WAI KOT

TYPE : CITY/GROUND FORT

DISTRICT : SATARA

HEIGHT : 0

GRADE : EASY

कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या वाई शहराची महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख आहे. कृष्णा नदीवर असलेला प्रशस्त घाट व वाई शहरात असलेली शंभराहून अधिक लहान-मोठी मंदिरे यामुळे वाई शहराला हि ओळख मिळालेली आहे. सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले हे शहर अठरा-एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. नानासाहेब पेशव्यांचे सासरे सरदार रास्ते यांनी उभारलेलं ढोल्या गणपतीच्या देऊळामुळे वाईला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. पण याचबरोबर वाईत आणखी दोन ऐतिहासिक महत्वाच्य वास्तु होत्या. त्या म्हणजे वाईचा नगरदुर्ग व वाईचा भुईकोट किल्ला. या दोन्ही वास्तुबद्दल आजही दुर्गप्रेमीना फारशी माहिती नाही. यातील वाईचा भुईकोट हा शिवकाळात अस्तित्वात होता तर वाईचा नगरदुर्ग हा पेशवेकाळात उभारण्यात आला. वाई परीसरातील दुर्गभ्रमंती करताना तसेच पाचगणी-महाबळेश्वर येथे सहलीला जाताना वाई शहरातुन जावे लागत असले तरी या कोटांची माहीती नसल्याने कोणीही दुर्गप्रेमी या कोटांकडे वळत नाहीत. अशा या अपरीचीत कोटांची आज आपण भटकंती करणार आहोत. ... साताऱ्याच्या उत्तरेस ३२ कि.मी.तर पुण्याच्या दक्षिणेस ८८ कि.मी. अंतरावर कृष्णा नदीकाठी वाई शहर वसले आहे. आज आपण पाहतो त्या वाई शहराचा विस्तार पेशवेकाळात झाला असुन शिवकाळात हे वाई शहर आजच्या वाई शहराच्या दक्षिण बाजुस मर्यादित स्वरूपात होते व येथे म्हणजे आजच्या रविवार पेठेत वाईचा भुईकोट होता. या भुईकोटात अफझलखानचा वाडा असुन आजही या वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. या वाड्याच्या तटबंदीत मंदीराचे घडीव दगड वापरलेले दिसुन येतात. वाड्यापासुन काही अंतरावर असलेल्या ओढ्याच्या काठावर कोटाची तटबंदी असुन येथे वाढलेल्या झाडीझुडपात ती झाकली गेली आहे. येथुन ५०० पाउले फुलेनगरच्या दिशेने गेल्यास वस्तीत असलेल्या मस्जिदी शेजारी कोटाची तटबंदी,त्यावरील चर्या आणि बुरुज पहायला मिळतात. याशिवाय वाटेत एक अर्धवट कोसळलेला बुरुज असुन त्यावर कबर बांधण्यात आली आहे. अफझलखानचा मुक्काम वाईत असताना याच कोटात झाला असावा. याशिवाय सतराव्या शतकातील दोन मशिदी आजही येथे सुस्थितीत आहेत. शिवकाळातच हा कोट नष्ट झाल्याने याचे अवशेष फार कमी असावेत व उरलेल्या अवशेषांचा वाढत्या वस्तीने घास घेतला यात काहीच शंका नाही. वाईतील दुसरी ऐतिहासिक वास्तु म्हणजे पेशवेकाळात वाई शहराचे रक्षण करण्यासाठी बांधलेला वाईचा नगरदुर्ग. वाढलेल्या शहराने या कोटाच्या वेशी व तटबंदीचा घास घेतला असुन कोटाचे फारच कमी अवशेष शिल्लक आहेत. पेशवे काळात वाई शहरात प्रवेश प्रवेश करण्यासाठी एकुण नऊ वेशी होत्या. यातील केवळ चार वेशी शिल्लक असुन उर्वरीत पाच वेशी पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. यातील एक वेस मेणवली गावाच्या दिशेने असुन उर्वरीत तीन वेशी या कृष्णा नदीघाटाच्या दिशेने