VELNESHWAR

DISTRICT : RATNAGIRI

वेळणेश्वर या समुद्रकाठच्या निसर्गसंपन्न गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागरमधील पर्यटनस्थळात वेळणेश्वरचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. वेळणेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा हा परीसर नितांत रमणीय आहे. वेळणेश्वर मुंबईपासुन २९० किमी तर पुण्यापासुन ३०६ किमी अंतरावर आहे. गुहागर ते वेळणेश्वर हे अंतर साधारणपणे २० किमी आहे. चिपळूणहुन गुहागरला जाताना गुहागरआधी डावीकडे मोडका आगारमार्गे वेळणेश्वरला जाता येते. सभोवताली नारळ-पोफळीच्या बागा, सुरक्षित स्वच्छ समुद्रकिनारा आणि लाटांच्या गाजेच्या आवाजाने या गावाचे वेगळेपण जाणवते. वेळणेश्वर मंदीर समुद्रकिनारी वसलेले आहे. वेला म्हणजे समुद्रकिनारा त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर अशी या नावाची उत्पत्ती आहे. ... या मंदिराचा मुख्य गाभारा आजही १२व्या शतकातील आहे. मंदिर आवार प्रशस्त असुन त्यात २४ फुट उंचीची दीपमाळ आहे. गाभाऱ्यात तीन फुट लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवटा व पाच फण्यांचा नाग आहे. मुख्य मंदिराला लागुनच काळभैरव, गणपती व लक्ष्मिनारायण मंदिरे आहेत. स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्रकिनाऱ्यामध्ये वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल. समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला मेरुमंडल म्हणतात. नारळांच्या झाडांनी भरलेले हा किनारा बराच मोठा असून गर्दी नसल्यामुळे येथील वातावरण शांत आणि रमणीय असतं. समुद्रकाठावर आपण पोहण्याचा अथवा मोटरबोट घेऊन समुद्रसफारीचा आनंद घेऊ शकतो. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच काही हॉटेल्स आहेत याशिवाय वेळणेश्वर भक्त निवासातही रहाण्याची उत्तम सोय होऊ शकते. अशा या नितांत सुंदर समुद्रकिनाऱ्याला एकदा तरी भेट द्यायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!