VARKHEDI
TYPE : FORTRESS
DISTRICT : JALGAON
जळगाव जिल्ह्यात वरखेड, वरखेडा, वरखेडी या नावाने ओळखली जाणारी अनेक खेडी आहेत. येथे वरखेड नावाचा उल्लेख करण्यचे कारण म्हणजे यातील वरखेड नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन गावात गढी आहेत. यातील पहिले वरखेड गाव भुसावळ तालुक्यात असुन या गावात होळकरांनी बांधलेली गढी आहे. या गढीची आपली भटकंती पुर्वी म्हणजे २०१६ सालीच झाली आहे. यानंतर असलेले दुसरे वरखेडी गाव पाचोरा तालुक्यात असुन ते वरखेडी बुद्रुक या नावाने ओळखले जाते. पाचोरा ते वरखेडी बुद्रुक हे अंतर १२ कि.मी.असुन जळगाव वरखेडी बुद्रुक हे अंतर साधारण ४५ कि.मी. आहे. या गावात असलेली गढी मन्साराम दादाची गढी म्हणुन ओळखली जाते. कधीकाळी दगडात बांधलेली भक्कम गढी असा उल्लेख असलेली हि गढी आजमात्र नावापुरती अवशेषरुपात शिल्लक आहे. गावातील लहानशा उंचवट्यावर असलेल्या चौकोनी आकाराच्या या गढीचा आज एक बुरुज व काहीशी तटबंदी आपले अस्तित्व सांगत आहेत. गढीच्या एका भागात नव्याने बांधलेले घर असुन उर्वरीत भाग पुर्णपणे ओस पडला आहे. गढीच्या शिल्लक असलेल्या तटाची व बुरुजाची उंची साधारण २५ फुट आहे. सध्या शिल्लक असलेल्या बुरुजाचे व तटाचे संपुर्ण बांधकाम विटांनी केलेले आहे.
...
गढीच्या उत्तर बाजुस शिल्लक असलेल्या बुरुजाजवळ चौकोनी आकाराची एक पायविहीर असुन या विहिरीत एक भुयार आहे. सध्या पत्रा टाकुन या पायविहिरीत उतरण्याचा मार्ग बंद करण्यात आला असला तरी विनंती केल्यास पत्रा काढुन या पायविहीरीत जाता येते. १० मिनिटात आपला गढीचा फेरफटका पुर्ण होतो. या गढी नेमकी केव्हा बांधली याचा इतिहास ज्ञात नसला तरी इंग्रजांशी लढताना या गढीने बराच पराक्रम गाजवल्याचे दिसुन येते. इ.स.१८२१ साली इंग्रजांनी शिंदे यांच्याकडून घेतलेल्या १२ गावांमध्ये वरखेडी गावाचा उल्लेख येतो पण १८३५ मध्ये हे गाव पुन्हा शिंदे यांच्याकडे आले. इ.स.१८४३ साली ते पुन्हा इंग्रजांकडे आले पण यावेळी ताबा देण्यास गावकरी व त्यांचा प्रमुख मन्सारामदादा यांनी नकार दिला. मन्सारामदादा यांनी शरण जाण्यास नकार देऊन गढीचा दरवाजा बंद केल्याने इंग्रज व मन्सारामदादा यांच्यात धुमश्चक्री उडाली. मन्साराम शरण येत नाही हे पाहुन खानदेशातील ब्रिटीश सेना अधिकारी व भिल्ल बटालियन प्रमुख कॅप्टन मॉरीस याने धरणगावची भिल्ल बटालियन व दोन नउ पौंडी तोफा मालेगाव येथुन मागवल्या. गढीचा दरवाजा तोफेने उडवल्याने गढीतील प्रतिकार संपला पण यावेळी झालेल्या गोळीबारात मन्साराम दादा गोळी लागून ठार झाला व त्याचा मुलगा जबर जखमी झाला. यावेळी झालेल्या लढाईत ब्रिटिशांचे १६ सैनिक मरण पावले तर काही जखमी झाले. एक लहान गढी पण जबर इच्छाशक्तीमुळे सहजपणे ब्रिटिशांच्या हाती लागली नाही. गावात मन्साराम दादा व त्यांच्या मुलाची चौथरावजा समाधी अतिशय दुर्लक्षित अवस्थेत आहे. स्थानिकांशी संवाद साधल्यास गढी सोबत त्यांच्या समाधीला वंदन करता येते.
© Suresh Nimbalkar