WADALA BURUJ

TYPE : SINGLE BASTION

DISTRICT : MUMBAI

HEIGHT : 0

GRADE : EASY

भारत देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई म्हणजे सात बेटांचा समुह असलेले शहर. या मुंबई बेटांवर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. मुंबई बेटांचा प्रथम लिखित उल्लेख इजिप्शियन भूगोलतज्ञ टॉलमी याने इ.स.१५० मध्ये केला.सातवाहन काळात मुंबई बेटांवरुन परदेशांशी व्यापार चालत असे.इ.स. ५-६ व्या शतकात या भागावर मौर्य कुळाचे राज्य होते व त्यांची राजधानी होती ‘पुरी‘ म्हणजे आजचे घारापुरी बेट. मौर्यांनंतर चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव ह्या राजघराण्यांनी मुंबईवर राज्य केले. इ.स.११४० मध्ये गुजरातच्या प्रतापबिंबाने शिलाहारांचा पराभव करुन महिकावती उर्फ माहीम येथे आपली राजधानी वसवली. इ.स. १३२० मध्ये गुजरातचा सुलतान मुबारक शहाने मुंबई जिंकली. पोर्तुगिज व गुजरातचा शेवटचा सुलतान बहादूरशहा यांच्यात १५३४मध्ये झालेल्या तहात दमण पासून मुंबई पर्यंतचा प्रदेश पोर्तुगिजांच्या ताब्यात आला व उत्तर कोकणचा हा भाग फिरंगाण म्हणुन ओळखला जाऊ लागला. १६६२ साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगिज राजकन्या ब्रगांझा हिच्याशी झाले, त्यात मुंबई बेट आंदण म्हणून इंग्रजांना मिळाली व मुंबई शहराचे रूप बदलण्यास सुरवात झाली. मुंबईवर नांदलेल्या या सर्व राजसत्तांनी आपल्या प्रदेशाच्या रक्षणासाठी व शत्रुला रोखण्यासाठी सागर किनारी किल्ल्यांची साखळी निर्माण केली. ... मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर वरळी.माहीम,बांद्रा,मढ हे किल्ले तर दक्षिणेकडील किनारपट्टीवर काळाकिल्ला रीवा किल्ला,सायन किल्ला या किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली.पुर्वेला शिवडी,माझगाव, डोंगरी आणि बॉम्बे फोर्ट मुंबईचे रक्षण करत होते. यातील बहुतांशी किल्ल्यांची बांधणी पोर्तुगीज व ब्रिटीश यांच्या वेगवेगळ्या कालखंडात करण्यात आली. मराठा व सिद्दी यांना शत्रु मानणाऱ्या पोर्तुगीज आणि ब्रिटिशांनी या शत्रूंना रोखण्यासाठी व आपला प्रदेश संरक्षित राखण्यासाठी ठराविक अंतरावर बुरुज उभारले होते. आजही मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर आपल्याला मढजवळील अम्बोवा व दानापानी येथे असे एकांडे बुरुज पहायला मिळतात. १८१२ व १८४३ च्या ब्रिटीशांच्या नकाशात मुंबईच्या पुर्व किनाऱ्यावर टॉवर असल्याचे उल्लेख येतात पण त्याची स्थाननिश्चिती होत नव्हती आणी अचानकपणे वडाळ्यात एका ठिकाणी बांधकाम सुरू असता वर्षानुवर्ष झाडीत आणि अर्ध्याहून अधिक मातीत गाढला गेलेला एक बुरुज आढळून आला. एका रस्त्यालगत बांधकामासाठी साफसफाई सुरू असताना स्थानिकांना तिथे दगड व चुन्यात बांधलेले एक जुने गोलाकार बांधकाम दिसून आले. वर्षानुवर्षे माती आणि झाडांचा पालापाचोळा साठल्याने हा बुरूज नजरेआड झाला होता. परदेशात मॉर्टेलो टॉवर म्हणुन ओळखले जाणारे हे एकांडे बुरुज म्हणजे पोर्तुगीजांचे दुर्गस्थापत्य. मुंबईच्या पुर्व सागरी किनाऱ्याहुन सायन किल्ल्याकडे जाणाऱ्या खाडीच्या काठी बांधलेला हा बुरुज सायन किल्ला व शिवडी किल्ला यांच्या मध्यभागी आहे. सायन किल्ल्याकडे जाणाऱ्या गलबताना अटकाव करण्यासाठी तसेच पनवेल, उरण, ठाणे, घारापुरी या परिसरात वावरणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजाचा उपयोग होत असावा. आता आपण थोडे बुरुजाच्या बांधकामाकडे वळूया. खाडीकाठी असलेल्या गोलाकार आकाराच्या या बुरुजाचा व्यास साधारण ५० फुट असुन याचे बांधकाम घडीव तसेच ओबडधोबड दगडात केलेले आहे.बांधकाम सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला असुन बुरुजातील बांधकामात वासा रोवण्यासाठी असलेल्या दगडी खाचा पहाता हा बुरुज दुमजली असावा. शिल्लक असलेल्या बुरुजाच्या वरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत तर आतील भागात आयताकृती आकाराचे १२ x ६ फुट लांबीरुंदी असलेले ८ फुट खोल टाके आहे. बुरुज खाडीच्या दलदलीच्या भागात असल्याने आतील बाजुस पाणी दिसत असले तरी ते पिण्यायोग्य नसल्याने हे टाके बाहेरील पाणी साठविण्यासाठी वापरले जात असावे. बुरुजाच्या तळाशी असलेल्या भागात आजही माती साठलेली असुन त्यात खाडीच्या दिशेने आत ये-जा करण्यासाठी असलेली खिडकी अथवा झरोका गाडला गेला असावा. किंवा बुरुजात ये-जा करण्यासाठी खिडकीतुन शिडीचा वापर केला जात असावा. बुरुज पहाण्यास १५ मिनीटे पुरेशी होतात. वडाला स्थानकाच्या पुर्वेस मिठागराजवळ असणारा हा बुरुज पुर्व द्रुतगती मार्गालगत असुन वडाळा स्थानकापासुन साधारण ३ कि.मी.अंतरावर आहे. हा बुरुज शांतीनगर भागात असुन येथे आल्यावर आदर्श महाविद्यालय अथवा मदीना मशीद म्हणुन चौकशी केल्यास सहजतेने बुरुजाजवळ पोहोचता येते. दुर्गमित्र चंदन विचारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील शांतीनगर, वडाळा येथील स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर, शिवाज्ञा सेवाभावी संस्था व प्रकाश हासबे यांच्यामार्फत या वास्तुवर असलेला मलबा हटवला गेल्याने हि वास्तू उजेडात आली आहे. शिवाज्ञा सेवाभावी संस्थेचे प्रमुख व शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर आणि दुर्गमित्र चंदन विचारे यांनी साधारण ३५० वर्षे पुरातन असलेला हा ऐतिहासिक ठेवा उजेडात आणुन इतिहास अभ्यासक व दुर्गप्रेमी यांच्यावर उपकार केले आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!