WATHAR-NIMBALKAR
TYPE : GADHI/ NAGARKOT
DISTRICT : SATARA
HEIGHT : 0
GRADE : EASY
फलटणचा इतिहास व ऐतिहासिक वास्तु म्हणजे निंबाळकर याचा प्रत्यय आपल्याला फलटण फिरताना जागोजाग दिसुन येतो. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात वाठार निंबाळकर येथील राजे नाईक निंबाळकर यांची किल्लेवजा गढी महाराष्ट्रात असलेल्या इतर सर्व गढीपेक्षा खूपच वेगळी आहे. येथे केवळ एक स्वतंत्र गढी नसुन तटाबुरुजांनी सजलेल्या सहा स्वतंत्र गढ्या व दोन मंदिरे असुन हि सर्व ठिकाणे एका मुख्य तटबंदीच्या आत सामावली आहेत. बांधकाम सौंदर्याने सजलेल्या या वास्तु आज दुर्दशेच्या फेऱ्यात सापडुन नष्ट होत आहे. यात केवळ एक गढी याला अपवाद आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अनेक वतनदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोट व गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता.
...
वतने खालसा झाल्याने खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढी कोट उध्वस्त होत चालले आहेत. स्थानिकांची या वास्तुबाबत असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. आंतरजाल व इतर कोणत्याही पुस्तकात या गढीची माहिती सापडत नसल्याने या किल्लेवजा गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. वाठार निंबाळकर हे ठिकाण पुण्यापासुन सासवड-जेजुरी-निरा-लोणंदमार्गे १०४ कि.मी. अंतरावर असुन साताऱ्यापासून ६० कि.मी. अंतरावर आहे तर फलटणपासुन हे अंतर केवळ ९ कि.मी. आहे. वाठार व वाठार निंबाळकर हि दोन्ही ठिकाणे वेगवेगळी असुन यात ३२ कि.मी अंतर असल्याने स्थान निश्चित करताना वाठार निंबाळकर असा स्पष्ट उल्लेख करावा. वाठार गावात नदीकाठी हि गढी असुन या संपुर्ण गढीचा परीसर जवळपास २५ एकर आहे. गढीच्या पश्चिम भागात असलेल्या नदीवर बंधारा घालुन नदीचे पाणी अडविल्याने पश्चिमेकडून गढीला नैसर्गीक खंदक लाभला आहे. यामुळे गढीची अर्ध्यापेक्षा जास्त तटबंदी सुरक्षित झाली आहे. गढीच्या उत्तरेस गढीचा मुख्य दरवाजा असुन दक्षिणेस दुसरा दरवाजा आहे. सध्या या तटबंदीतुन पश्चिमेला नव्याने वाट काढली आहे. गढीचे तटबंदी बुरुजाचे बांधकाम व भव्य दरवाजा आजही या वास्तुच्या भव्यतेची साक्ष देतात. गढीचा दगडी बांधणीतील उत्तराभिमुख कमानीदार दरवाजा २०-२२ फुट उंच असुन याच्या लाकडी दारावर अणकुचीदार खिळे ठोकले आहेत. गढीची बुरुज व तटबंदी घडीव दगडात बांधलेली असुन त्यामध्ये बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर समोरच या कोटाच्या मध्यभागी असलेली मुख्य गढी दिसुन येते. या गढीचा दरवाजा समोरून दिसू नये यासाठी आडवी भिंत घातलेली आहे. कोटात अशा एकुण सहा गढ्या व एक मंदिर असुन मुख्य गढीचा परीसर दिड एकरचा तर उर्वरित गढ्यांचा परीसर प्रत्येकी एक एकरचा आहे तर मंदिर परीसर अर्धा एकर आहे. या सर्व वास्तुना वेगळी तटबंदी असुन प्रत्येकी स्वतंत्र पाणी व्यवस्था आहे. दरवाजातून आत शिरल्यावर सर्वप्रथम उजवीकडील तटबंदीत असलेले राममंदिर पाहुन घ्यावे. हे मंदिर म्हणजे मध्ययुगीन मंदिर