आहेत. नदीकाठच्या दिशेने शहर वाढण्यास जागा नसल्याने या वेशी शिल्लक राहिल्या आहेत. या नगरदुर्गाची भटकंती करताना मेणवली वेशीपासुन केल्यास फारशी शोधाशोध ण करता सलगपणे बरेचसे अवशेष पाहुन होतात. मेणवली वेस हि वाई शहरातुन मेणवली गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असुन या रस्त्यावरील वाहतुक या वेशीतुनच होते. या वेशीचे तळातील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. वेशीचा लाकडी दरवाजा आजही शिल्लक असुन त्यात लहान दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या वरील बाजुस बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. हा दरवाजा पाहुन झाल्यावर दरवाजाच्या आत उजवीकडे असलेल्या रस्त्याने नदीकाठाच्या दिशेने निघावे. या वाटेवर आता शासकीय मुद्रणालय असलेला जुना चौबुर्जी वाडा आहे. येथुन पुढे गेल्यावर एका मध्यम आकाराच्या दरवाजातुन आपण कोटाबाहेर कृष्णा नदीच्या दगडी घाटावर येतो. या घाटावरून आपल्या पुढील फेरीस सुरवात केल्यावर सर्वप्रथम येते ती गंगावेस. हि वेस दोन बुरुजात बांधलेली असुन दरवाजाच्या खालील भागात घडीव दगडांचा तर वरील भागात विटांचा वापर केलेला आहे. वेशीचा लाकडी दरवाजा आजही शिल्लक असुन त्यात लहान दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन दरवाजाच्या वरील भागात बंदुकीच्या गोळ्या झाडण्यासाठी जंग्या आहेत. हा दरवाजा पाहुन नदीच्या घाटावरून सरळ पुढे गेल्यास आपण नदीकाठावरील कोटाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दरवाजात येतो. या दरवाजाच्या अलीकडे तटबंदीत एक गोलाकार बुरुज बांधलेला असुन दरवाजाला लागुन दुसऱ्या बाजुस तीन मजली वाडा आहे. दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन त्यात लहान दिंडी दरवाजा आहे. हे दरवाजे पाहुन झाल्यावर गणपती घाटावर यावे व तेथुन आपले उर्वरीत दुर्गदर्शन सुरु करावे. गणपती घाटावर इ.स. १७६२ साली पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी वाईतील गणपतीचे सर्वात मोठे व भव्य मंदिर बांधले. हि मुर्ती बैठ्या स्वरूपातील असुन ६ फूट उंच व ७ फूट रुंद आहे. या रुंदीमुळेच हा गणपती ढोल्या गणपती म्हणुन ओळखला जातो. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे. गणपती मंदिराजवळ काशिविश्वेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. मंदिराभोवती प्राकाराची भिंत असुन त्यात पुर्वेस महादरवाजा व त्यावर नगारखाना आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा व नंदी मंडप असुन नंदी मंडपात नंदीची भव्य मूर्ती आहे. या शिवाय वाई शहराची व नदीकाठची भटकंती करताना सिध्देश्वर, गंगारामेश्वर, लक्ष्मी नारायण, रोकडोबा हनुमान,हरिहरेश्वर, अंबाबाई , वाकेश्वर यासारखी असंख्य मंदीरे पहायला मिळतात. नगरदुर्गाचा हा संपुर्ण परीसर फिरण्यास साधारण दोन तास लागतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते वाई म्हणजे विणकर लोकांची वस्ती होती. वाईचा फार प्राचीन इतिहास ज्ञात नाही पण स्कंदपुराणातील कृष्णामहात्म्यात वाईचा उल्लेख वैराजक्षेत्र असा येतो. याशिवाय विराटनगर नावानेही हे शहर परिचित होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते वायदेश शब्दातील वाय (कोष्टी) या शब्दावरून या शहरास वाई हे नाव पडले असावे तर डॉ. ह. वि. संकलिया यांच्या मते इ.