VETALGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : SINDHUDURG

HEIGHT : 560 FEET

GRADE : EASY

मराठा राज्याच्या वाटणीनंतर निर्माण झालेली करवीर येथील गादी व वाडीकर सावंत यांच्या सीमा एकमेकाला लागुन असल्याने त्यांच्यात सतत कुरबुरी चालू असत. एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी त्यांनी कोकण प्रांतात काही किल्ले नव्याने बांधले. घाईगर्दीत व नीटशी दखल न घेता बांधलेले हे किल्ले अलीकडील काळात बांधलेले असूनही पडझड झाल्याने लवकरच नामशेष झाले. पेंडूर गावामागे असलेल्या झाडीभरल्या टेकडीवर वेताळगड हा वाडीकर सावंतानी बांधलेला व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला एक अपरीचीत व दुर्लक्षीत किल्ला आहे. वेताळगडला जाण्यासाठी पेंडूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव कुडाळ पासुन १७ कि.मी. अंतरावर तर कसालपासुन २४ कि.मी. अंतरावर आहे. वेताळगड हे किल्ल्याचे नाव पेंडूर गावात असलेल्या वेताळ मंदिरावरून पडले असले तरी पेंडूर गावाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मोगरणे गावातील गावडेवाडी तसेच चुरीवाडी येथुन किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे. ... या मार्गावर एस.टी.सेवा खुपच मर्यादीत असल्याने स्वत:चे वाहन सोयीचे पडते. मोगरणे गावातील दोन्ही वाटांनी गडावर जाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. मोगरणे गावातुन गावडेवाडीपर्यंत रस्ता गेला आहे. वाडीतील शेवटच्या घरापासुन एक कच्चा रस्ता वरील पठारावर गेला आहे. सध्या हा रस्ता वापरात नसल्याने मोठया प्रमाणात खचला आहे त्यामुळे वाहन येथेच ठेऊन पठारावर चालत जावे. वाडीपासून पठारावर येण्यास १५ मिनिटे लागतात. पठारावर रस्ता जेथे संपतो तेथे डाव्या बाजुस विजेचा खांब दिसतो. या खांबाकडून सरळ जाणारी वाट शेवटच्या टप्प्यात वर चढत आपल्याला थेट वेताळगडावरील उध्वस्त तटबंदीवर आणुन सोडते. अलीकडील काळात होऊ लागलेल्या ट्रक्टरच्या वापराने गावातील गुरेढोरे कमी झाल्याने गडावर चरण्यासाठी जाणारी गुरे व गुराखी बंद झाले आहेत. त्यामुळे गडावर मोठया प्रमाणात गवत वाढत असुन गडाचे अवशेष लुप्त झाले आहेत. गुराखी गडावर जात नसल्याने वाटाही मोडत चालल्या आहेत. कोकणातील बहुतांशी गडावर हिच परीस्थीती दिसुन येते. त्यामुळे अवशेष पहाण्यासाठी सोबत माहीतगार वाटाड्या असणे गरजेचे आहे. वेताळगडची टेकडी समुद्रसपाटीपासून ५५० फुट उंचावर आहे. वेताळगडाचा माथा म्हणजे अस्ताव्यस्त पसरलेले १५ एकरचे पठार असुन या पठारावर मोठया प्रमाणात गवत व झाडी असल्याने नेमकी कुठुन सुरवात करावी ते कळत नाही. गडावर आपण प्रवेश केला त्या ठिकाणची तटबंदी वगळता इतर कोठेही तटबंदी अथवा बुरुज दिसत नाही. प्रवेश केलेल्या ठिकाणावरून उजव्या बाजुच्या कडेने फिरताना एक ढासळलेली व झाडीने भरलेली विहीर दिसते. वाटेच्या पुढील भागात एका ठिकाणी खडकात कोरलेले चौकोनी कोरडे टाके पहायला मिळते. पठारावर फिरताना एक साचपाण्याचे तळे, काही खळगे, एक चौथरा व पाण्याने भरलेली दोन लहान टाकी पहायला मिळतात पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी २ तासाची शोध मोहीम करावी लागते पण फारच तुरळक अवशेष असल्याने आपला वेळ कारणी लागत नाही. पेंडूर गावात असलेले वेताळ मंदीर व जवळच असलेल्या उध्वस्त जैन मंदीरातील प्राचीन मुर्ती आवर्जुन पाहण्यासारख्या आहेत. वाडीकर सावंतानी नोव्हेंबर १७८६ ते जानेवारी १७८७ दरम्यान करवीरकरांच्या रांगणा व सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मार्गावर मध्यभागी वेताळगड किल्ला बांधला. यावरून करवीरकर व सावंत यांच्यात कलह निर्माण झाला. यावर १९ जानेवारी १७८७ रोजी सवाई माधवराव पेशव्यांनी खेम सावंतांना पाठविलेल्या पत्रात हा कोट पाडून तेथे फक्त ५ माणसांची शिबंदी ठेवण्यासाठी लिहिले आहे इतकेच नव्हे तर तटबंदी पाडण्यासाठी हैबत उबला व राघोजी रानवडा यांना रवाना केल्याचे कळविले आहे. सन १८६२मध्ये इंग्रजांनी केलेल्या किल्ल्यांच्या पाहणीत हा किल्ला पूर्णपणे मोडकळीस आल्याचे लिहिले आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!