VIJAYDURG
TYPE : SEA FORT
DISTRICT : SINDHUDURG
HEIGHT : 0
GRADE : EASY
सुमारे १०० वर्षांहूनही अधिक काळ मराठेशाहीची अखंड सत्ता असलेला विजयदुर्ग हा मराठय़ांच्या आरमाराचे बलस्थान. १६५३ ते १७५६ एवढय़ा प्रदीर्घ कालावधीत विजयदुर्ग हा मराठय़ांच्या साम्राज्यातील मुकुटमणी होता. छत्रपती शिवरायांचा शौर्याचा वारसा घेऊन सुवर्णदुर्गापासून रेडीपर्यंत मराठय़ांचे राज्य अखंडीत आणि अबाधित ठेवण्यासाठी शौर्याची शिकस्त केलेल्या सरखेल कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे यांसारख्या सेनापतींच्या शौर्याची किनार लाभलेला हा किल्ला आजही तितक्याच दिमाखाने उभा आहे. विजयदुर्ग मुंबईपासून ४८५ किमी तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे. मुंबई गोवा महामार्गावरून तळेरे इथून उजवीकडे वळून ५२ किमी अंतरावर विजयदुर्ग किल्ला आहे. विजयदुर्ग गावात आल्यावर समोरच आपणास ऐसपैस असा विजयदुर्ग किल्ला दिसतो. महाराजांनी किल्ला ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच एकरावरून सतरा एकर एकोणीस गुंठे एवढे झाले.
...
चिलखती तटबंदीवर सत्तावीस भक्कम बुरूज बांधले. त्यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. किल्ल्यात प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा म्हणजेच जमिनीकडून असल्याने त्याला पडकोट खुष्क असे नाव आहे. पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी. हा मार्ग जांभ्या दगडातील आहे. दरवाजा सुरक्षिततेच्या दृष्टीने वळणावळणाचा असुन दरवाज्यासमोर डावीकडे समुद्रकिनाऱ्यापर्यंत खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर लाकडी पूल होता. सायंकाळी पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. आज मात्र भराव घातल्यामुळे आपला थेट जमिनीवरून गडावर प्रवेश होतो. गडाचा पहिला दरवाजा हनुमंत दरवाजा आणि त्याच्या समोर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हनुमंताचे देउळ आणि एक तोफ़ पाहायला मिळते. पुढे गेल्यावर भक्कम जिबीचा दरवाजा पाहायला मिळतो. जिभी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य दरवाजा आणि त्यापुढे बांधलेली संरक्षक तटबंदी यामधील परीसर. तुळाजी आंग्रे यांनी इंग्रज आणि पेशवे यांच्याविरुद्ध विजयदुर्गच्या संरक्षणासाठी बोलावलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी त्यांच्या चार पौंडी सोळा तोफा याच जिभीत रचून ठेवल्या होत्या. राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७ मधील पत्रात या जिभीचा उल्लेख आहे. दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या पडकोटाला असलेल्या तीन तटबंद्या पाहायला मिळतात. समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी ३० फ़ूट उंचीची आहे. त्यानंतर दुसरी तटबंदी १० फ़ूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी ३० फ़ूट उंच आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या तटबंदीच्या मधे असलेल्या फ़रसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य "यशवंत" महाव्दार लागते. तीन दरवाजे, तिहेरी तटबंदी यांच्या सहाय्याने किल्ला अभेद्य केलेला आहे. महादरवाजाची रचना अशी आहे की किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूच्या नजरेत तो दरवाजा येत नाही. शत्रूने केलेल्या तोफांच्या माऱ्याच्या निशाण्या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीवर दिसून येतात. भव्य अशा प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा आहे त्यास दिंडी दरवाजा म्हणतात. त्याकाळी सायंकाळी सहानंतर मुख्य प्रवेशद्वार बंद केले जात असे. त्यानंतर आत येणाऱ्या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दिंडी दरवाज्यातून प्रवेश दिला जाई. त्या दरवाज्यावर मोठमोठे खिळे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बांधकाम हे पेशवेकालीन आहे. महादरवाज्यावरील भाग म्हणजे नगारखाना. वर जाण्यासाठी नगारखान्याच्या खाली डावीकडे जिना आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर पोलिस चौकीसमोर रचुन ठेवलेले तोफ़गोळे पाहायला मिळतात. