VINCHUR

TYPE : FORTRESS

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 0

GRADE : EASY

विठ्ठल शिवदेव विंचूरकर म्हणजे पेशवेकाळातील एक महत्वाचे सरदार. या मातब्बर सरदाराचा गढीवजा वाडा आपल्याला विंचुर गावात पहायला मिळतो. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेले विंचुर गाव नाशिक औरंगाबाद महामार्गावर असुन नाशिकपासून ५० कि.मी. अंतरावर आहे. गावात प्रवेश केल्यावर वाटेत रस्त्याच्या मधोमध पूजा केलेला दगड पहायला मिळतो. चौकशी केली असता कधीकाळी या ठिकाणी गावाची वेस असल्याची व संपुर्ण गावाला तटबंदी असल्याची माहीती मिळते. या ठिकाणी गावाची मुख्य वेस असुन पुर्वी दसऱ्याच्या दिवशी या वेशीवर रेड्याचा बळी दिला जात असे. आजही प्रथा बंद झाली असली तरी समोर राहणारे कचोळे घराणे या वेशीच्या दगडाची रोज पूजा करतात. याशिवाय गावात होळकर वेस म्हणुन दुसरी वेस पहायला मिळते. नूतनीकरणाच्या नावाखाली अलीकडेच या वेशीची तोडफोड करण्यात आली असुन त्या जागी सिमेंटची कमान उभारण्यात आली आहे. विंचुर-चांदवड मार्गाने ये जा करणारे सरदार मल्हारराव होळकर यांचा सन्मान करण्यासाठी सरदार विंचुरकरांनी विंचुरच्या पुर्व प्रवेशद्वारास होळकर वेस नाव दिले. आजही हा दरवाजा होळकर वेस म्हणुन ओळखला जातो. गावामध्ये विंचूरकरांचा वाडा प्रसिद्ध असल्याने आपण सहजपणे वाड्याच्या दरवाजासमोर पोहोचतो. ... आजवर सुस्थितीत असलेल्या या वाड्याची आता दुर्लक्षामुळे पडझड सुरु झाली आहे. आयताकृती आकाराचा हा वाडा दीड एकरवर पसरलेला असुन नवीन बांधकामामुळे वाड्याची पुर्व दिशेला असलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली आहे. शिल्लक असलेल्या तटबंदीत दक्षिण दिशेला दोन टोकावार दोन बुरुज असुन यातील एका बुरुजाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. वाड्याच्या बाहेरी तटबंदीचे दर्शनी व तळातील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन त्यावरील काम विटांनी केलेले आहे. या तटबंदीतुन आत शिरणारा मुख्य दरवाजा पश्चिमाभिमुख असुन त्याच्या आतील बाजुस दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे. पहिल्या दरवाजाची लाकडी दारे नष्ट झाली असली तरी या दरवाजाची कमानीदार लाकडी चौकट शिल्लक आहे. दुसऱ्या दरवाजाचा लाकडी दरवाजा आजही भक्कम असुन त्यात दिंडी दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दोन्ही दरवाजाच्या वरील भागात नगारखान्याचे बांधकाम असुन दरवाजाच्या दर्शनी भागात सज्जा बांधलेला आहे. या सज्जाखाली भग्न झालेली दोन दगडी शिल्प आहेत. दुसऱ्या दरवाजाने आत शिरल्यावर आपण वाड्याच्या आवारात पोहोचतो. देखरेख नसल्याने वाड्याच्या आवारात मोठ्या आवारात झाडीझुडपे वाढलेली आहेत. आतील वाडा दुमजली असुन वाड्याचा वरील मजला व तटावरील नगारखाना सज्जाने एकमेकाशी जोडलेले आहेत. वाड्याच्या वरील भागात जाण्यासाठी अलीकडील काळात सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. वाड्याचा मुख्य दरवाजा पश्चिमाभिमुख असुन आत शिरल्यावर आपण एका प्रशस्त चौकात येतो. या चौकात चारही बाजुस जोते असुन त्याच्या आतील भागात अनेक दालने(खोल्या) आहेत. यात दोन ठिकाणी वरील मजल्यावर जाण्यासाठी जिने आहेत. वाड्याबाहेर दक्षिण बाजुस तटबंदीच्या आत मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन यात एक बुजलेली पायविहीर आहे. या ठिकाणी आपल्याला एका उध्वस्त वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. या वास्तुची दोन बाजूची भिंत आजही शिल्लक असुन यात अनेक नक्षीदार कोनाडे आहेत. तटावर जाण्यासाठी कोपऱ्यात पायऱ्या बांधलेल्या असुन तटामध्ये बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. येथुन वाड्याच्या दरवाजात आल्यावर आपली फेरी पुर्ण होते. संपुर्ण वाडा फिरण्यास एक तास पुरेसा होतो. वाड्याच्या दरवाजासमोर काही अंतरावर विंचूरकर यांचे खाजगी मालकीचे कृष्णमंदीर आहे. याशिवाय सरदार विंचुरकरांनी २०० वर्षापुर्वी गावांस केलेली पाणीपुरवठा व्यवस्था देखील अभ्यासनीय आहे. विंचुर गावापासुन ३ कि.