VIKATGAD
TYPE : HILL FORT
DISTRICT : RAIGAD
HEIGHT : 2150 FEET
GRADE : MEDIUM
मुंबई-पुणेकरांना एक दिवसात सहज साध्य होणारा किल्ला म्हणजे माथेरानच्या डोंगररांगेत असलेला पेबचा किल्ला उर्फ विकटगड. मुळचे विकटगड नाव असलेला हा किल्ला पायथ्याशी असलेल्या पेबी देवी मंदीरावरून पेबचा किल्ला म्हणुन ओळखला जातो. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ माथेरान या ठिकाणांहून वाटा आहेत. माथेरान-नेरळ रस्त्यावर आणि रेल्वे मार्गावर वाटर पाईप स्टेशननंतर रेल्वे लाईन रस्त्याला आडवी जाते तिथे "पेब/प्रती गिरनार" जाण्याचा मार्ग असा बोर्ड लावलेला आहे. येथवर एसटी किंवा खाजगी वाहनाने पोहोचता येते. या ठिकाणाहून रेल्वे मार्गाने चालायला सूरुवात करावी. पुढे वळसा घेऊन रेल्वे लाईन एका खिंडीत पोहोचते. या खिंडीतून समोरच्या डोंगरावर गेलेल्या तारा दिसतात. तारा समोर ज्या डोंगरावर गेल्या आहेत तो डोंगर म्हणजेच विकटगड. ही खिंड पार केल्यावर रेल्वे रुळालगतच उजव्या बाजूला लोखंडाची भगव्या रंगाची कमान दिसते.
...
त्यावर छोटी घंटी लावलेली असुन खाली उतरण्यासाठी लोखंडी शिडी आहे. रस्त्यापासून या कमानीपर्यंत येण्यास पाऊण तास लागतो. समोरच पेबचा किल्ला व किल्ल्याची तटबंदी दिसते पण तेथे जाण्यासाठी खाली दरीत उतरावे लागते. या वाटेवर ठिकठिकाणी झाडांच्या खोडांवर पेब किल्ल्यावर जाण्याचा मार्गदर्शक फलक लावलेला आहे. इथून काही अंतर पार केल्यावर दुसरी शिडी लागते. हि शिडी उतरल्यावर दरीत उतरून पुन्हा पेबच्या किल्ल्याचा डोंगर चढून डाव्या हाताच्या कातळाचा आधार घेत वाट डोंगराच्या कडेकडेने पेब व माथेरानचा डोंगर यामधील खिंडीत येते. येथून समोर गडावरील एकमेव बुरुज दिसतो. या वाटेने पुढे सरकल्यावर डोंगराला उभी करून ठेवलेल्या दोन शिड्या दिसतात. शिडी अभावी गडावर जाणे मुष्कील आहे. येथे पूर्वी गडाचे प्रवेशद्वार असावे. या शिडीजवळ कातळभिंतीत एक नेढ आहे. ही शिडी चढल्यावर आपण महादेवाचे मंदिराजवळील पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचतो. गडावर जाताच डाव्या हाताला पेब किल्ल्याची उद्ध्वस्त तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. आजमितीस गडावर असणा-या तटबंदीचे हे शेवटचे अवशेष होय. या मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यास २ तास लागतात. आता गडावर जाण्याचा दुसरा मार्ग. नेरळ स्टेशनवर उतरल्यावर स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. डोंगराच्या दिशेने जाताना उजवीकडची वाट पकडून समोर दिसणा-या विजेच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने निघावे. पुढे सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर आल्यावर तेथून पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. हा धबधबा हे या वाटेवरील एक मोठे आकर्षण आहे. या धबधब्याजवळ तीन वाटा आहेत. यातील मधली रुळलेली वाट किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेते. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढावे आणि खिंडीच्या दिशेने वाटचाल करावी. खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे. पुढे थोडयाच अंतरावर गुहा लागते. प्रथमच या गडावर जाणा-यांनी वाटाडया घेणे हिताचे आहे. या वाटेने किल्ला चढण्यास अडीच तास लागतात. पेबचा किल्ला या मार्गे चढून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक प्रचंड गुहा दिसते. या गुहेत ५० जणांची राहण्याची सोय होते. या गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गुहेच्या बाजूला चौकोनी तोंड असलेल्या गुहा आहेत. या गुहांमध्ये रांगत जाता येते. यातील एका गुहेच्या आत खालच्या बाजूला चार पाच माणसे मावतील इतकी मोठी खोली आहे तर एका गुहेच्या आत टोकाला पाण्याच टाक आहे. या गुहांमध्ये जाण्यासाठी विजेरी आवश्यकता आहे. या गुहा पाहून सरळ पुढे आल्यावर गडाची तटबंदी नजरेस पडते. येथून गडावर जाणारा मार्ग नष्ट झाल्याने गडावर जाण्यासाठी या तटबंदीस आता शिडी लावलेली आहे. या शिडीच्या खालील बाजूस मध्यम आकाराची कातळात कोरलेली दोन पाण्याची टाक आहेत. टाके पाहुन शिडी चढून गेल्यावर वर उजव्या बाजूस कातळात कोरलेले अजून एक टाके पहायला मिळते. या टाक्याशेजारी हनुमानाची मुर्ती ठेवलेली आहे. येथून वर जाण्यासाठी डोंगरात पाय-या खोदून कोरलेली पायवाट आहे. या वाटेवरून जाताना उजव्या बाजुस उद्ध्वस्त घरांचे व वाड्याच्या जोत्याचे अवशेष पहायला मिळतात. तिथून पुढे गेल्यावर आपण एका आश्रमाजवळ पोहोचतो. येथे राहण्याची व चहाची व्यवस्था होऊ शकते. या आश्रमाच्या बाजूने किल्ल्याचा सर्वात उंच भाग असलेल्या ठिकाणावर जाण्याची वाट आहे. या वाटेवर शिडी लावलेली असुन ही शिडी चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. येथे नव्याने स्थापन केलेल्या दत्ताच्या पादुका आहेत. गडाच्या या भागातुन पूर्वेला नेरळ व उल्हास नदी, पश्चिमेला गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण, उत्तरेकडे म्हैसमाळ ,चंदेरी, ताहूली ही डोंगररांग व दूरवर मलंगगडाचे सुळके दिसतात. दक्षिणेकडे माथेरनचा डोंगर व प्रबळगड दिसतो. या उंचवट्यावरून खाली उतरल्यावर आश्रमाकडून एक वाट गडाच्या दक्षिण भागात जाते. येथे गडावरील एकमेव बुरुज आहे. गडावर येण्यासाठी पहिली वर्णन केलेली वाट या बुरुजाखालूनच गडावर येते. बुरुज पाहून परत आश्रमाजवळ येउन खालच्या बाजूला गेल्यावर कड्याजवळ पाण्याची दोन टाकं आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यापुढे शिवमंदिर असुन या मंदिराच्या भिंतीवर पेबी देवीची मुर्ती कोरलेली आहे. मंदिरा शेजारी असलेल्या दुसऱ्या टाक्याच्या भिंतीवर यक्ष प्रतिमा कोरलेली आहे. या ठिकाणी आपली दुर्गदर्शन पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने किल्ला उतरुन नेरळला किंवा बुरुजाखालच्या वाटेने माथेरान - नेरळ रस्त्यावर पोहोचून नेरळला जाता येते. शिवकाळात मराठयांच्या ताब्यात असलेल्या विकटगडावर धान्यकोठार असल्याचे संदर्भ मिळतात.
© Suresh Nimbalkar