VERUL
TYPE : FORTRESS
DISTRICT : SAMBHAJINAGAR
छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या वेरूळला पौराणिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. वेरूळ मधील घृष्णेश्वराचे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तर राष्ट्रकुट काळात खोदलेले वेरुळचे कैलास मंदिर व तेथील इतर लेणी जगप्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त वेरूळला मध्ययुगीन काळाचा देखील वारसा लाभला आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव अशी देखील वेरूळची ओळख आहे. आजही वेरूळात शहाजी राजांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात. गढीचे हे अवशेष आता फक्त नावापुरताच उरले आहेत. छत्रपती शिवरायांचे पणजोबा व आजोबा अशा दोन पिढ्या येथे नांदल्या इतकेच नाही तर वडील शहाजी राजे यांचा जन्म व पुर्वायुष्य देखील येथेच गेले. काळाच्या ओघात त्याचे वास्तव्य असलेली गढीचे मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले होते पण पुरातत्व खात्याने अलीकडेच म्हणजे २००४ ते २००६ दरम्यान येथे उत्खनन करून या गढीचे स्वरूप समोर आणलेले आहे. या उत्खननामध्ये स्वयंपाकघर, खोल्यांच्या जोत्यांचे अवशेष, पूर्व-पश्चिम भिंतीचा काही भाग तसंच दोन धान्यकोठारं व स्नानगृह यांचे अवशेष समोर आले आहेत.
...
या ठिकाणी लाल दगडातील गणपतीची मूर्ती, चांदीची अंगठी, तांब्याची नाणी, भाजलेल्या मातीचे दिवे,प्राण्यांच्या मूर्ती, काचेचे आणि मौल्यवान दगड तसंच शंखाच्या आणि काचेच्या बांगड्या देखील मिळाल्याचे येथील पुरातत्व खात्याचे कर्मचारी सांगतात. संपुर्ण गढीचे क्षेत्र अडीच एकरपेक्षा जास्त असुन या गढीचे बांधकाम सोळाव्या शतकात शतकात झालेले आहे. गढीच्या बांधकामात ५ मिटर म्हणजे साधारण १५ फुट उंचीचा एकमेव बुरुज शिल्लक आहे. गढीच्या भिंती आज शिल्लक नसल्या तरी त्यांचा पाया शिल्लक असुन त्याची रुंदी तीन ते पाच फुट आहे. यावरून भिंतीच्या जाडीची कल्पना करता येते. हे बांधकाम करण्यासाठी दगड व विटा यांचा वापर करण्यात आला असुन भिंती उभारताना माती, तण आणि कोंडा याचा वापर झाला आहे. गढीचे मूळ क्षेत्र शासनाने संरक्षित क्षेत्र म्हणुन जाहीर केले असुन हे क्षेत्र सोडून गढीच्या दर्शनी भागात शहाजीराजांचं स्मारक म्हणुन त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. घृष्णेश्वर मंदिराच्या समोर एक समाधी व मागील बाजूस दोन, अशा एकूण तीन समाध्या आहेत. या तीन समाध्या बाबाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले,विठोजीराजे भोसले यांच्या आहेत. छत्रपती शिवाजीराजे यांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावची पाटीलकी होती. तसंच परिसरातील गावांची जहागिरीही होती. बाबाजी भोसले यांच्या कार्यकाळात हा मुलुख निजामशाहीच्या अंमलाखाली होता. त्यांना मालोजीराजे आणि विठोजीराजे हे दोन पुञ होते. मालोजीराजांनी आपल्या पराक्रमाने निजामशाहीत फार मोठा प्रभाव निर्माण केला. वेरुळच्या याच गढी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांचा १८ मार्च १५९४ रोजी जन्म झाला होता. घृष्णेश्वराचं मंदिर पडल्यानंतर मालोजी राजे यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर निजामशहानं त्यांची जहागिरी शहाजीराजे व शरीफजी राजे यांना दिली. विठोजीराजांनी राज्यकारभार हाती घेऊन शहाजी व शरीफजी या दोघांना येथेच वाढविले. वेरूळची लेणी व घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेले असतो जवळच असलेल्या या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.
© Suresh Nimbalkar