VIVALVEDHE
TYPE : HILL FORT
DISTRICT : PALGHAR
HEIGHT : 1100 FEET
GRADE : HARD
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटीजवळ असलेली डहाणुची महालक्ष्मी पालघर जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रसिध्द आहे. यातील एक महालक्ष्मी मंदीर मुसळ्या डोंगरावरील गुहेत असुन दुसरे मंदीर या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विवळवेढे गावात आहे. या दोन्ही ठिकाणी भक्त मंडळींचा वर्षभर राबता असतो. डोंगरावर असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या सुळक्यासमोर आपल्याला त्यापेक्षा कमी उंचीचा घुमटाच्या आकाराचा दुसरा डोंगर पहायला मिळतो. स्थानीक लोक या डोंगराला पायलीचा डोंगर म्हणुन ओळखतात. कधीकाळी टेहळणीसाठी असलेली ही छोटेखानी किल्ल्याची वास्तु आज पुर्णपणे विस्मृतीत गेली आहे. माझी या गडाशी ओळख करून दिली ती सह्यस्पंदनचे जगदीश धानमेहेर यांनी. या किल्याचे नेमके नाव आज माहित नसल्याने आपण याची ओळख पायथ्याच्या विवळवेढे गावाच्या नावानेच करून घेऊया. गडावर जाण्यासाठी विवळवेढे हेच पायथ्याचे गाव असुन डहाणु रेल्वे स्थानक- चारोटी- विवळवेढे हे अंतर २७ कि.मी.आहे. डहाणु स्थानक येथुन मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चारोटी नाका हे अंतर २३ कि.मी.असुन तेथे जाण्यासाठी रिक्षा तसेच एस.टी.बसची सोय आहे. तेथुन खाजगी रिक्षाने विवळवेढे गावात जाता येते.
...
गावात आल्यावर दुकानांच्या गर्दीतुन वाट काढत गेल्यावर उजवीकडे महालक्ष्मी मंदीराचे प्रवेशद्वार आहे तर त्याच्या समोरच म्हणजे डाव्या बाजुस एक लहानसा रस्ता गेला आहे. या सिमेंटच्या रस्त्याने साधारण १० मिनीटे चालत गेल्यावर डावीकडे एक पायवाट वर जाताना दिसते. ओळखण्याची खुण म्हणजे या पायवाटेवर जुजबी लाकडी कुंपण असुन तेथे जमीनीखाली Gas Pipeline असल्याचा फलक रोवलेला आहे. या पायवाटेने सरळ गेल्यास दोन कुंपणे लागतात. एक तारांचे तर दुसरे काटेरी झाडांचे. दुसरे कुंपण पार केल्यावर हि मळलेली वाट उजवीकडे डोंगरावर जाताना दिसते. या वाटेने साधारण अर्ध्या तासाची चढाई केल्यावर आपण पायलीच्या डोंगराला भिडलेल्या सोंडेखाली येतो. दाट झाडी असलेल्या या सोंडेवरून पुन्हा अर्ध्या तासाची चढाई करून आपण पायलीच्या डोंगरावर असलेल्या सुळक्याखाली येतो. येथुन किल्ल्याच्या अवघड चढाईचा थरार सुरु होतो. येथे एक वाट सुळक्याच्या उजवीकडे महालक्ष्मी मंदिराच्या दिशेने जाते तर दुसरी वाट डावीकडे खाली उतरताना दिसते. डावीकडील वाटेने खाली उतरत गेल्यावर हि वाट संपुर्ण सुळक्याला वळसा मारून सुळक्याच्या दुसऱ्या बाजूला येते. हि पायवाट अतिशय अरुंद असुन काही ठिकाणी घसारा असल्याने अतिशय काळजीपूर्वक पार करावी. सुळक्याच्या या बाजूने महालक्ष्मी मंदिर असलेल्या मुसळ्या डोंगराच्या सुळक्याचे सुंदर दर्शन होते. येथुन वर गडावर जाणारी वाट हि अवघड श्रेणीतील असुन सुरक्षेसाठी दोराचा वापर करावा. या वाटेने जाताना कड्याच्या टोकावर खांब रोवण्यासाठी असलेला खळगा पहायला मिळतो. अवघड असा हा कातळटप्पा पार केल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. लंबवर्तुळाकार आकाराचा गडमाथा समुद्र सपाटीपासुन ११०० फुट उंचावर असुन साधारण पाव एकर परिसरावर पसरलेला आहे. गडमाथ्यावर पाण्याची एकूण तीन टाकी असुन त्यातील दोन टाकी ओहोरलेली तर एका टाके पाण्याने भरलेले आहे. टाक्याचा वापर होत नसल्याने यातील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. गडावर वावर नसल्याने मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन इतर कोणतेही अवशेष नजरेस पडत नाहीत. गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. विवळवेढे किल्ला अज्ञातवासात राहिल्याने याचा इतिहास अंधारात आहे पण जव्हार राज्याच्या अंतर्गत असलेल्या २९ किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख येतो.
© Suresh Nimbalkar