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजुने गडफ़ेरी चालू केल्यावर प्रथम आपल्याला खलबतखान्याची इमारत दिसते. तिथून पायऱ्याच्या वाटेने आपण ध्वजस्तंभाजवळ येवून पोहोचतो. हा ध्वजस्तंभाचा बुरूज पाहून आल्या वाटेने खाली उतरून दारूकोठार पहायचे. तेथुन पुढे सदरेची आयताकृती भव्य इमारत दिसते. सदरेच्या पुढे एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. पुढे बुरुजावरच बांधलेल्या दोन मजली इमारती दिसतात. त्यांना माडी म्हणतात. पुढे राणीवसाची इमारत एका भव्य बुरुजावर बांधलेली पाहायला मिळते. तटबंदीच्या आतल्या बाजूस खाली अनेक उध्वस्त चौथरे पाहायला मिळतात. या बाजूने तटावर जाण्यासाठी पायऱ्या असून या पायऱ्याच्या मार्गाने तटावर चढायचे. इथून तटावर फेरफटका मारण्यास सुरवात करावी. तटबंदीवर चढुन चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हणमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात. बुरुज व तटबंदीतील जंग्या, तोफ़ांसाठी ठेवलेले झरोके व बुरुजावर पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी डोणी आहेत. दर्या बुरुजाला असलेल्या पायऱ्यावरुन खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर पाहायला मिळते. हि गोड्या पाण्याची विहीर असून तिच्या पासून फक्त २० फूटांवर समुद्र आहे. त्याच्या पुढे एक चुन्याचा घाणा आहे. तटाचे बांधकाम करतांना दगडामध्ये सांधण्यासाठी वापरायचे सिमेंट मिश्रण म्हणून चुना, रेती, गुळ, हरड्याचे पाणी व नारळाचा काथ्या या घाण्यामध्ये मिश्रण करुन सिमेंट बनवत. चुन्याचा घाणा पाहून परत तटबंदीवर चढल्यावर अनुक्रमे तुटका, शिकरा, सिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन बुरुज पाहायला मिळतात. मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. गडाच्या या पश्चिम तटाबाहेर मोठमोठे दगड टाकून समुद्राच्या लाटांच्या माऱ्यापासून तटबंदीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो. समुद्रापासून ३२ मीटर उंच असलेल्या या बुरुजाला खुबलढा किंवा बारातोफा बुरुज या नावाने ओळखतात. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे. त्यात काही तोफ़गोळे ठेवलेले आहेत. खुबलढा बुरुज पाहुन पुन्हा तटबंदीवर येउन पुढे गेल्यावर घनची, पान बुरुज पाहायला मिळतात. पुढे दारुकोठार अस नाव लिहिलेल एक वास्तू पाहायला मिळते. परंतू तटबंदीला लागुनच दारुकोठार असण्याची शक्यता कमी आहे. दारूकोठार पाहून झाल्यावर तटबंदीवरुन उतरून किल्ल्याच्या आत असलेल्या टेकडीभोवती बांधलेल्या तटबंदीच्या आत प्रवेश करुन चोर दरवाजाच्या दिशेने चालत गेल्यावर एक विहिर पाहायला मिळते. ती पाहून आलेल्या मार्गावरून चालायला सुरुवात केल्यावर भग्न भवानी मंदिर पाहायला मिळते. त्यापुढे उध्वस्त वास्तुंचे काही चौथरे पाहायला मिळतात. पुढे उजव्या बाजूस काही सिमेंटचे ओटे पाहायला मिळतात. त्याला साहेबांचे ओटे म्हणतात. इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला. पायवाटेच्या डाव्या बाजूस एक लहान व एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो. मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दोनही हौद कोरडे आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी हे हौद बांधण्यात आले होते. साठलेले पाणी जमिनीत मुरु नये म्हणुन हौद बांधताना शिश्याचा वापर केला होता. हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते. इमारत पाहुन पुढे गेल्यावर जखिणीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली जखिणीची तोफ़ पाहायला मिळते. ती पाहुन पायवाटेने तोफ़गोळे ठेवलेल्या पोलिस चौकीकडे येताना वाटेत घोड्याच्या पागा, हौद, एक विहिर आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते. इथेच तटबंदी जवळ खाली उतरणाऱ्या पायऱ्या दिसतात. इथे एक भूयार असून ते गावातील आनंदराव धुळपांच्या वाड्यात उघडते असे सांगितले जाते पण सध्या हे भुयार बंद आहे. हे भुयार असण्याची शक्यता कमी आणि दारू कोठार असण्याची शक्यता जास्त आहे. किल्ल्याच्या गोमुखी दरवाजा जवळ आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर चढण्यास जागोजागी पायऱ्या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता येते. संपूर्ण गड फिरून व्यवस्थीत पाहण्यास ३ तास लागतात. हल्लीच्या काळात सापडलेले या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याजवळ असलेली १२२ मीटर लांबीची चिऱ्याच्या दगडात बांधलेली भिंत. ही भिंत समुद्रामध्ये ८ ते १० मीटर खोलीवर आहे. या भिंतींची उंची तीन मीटर आणि रुंदी सात मीटर आहे. ही भिंत त्या काळी शत्रूच्या जहाजांना किल्ल्याच्या जवळ येण्यापासून रोखत होती. विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्राखाली बांधलेली हि संरक्षक भिंत हे त्याकाळचे एक आश्चर्य आहे. किल्ल्याजवळ मोठे जहाज आल्यास त्यांचा तळ भिंतीला आपटून ती जहाजे नष्ट होत असत. त्यानंतर डेक्कन कॉलेजमधील संशोधक सहायक सचिन जोशी यांनी मिथ्स अँड रिअॅलिटी-दि सबमर्ज्ड स्टोन स्ट्रक्चर ऑफ फोर्ट विजयदुर्ग या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये ते म्हणतात, की विजयदुर्ग किल्ल्याजवळची प्रसिद्ध असलेली समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे. कोकण किनारपट्टीवर आणखी काही ठिकाणे आढळणाऱ्या डाइक प्रकारच्या रचनेचाच तो भाग असल्याचे ते म्हणतात, ते बांधकाम प्लॅटफॉर्मसारखे असल्याचे दिसते. त्यामध्ये वापरण्यात आलेल्या दगडांपैकी सर्वात मोठा दगड ३.५ × २.५ × २.५ मीटर इतक्या मोठ्या आकाराचा आहे. एवढा मोठा दगड त्या जागी नेणे हे त्या काळी शक्य नव्हते. या भिंतीवर चार मीटरहून अधिक उंचीपर्यंत पाणी आहे. त्यामुळे तेव्हा आरमारासाठी वापरात असलेल्या बोटींना त्या भिंतीवरून ये-जा करणे शक्य होते. साधारण ऐंशी ते नव्वद वर्षांच्या इतिहासात, किरकोळ घटना वगळता त्या भिंतीवर बोटी आदळून फुटल्याच्या नोंदी ब्रिटिश, पोर्तुगीज किंवा डचांच्या लिखाणात आढळत नाहीत. पाण्याखालील ती भिंत मराठ्यांच्या आरमाराच्या विजयी गाथेची भागीदार आहे. पाण्याखालील भिंतीसोबत ‘आंग्रे बँक’ ही समुद्रातील जागाही मराठ्यांच्या पराक्रमात कामी आली आहे. तो भाग नैसर्गिक आहे. पण ती जागा आंग्रे यांच्या नौदलाने शोधून काढली आणि तिचा उपयोग शत्रूंचे हल्ले यशस्वीपणे परतवण्यासाठी केला गेला. आंग्रे बँक म्हणजे समुद्रातील टेकडी होय. विजयदुर्ग समुद्रामध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यास मिळतो. विजयदुर्गपासून साधारण शंभर किलोमीटरच्या अंतरात पाण्याची खोली ऐंशी ते नव्वद मीटर वाढत जाते. पुढच्या तीन ते चार किलोमीटरच्या अंतरात ही खोली तब्बल पावणेदोनशे मीटर एवढी वाढते. पण त्यानंतरच्या काही अंतरामध्ये खोली अचानक कमी होऊन वीस ते पंचवीस मीटर एवढी होते. तीच आंग्रे बँक! टेकडी तब्बल पस्तीस ते चाळीस किलोमीटर लांब व पंधरा ते वीस किलोमीटर रुंद आहे. विजयदुर्गवर हल्ला करणाऱ्या शत्रूंच्या जहाजांवरील तोफांची तोंडे विजयदुर्गकडे असत. त्या तोफांना पश्चिमेकडून हल्ला झाला तर त्वरित पश्चिमेकडे वळणे अवघड होत असे. या टेकडीमुळे मराठा आरमाराने या निसर्गरचनेचा संरक्षणार्थ कुशलतेने उपयोग केला. मराठा आरमार आंग्रे बँक या ठिकाणी नांगर टाकून आरामात असे. शत्रू विजयदुर्गच्या दिशेने येताना दिसला की मराठ्यांची जहाजे पश्चिमेकडून त्यांना अटकाव