मी अंतरावर जेऊघालें या वस्तीतील एका विहिरीतुन भुयारी मार्गाने पाणी विंचुर गावास पुरविले जायचे. हे पाणी २ कारंजे , ७ हौदास पुरवलेले होते. यातील दोन हौद गावातील बालाजी मंदिरामागे एकमेकाशेजारी २० फुट अंतरावर असुन त्यातील एका हौदावर शके १८०३ असा ऊल्लेख केलेला आहे. तिसरा हौद शानिचौकात असुन चौथा हौद बुजविण्यात आला आहे. पाचवा हौद विंचूरकर वाड्यासमोर असुन या हौदातील पाणीच वाड्यात वापरले जात असावे. सहावा व सातवा हौद वाड्याशेजारील कृष्णमंदीरात असुन हा हौद सर्वात मोठा आहे. काही वर्षापुर्वीपर्यंत हे पाणी लोणजाई देवीच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या टाक्यातुन येत असावे असा समज होता पण काही स्थानिक तरुणांनी या भुयाराचा शोध घेतला असता हे पाणी या विहीरीतूनच गावात खेळवले असल्याचे सिद्ध झाले. या भुयाराची निर्मीती शके १८०३ म्हणजे इ.स.१८८१साली असल्याचा लेख या भुयाराच्या उच्छवासावर कोरलेला आहे. हे भुयार १० फूट ऊंच व ४ फूट रूंद असुन पुर्णपणे घडीव दगडी बांधणीतील आहे. या भुयारात सफाईकरता व हवा येण्यासाठी १०० फुटावर एक असे ७ उच्छवास असुन त्यातील केवळ दोन उच्छवास आज उघडे आहेत. त्याच्या पुढील भागात खापरी नळाने पाणी पुढे नेलेले आहे. जमीनीतील पाण्याची पातळी खालावल्याने विहीर कोरडी पडली व हि पाणीव्यवस्था २०-२२ वर्षापुर्वी बंद पडली असे स्थानिकांनी सांगीतले. वसईच्या मोहिमेत नावारूपाला आलेल्या या सरदारांनी पानिपतच्या युद्धात महत्वाची भूमिका बजावली. विठ्ठल शिवदेव यांचा जन्म इ. स. १६९५ साली सासवड गावी दाणी कुटुंबात झाला. पुढे विंचूर गावाची जहागिरदारी मिळाल्यामुळे त्यांना विंचूरकर हे नाव पडले. त्यांना तालीम आणि घोड्यावर बसणे या दोन गोष्टींची आवड होती. त्यामुळे त्यांनी चांगली शरीरयष्टी खूप कमावली होती. इ.स. १७१५ मध्ये विठ्ठलराव सासवड सोडून साताऱ्याजवळील मर्ढे गावी आले. या ठिकाणी साताऱ्यात शाहू महाराजांकडे बक्षीगिरी करणाऱ्या व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. त्यांनी विठ्ठलरावाना सातारला आणून आपल्या घरी घोड्यांची देखरेख करण्यास ठेवले. एके दिवशी शिकारीच्या प्रसंगी त्यांची व शाहु महाराजांची ओळख झाली. शरीराने धष्टपुष्ट असलेल्या विठ्ठलरावांची शक्ती आणि धैर्य पाहून त्यांना सरकारी पागेतील घोडा देऊन आपल्या सेवेत ठेवुन घेतले. घर सोडल्यानंतर विठ्ठलरावांना मिळालेला हा पहिला राजाश्रय होता. पुढे महाराजांसोबत शिकारीच्या वेळी तसेच राजकीय कामात विठ्ठलरावांचे धैर्य आणि कर्तुत्व पाहुन महाराजांनी त्यांना दहा घोडयांची शिलेदारी दिली. याच काळात विठ्ठलरावांचे वाई जवळील केंजळगावचे कुलकर्णी यांची मुलगी रखमाबाईशी लग्न झाले. इ.स.१७४४ साली विंचूर येथे नादाजी दरेकर या इसमाने पुंडाई केली असता ती मोडण्यासाठी पेशव्यांनी विठ्ठल शिवदेव यांना पाठवले. त्यांनी विंचूर येथे जाऊन त्याच्या वर छापा घातला व त्यास मारून तिथे आपला अंमल बसवला. या कामगिरीबद्दल पेशव्यांनी विठ्ठल शिवदेव यास जो सरंजाम दिला त्यात विंचूर गाव होते. याच काळात विठ्ठल शिवदेव यांनी विंचुर येथे वाडा बांधुन आपले बस्तान बसवले. यामुळे लोक विठ्ठल शिवदेव यांना लोक विंचूरकर म्हणून संबोधु लागले. पानिपताच्या लढाईत जे मातब्बर सरदार सदाशिवराव भाऊ यांच्यासमवेत लढले त्यात विठ्ठल शिवदेव हे एक महत्वाचे सरदार होते. गावाबाहेर सरदार विठ्ठल शिवदेव यांची समाधी आहे. सरदार विंचुरकरांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांबरोबर अनेक युद्धे जिंकली. पानिपतवर पराक्रम गाजवणाऱ्या व विंचुर गावाला एक वेगळी ओळख मिळवुन देणाऱ्या या वीराच्या वाड्याचे पर्यायाने विंचूरच्या या वारशाचे जतन होणे गरजेचे आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!