स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. चारही बाजूस प्राकार म्हणजे तट असलेल्या या मंदिराचे गर्भगृह व सभामंडप असे दोन भाग असुन गर्भगृह दगडाचे तर सभामंडप लाकडी बांधणीतील आहे. मंदिराच्या आतील भागात दोन शिलालेख असुन सभामंडपातील लाकडावरील कोरीवकाम व चित्रकला अतिशय सुंदर आहे पण ते आज कोसळण्याच्या स्थितीत आहे. मंदिराच्या आवारात एक कमान व पायऱ्या असलेली मोठी विहीर असुन त्यातील पाणी मोटेने काढुन पाटाने मंदिराच्या आवारात फिरवलेले आहे. मंदिराच्या तटाला असणारे कोनाडे व वासे रोवण्याच्या खाचा पहाता येथे मोठया प्रमाणात राहण्याची सोय असावी. मंदीरासमोर दोन घुमटी असुन यातील एका घुमटीत हनुमानाची मुर्ती आहे. याशिवाय मंदिराच्या दक्षिण बाजुस एक लहान दरवाजा व दुहेरी पोकळ तटबंदी असुन त्याचे नेमके प्रयोजन ध्यानात येत नाही. मंदिर पाहुन झाल्यावर मुख्य गढीत जाण्यापूर्वी डावीकडील वाडा पाहुन घ्यावा. या वाडयाच्या आतील बाजूस असलेल्या दरवाजावरील दुमजली वास्तु आजही चांगल्या स्थितीत असुन दुसरा दरवाजा बाहेरील तटबंदीत आहे. या वाडयाच्या संपुर्ण तटबंदीत कोनाडे असुन त्यासमोर जोते दिसुन येते. वाड्याच्या मध्यभागी एक आयताकृती लहान विहीर असुन इतर अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. वाड्याचे उध्वस्त बांधकाम पहाता हा वाडा दुमजली असावा. हा वाडा पाहुन झाल्यावर समोरील मुख्य गढीकडे निघावे. कोटात असलेल्या ६ गढीपैकी हि गढी आकाराने सर्वात मोठी असुन इतर गढीच्या मानाने आजही सुस्थितीत आहे. चौकोनी आकाराच्या या गढीत चार टोकाला चार तटबंदीच्या मध्यभागी प्रत्येकी एक व दरवाजा शेजारी दोन असे एकुण ९ बुरुज असुन हि गढी नऊ बुरुजांचा वाडा म्हणुन ओळखली जाते. गढीचा उत्तर दरवाजा साधारण १५ फुट उंच असुन त्यातील लाकडी दार आजही शिल्लक आहे. या दरवाजाला लहान दिंडी दरवाजा असुन दरवाजाच्या वरील बाजूस नगारखान्याची इमारत आहे. गढीची तटबंदी व बुरुज घडीव दगडात बांधलेले असुन त्यात बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन आतील बाजुने वाडयाच्या वरील भागात जाण्यासाठी दोन बाजुना जिने आहेत. गढीतील वाडा पुंर्णपणे कोसळलेला असुन केवळ दरवाजा शेजारील अवशेष शिल्लक आहेत. हे अवशेष पहाता मूळ वाडा चार मजली असल्याचे दिसुन येते. गढीच्या आत मोठया प्रमाणात काटेरी जंगल वाढले असल्याने त्यातुन मार्ग काढत आत फिरावे लागते. गढीची बुरुज तटबंदी आजही पुर्णपणे शिल्लक असुन तटावरून फेरी मारता येते. गढीच्या पुर्व बाजूस म्हणजे उजवीकडे असलेल्या तटबंदीत तटावर जाण्यासाठी पायऱ्या असुन या पायऱ्या जवळील बुरुजावर एक पिराचे ठाणे आहे. येथे ध्वज फडकवण्याची जागा दिसुन येते. याशिवाय गढीच्या आत कमान व पायऱ्या असलेली एक चौकोनी विहीर असुन पश्चिमेकडील तटबंदीत संकटकाळी बाहेर जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. दोन बुरुजांच्या खाली व वरील भागात खोल्या असुन गढीच्या आत मोठया प्रमाणात घराची जोती दिसुन येतात. हि गढी पाहुन मुख्य दरवाजाने बाहेर आल्यावर या गढीच्या मागे असलेल्या उजवीकडील तिसऱ्या गढीकडे निघायचे. या गढीची रचना मुख्य गढीसारखीच असुन सात बुरुज असलेल्या या गढीत काही प्रमाणात वाड्याचे अवशेष दिसुन येतात पण आत मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढली असल्याने आत फिरता येत नाही. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस असलेल्या बंदिस्त जिन्याने तटावर गेले असता संपुर्ण गढी व बाहेरच्या कोटाचा तसेच आसपासचा परीसर नजरेस पडतो. या गढीतील अवशेष पहाता हा वाडा तीन मजली असावा. हि गढी पाहुन बाहेर आल्यावर सरळ जाऊन येथील घरामधून डावीकडे वळावे. या वाटेच्या टोकाला कोटाचा दुसरा दक्षिण दरवाजा आहे. या भागात नदीच्या बाजुने असलेली कोटाची बाहेरील तटबंदी व बुरुज पहायला मिळतात. येथे तटाबाहेर एक मोठी दगडी बांधणीची विहीर असुन या विहिरीचे वैशिष्ट म्हणजे या विहिरीत उतरण्यासाठी कोटाच्या आतील बाजुने पायऱ्या असुन कोटाबाहेरून देखील या विहिरीचे पाणी काढता येते. हे पाहुन झाल्यावर परत जाताना वाटेत उजवीकडे आपल्याला चौथ्या गढीचे उध्वस्त अवशेष जागोजाग दिसुन येतात. या गढीचे चारही बुरुज व दरवाजा शिल्लक असुन आतील बाजूस असलेली तटबंदी पुर्णपणे ढासळली आहे व त्यावर नव्याने घरे झाली आहेत. या वाटेवर आपल्याला एक समाधी व विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर पाह्यला मिळते. येथुन पुढे आल्यावर आपल्याला उजवीकडे पाचवी गढी पहायला मिळते. हि गढी आजही तिच्या मूळ स्वरुपात जतन केलेली असुन एक निंबाळकर परीवार तेथे वास्तव्यास आहे. गढीत राहत असल्याने आत मर्यादित प्रवेश दिला जातो. या गढीच्या आवारात दोन लहान मंदिरे असुन त्यावरील कळस मात्र चुन्यात बांधले आहेत. या गढीच्या पुढील बाजूस सहावी गढी असुन या गढीच्या दरवाजावर दगड रचुन आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. येथे आपली कोटाची प्रदक्षिणा पूर्ण होते. संपुर्ण कोट व सहा गढी पहाण्यास तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागतो पण गढी या प्रकारात वेगळे काही पाहिल्याचे समाधान मनाला मिळुन जाते. महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणचे निंबाळकर घराणे फार जुनें असून सुमारे साडेसातशें वर्षापासुन हे घराणे महाराष्ट्रात आहे. वाठार गाव छत्रपती शिवरायांच्या काळापासून अस्तित्वात असुन छत्रपती शाहूराजे यांनी या गावची निमपाटीलकी भोईटे घराण्याला दिली होती. आदर्की खुर्द हे निंबाळकर घराण्याची पाटीलकी असणारे गाव होते. येथे छत्रपती शाहू यांच्या काळात १७०७-४९ च्या दरम्यान संताजी निंबाळकर यांचा उल्लेख येतो. येथे मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांचा वाडा होता. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने यामध्ये वाठारजवळ असलेल्या सालपे घाटात निंबाळकर-जाधव यांच्यात लढाई झाल्याची नोंद आहे. धनाजी जाधवांच्या मृत्यूनंतर १७११च्या सुरवातीस चंद्रसेन जाधव हे शाहूचा पक्ष सोडुन कोल्हापुरास जात असता छत्रपती शाहू यांच्या आज्ञेवरून हैबतराव निंबाळकर हे चंद्रसेन जाधव यांच्यावर चालून गेले. हि लढाई मार्च-एप्रिल दरम्यान आदर्कीच्या घाटाखाली झाली.
© Suresh Nimbalkar