स.आठव्या शतकातील वायी या गावाचे नाव अपभ्रंशाने वाई असे झाले. पुरातत्त्वीय सर्वेक्षणांत सापडलेल्या अवशेषांवरून वाई हे इ. स. पू. २०० ते इ. स. ३०० या काळात सातवाहन राजांच्या अंमलाखाली असावे. वाईपासुन सहा कि.मी. अंतरावर असलेल्या लोहारे गावातील हीनयान लेण्या याची साक्ष देतात. वाई परिसरात असलेले पांडवगड, वैराटगड, कमळगड, चंदन-वंदन हे गिरीदुर्ग शिलाहारांनी बांधलेले असुन इ.स. ९०० ते १३०० या काळात या प्रदेशावर शिलाहारांची सत्ता असावी असाही कयास आहे. बहामणीकाळात पहिला बहमनी सुलतान अहमदशाह वली (१४२२ – १४३६) याने मलिकउत्तुजार यास महाराष्ट्रात पाठविले. त्याने १४२९ मध्ये वाई परिसरातील किल्ले घेऊन वाई येथे बहमनींचे लष्करी ठाणे वसवले. यानंतर महमूद गवानच्या इ.स. १४६९ मधील कोकण स्वारीत वायदेशातील काही शिपाई होते. यानंतर वाईचा ताबा विजापूरच्या आदिलशहाकडे आला. इ.स.१६४९ – १६५९ दरम्यान आदिलशाही सरदार अफझलखान हा वाईचा सुभेदार होता. प्रतापगडाच्या युद्धात अफझलखानाचा वध झाल्यानंतर (१६५९) वाई काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होती पण हा ताबा फार काळ टिकला नाही. अफझलखानानंतर येथे सय्यद इलियास शर्झाखान याची सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. शिवाजी महाराजांनी इ.स.१६७४ मध्ये हा संपुर्ण प्रदेश ताब्यात घेऊन येसाजी मल्हार यास येथे सुभेदार नेमले. संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता. या काळात शर्झाखानबरोबरच्या युद्धात (१६८७) सेनापती हंबीरराव मोहिते वाईजवळच केंजळ परिसरात मारले गेले. नंतर १६८९ मध्ये वाई मोगलांच्या ताब्यात गेले. संताजी घोरपडे, रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांनी मोगलांबरोबर लढा देऊन पुन्हा वाई काबीज करून तेथे मराठ्यांचे ठाणे केले. शाहु महाराजांच्या काळात (१७०७– १७४९) वाईवर काही काळ मोगल व मराठे असा दुतर्फी अंमल होता. साताऱ्यातील सावकार भिकाजी रास्ते (नाईक) यांनी नानासाहेब पेशवे यांना आपली मुलगी गोपिकाबाई दिली आणि रास्ते-पेशवे नातेसंबंध निर्माण झाले. रास्ते हे उत्तर पेशवाईत (१७६१ – १८१८) वाईत स्थायिक झाले व त्यांनी वाईचा सर्वांगीण विकास केला. रास्ते यांनी कृष्णाकाठावर अनेक फरसबंद घाट तसेच उमामहेश्वर, महागणपती, काशीविश्वेश्वर, गोविंद-रामेश्वर, विष्णू, लक्ष्मी, भद्रेश्वर, केदारेश्वर यासारखी सुरेख मंदिरे उभारली.त्यामुळे वाईची दक्षिण काशी अशी ओळख निर्माण झाली. किवरा ओढ्यावर छोटी धरणे बांधून बागायतीस उत्तेजन दिले व पिण्याच्या पाण्याची सोय केली. वाई येथे राणी लक्ष्मीबाईचा जन्म झाला तसेच नाना फडणवीस यांच्यामुळे प्रसिद्धीस आलेले मेणवली गाव येथुन काही अंतरावरच आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!