळखले जाई. इ.स. ६१० ते ६११ मध्ये चालुक्य राजा स्वामी याचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. येथील सागरी व्यापारावर तसेच खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याकाळी यशवंतगड उभारला गेला. त्यानंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा किल्ला सावंतवाडीच्या सावंतांच्या ताब्यात आला. इ.स. १६६४ मध्ये आदिलशहाचे मांडलिक असलेल्या वाडीकर सावंतांकडून शिवाजी महाराजांनी यशवंतगड जिंकून घेतला आणि त्याची डागडुजी केली पण नंतर तो पुन्हा वाडीकर सावंताकडे गेला. सन १८१७ च्या सुमारास पोर्तुगिजांनी हा किल्ला घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांना फोंड सावंतांकडून हार पत्करावी लागली. पुढे हा किल्ला वाडीकर सावंत-भोसले, पोर्तुगीज, डच, करवीर छत्रपती या सत्तांच्या ताब्यात राहीला. ह्याच्यानंतर दोनच वर्षांनी इंग्रजांनी संभाजी सावंताकडून ह्या भागातील छापेमारी थांबवण्याच्या बतावणीवर इ.स.१८१८ मध्ये यशवंतगड घेतला आणि तो ब्रिटीश सत्तेखाली गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!