करत. विजयदुर्ग पासून ७ किमी अंतरावर गिर्ये गाव आहे. कान्होजी आंग्रेंच्या काळात वाघोटन खाडीत दगड फ़ोडून आरमारी गोदी (Dry Dock) बांधण्यात आली होती. विजयदुर्गच्या खाडी किनाऱ्याला लागूनच ३ किमी. वर आंग्र्यांनी उभारलेली ३५५ फुट लांब व २२७ फुट रूंद अशी ही उत्तराभिमुख गोदी आहे. या ठिकाणी जहाज बांधणी आणि दुरुस्तीची कामे केली जात. आंग्रे यांच्या या आरमारी गोदीत चिखलात रुतलेला नांगर कॅप्टन डेव्हिस यांना १९५२ साली सापडला होता. तो साडेतेरा फूट लांब आणि आठ फूट रुंद होता. नांगरावरून त्या काळच्या जहाजांची कल्पना येते. तो नांगर अठराव्या शतकातील पालवी गुराबाचा होता. मुंबईच्या नॉटिकल म्युझियम मध्ये तो जतन केलेला आहे. विजयदुर्गच्या शामराव परुळेकर यांनी तो संग्रहालयाकडे पाठवला. गोदीमध्ये पाचशे टनी जहाजे ये-जा करू शकत. गोदीतील पाणी ओहोटीला बाहेर गेल्यावर पूर्वेकडील सदुतीस फूट रुंदीचा दरवाजा बंद करून भरतीच्या पाण्यास अडवले जाई. फत्तेजंग पाल आणि समशेरजंग पाल या लढाऊ जहाजांची बांधणी त्याच गोदीमध्ये करण्यात आली. गोदीमध्ये बांधलेल्या किंवा दुरुस्त केलेल्या जहाजांनी मराठ्यांच्या वीरश्री गाजवलेल्या आरमारात सिंहाचा वाटा उचलला. शत्रूपासून गोदीच्या संरक्षणासाठी मटाटिया बुरुजाची खास बांधणी करण्यात आली होती. त्यावर तोफाही ठेवण्यात आल्या होत्या. त्या बुरुजावर आणि गोदीजवळ सैनिकांचा जागता पहारा असे. त्या संदर्भात तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेच्या डॉ. त्रिपाठी यांनी त्या बांधकामाचा अभ्यास केला होता. त्या वेळी त्या भागात जहाजांचे अवशेष व तोफगोळे मिळाले. त्याबाबत १९९८ मध्ये डॉ. त्रिपाठी यांनी त्यांचा शोधप्रबंध जर्नल ऑफ नॉटिकल आर्किऑलॉजी मध्ये सादर केला होता. इतिहासकाळात चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या या जलदुर्गाचा इतिहासही तितकाच रोमांचक आहे. विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेल्या मिर्झा वलीबेग याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम ११९५ ते १२०५ या कालावधीत केले. त्यावेळी शेजारील गिर्ये गावाच्या नावाने हा किल्ला घेरीया म्हणून ओळखला जात होता. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. १२१८ मध्ये बुडविले. इ.स. १३५४ मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स.१४३१ मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. १४९० ते १५२६ या काळात बहामनी राज्याचे ५ तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकण प्रांत सोपविला गेला. त्यानंतर १६५३ पर्यंत सुमारे १२९ वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली. छत्रपती शिवरायांनी मराठेशाहीच्या घाटमाथ्यावरच्या साम्राज्यानंतर पश्चिम किनारपर्ट्टीवर आपले लक्ष केंद्रित केले. ज्याचे गड त्याचे राज्य या विचाराने अर्थातच कोकण किनारपट्टीवर आपले साम्राज्य हवे असेल तर आरमारी किल्लेही आपल्या ताब्यात हवेत. इंग्रज,डच, पोर्तुगीज, यांच्याकडून कोकण किनारपट्टीवरील मराठी रयतेचा अनन्वीत छळ होत होता. त्यांना नेस्तनाबूत करायचे असेल तर आरमारी साम्राज्य हवेच हा मनसुबा रचून छत्रपती शिवरायांनी आरमाराची स्थापना केली. आरमारप्रमुख दर्यासारंग दौलतखान, मायनाक भंडारी यांनी आदिलशाहीकडून हा किल्ला ताब्यात घेताना शिकस्त केली आणि पश्चिम किनारपट्टीवर मराठय़ांचे आरमारी ठाणे इथे अस्तित्वात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ साली हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले. गडाला तिहेरी तटबंदी, गोमुखी दरवाजा इत्यादी बांधुन गड मजबूत केला. सिद्दी तसेच इंग्रज पोर्तुगीज यांवर वचक ठेवण्साठी महाराजांनी हे आरमारी ठाणे निवडले. सिंधुदुर्ग निर्मितीच्या पुर्वकाळात मराठ्यांच्या आरमाराचा तळ या किल्ल्य़ाजवळ होता. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यानंतर कान्होजी आंग्रे यांची कोकणातील राजकीय कर्तबगारी सुरू झाली. छत्रपती राजाराम ह्यांच्या वेळी कान्होजी आंग्र्यांनी विजयदुर्ग येथे आपले प्रमुख ठाणे उभारून सरखेल हा किताब मिळविला आणि १६९८ ते १७२९ पर्यंत पश्चिम किनाऱ्यावर आपले वर्चस्व राखले. इंग्रज व पोर्तुगीज यांचे आंग्रे यांच्याशी कधीच जुळले नाही. इ.स. १७१७ मध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे ससेक्स जहाज पकडून विजयदुर्ग बंदरात ठेवले. इंग्रजांनी इ.स.१७१८ मध्ये प्रचंड आरमारानीशी विजयदुर्गावर हल्ला चढवला पण किल्ल्यावरून रुद्राजी धुळपने तो हल्ला परतवून लावला. प्रचंड दारूगोळा आणि २०० सैनिकांचे प्राण गमवून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले. इ.स.१७२० मधे इंग्रज कॅप्टन ब्राऊनने पोर्तुगिजांच्या मदतीने ह्या किल्ल्यावर आक्रमण केले. कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज घेऊन विजयदुर्गावर हल्ला केला. त्यांच्या ताफ़्यात फ़्राम नावाची प्रचंड युध्दनौका होती तरीही इंग्रजांना हार पत्करावी लागली. मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या हाती फ़्राम लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युध्दनौका जाळुन बुडवली. चार वर्षांनी वलंदेजांनी तसाच प्रयत्न केला पण त्यांना माघार घ्यावी लागली. आंग्र्यांनी गिर्ये येथे गोदी बांधून जहाज बांधण्याचे कारखानेही सुरू केले. कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत तंटे सुरू झाले. आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत बिनसले. कान्होजी आंग्रेनंतर तुळाजी आंग्रे आरमाराचे सरखेल झाले व ते पेशव्यालाच शह देऊ लागले. तुळाजी आंग्रे पेशव्यांना जुमानीसा झाला. तुळाजीने १७५४ मध्ये त्यांची अनेक जहाजे पकडली काही जाळली. तुळाजीने आपल्या आरमारात अनेक नवीन जहाजे बांधविली व त्यांवर पगारी यूरोपीय कामगार नेमले. इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. तुळाजीने नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून उभय पक्षांचा घरोबा पूर्वीपासून चालत आहे त्याची अभिवृद्धी व्हावी असे कळविले तथापि पेशव्याने २६ मार्च १७५५ रोजी तुळाजीविरोधी संयुक्त मोहिमेस प्रारंभ केला. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यातुन हल्ला केला. अखेर तुळाजीचा पराभव होऊन विजयदुर्ग इंग्रजांच्या हाती पडला (१३ फेब्रुवारी १७५६). या युध्दात मराठ्यांचे संपूर्ण आरमार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि नष्ट झाले. विजयदुर्ग किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी किल्लावरील अमाप संपत्ती लुटली. त्यांना इथे १० ते १२ लाख रुपयांची संपत्ती मिळाली. पेशव्यांशी झालेल्या तहात इंग्रजांनी बाणकोट किल्ल्याच्या बदल्यात विजयदुर्ग किल्ला पेशव्यांना परत दिला. पेशव्यांनी आनंदराव धुळपांची विजयदुर्गावर नेमणुक केली. तुळाजी पुढे पेशव्याच्या कैदेतच १७८६ मध्ये मरण पावला. आंग्र्यांच्या अस्तानंतर विजयदुर्गचा प्रांत व आरमाराची सुभेदारी पेशव्यांनी आनंदराव धुळप यास दिली. मराठ्यांचे आरमार कमकुवत होण्यास येथूनच प्रांरंभ झाला. पुढे माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी कोकणपट्टीवरील विजयदुर्ग, रत्नागिरी वगैरे स्थळे घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा १७७३च्या जानेवारीत त्र्यंबक विनायक व कृष्णाजी धुळप यांनी पोर्तुगीजांना विजयदुर्गातून हुसकावून लावले. त्यानंतर सन १७८३ मधे आनंदराव धुळप ह्याने हा किल्ला घेण्याचा इंग्रजांचा डाव हाणून पाडला. शेवटच्या इंग्रज मराठा युद्धात सन १८१८ मधे कर्नल इम्लाकने हा किल्ला जिंकुन घेतला. इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला.
© Suresh Nimbalkar