VARI BHAIRAVGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : AKOLA

HEIGHT : 1150 FEET

GRADE : EASY

अकोला जिल्ह्यातील तेल्हार तालुक्यात पंचक्रोशीत प्रसिध्द असलेले वारी हनुमान नावाचे मारुतीचे मंदिर आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. या मारूतीची स्थापना समर्थ रामदासांनी केल्याचे स्थानिक सांगतात पण गावात असलेल्या भैरवगड किल्ल्याबाबत त्यांना काहीच सांगता येत नाही. वाण नदीच्या काठावर असलेले हे ठिकाण म्हणजे मुळचे वारी भैरवगड. नव्याने प्रसिद्ध होत असलेल्या या हनुमान मंदिरामुळे वारी भैरवगडची ओळख मागे पडत चालली आहे. अकोला शहरापासुन वारी भैरवगड हे अंतर ८० कि.मी. असुन तेथे जाण्यासाठी ५५ कि.मी.वरील तेल्हार अथवा ४५ कि.मी.वरील अकोट गाठावे व तेथुन २० कि.मी.असलेले हिवरखेड येथे यावे. हिवरखेड येथुन १५ कि.मी.वर असलेल्या वारी हनुमानला जाण्यासाठी रिक्षा तसेच बसची सोय आहे. बसची सेवा अनियमित असल्याने रिक्षा हाच योग्य पर्याय आहे. ... वाण नदीवर झालेल्या धरणामुळे हा प्रदेश पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला असला तरी येथील रस्त्यांची परिस्थिती मात्र कल्पनेपेक्षा भयानक आहे. हनुमान मंदिराकडे जाण्याआधीच मुख्य रस्त्यावर डावीकडे वारी गाव लागते. हनुमान मंदिर येथुन साधारण १ कि.मी.अंतरावर आहे. हे संपुर्ण गाव ओलांडुन आपण गावाबाहेरील टेकडीवर असलेल्या भैरवगडाकडे पोहोचतो. वाण नदीच्या काठावर असलेल्या एका टेकडीवजा उंचवट्यावर भैरवगडचा प्राचीन किल्ला आहे. साधारण त्रिकोणी आकाराच्या या किल्ल्याला दोन बाजुंनी वाण नदी पात्राचे १०० फुटापेक्षा जास्त खोल नैसर्गीक खंदकाचे सरंक्षण लाभलेले असुन जमीनीच्या बाजुने साधारण ४० फुट खोल खंदक खोदुन किल्ला मुख्य भूभागापासुन वेगळा करण्यात आला आहे. गडावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने गावकऱ्यांनी गडाच्या दगडांचा व मातीचा वापर करून आपली घरे बांधली आहेत. तटबंदीची दगड माती उकरून काढली असल्याने तटबंदीच्या बांधकामासाठी वापरलेल्या साहित्याचा अंदाज येत नाही पण सध्या जमीनीलगत शिल्लक असलेली तटबंदी मात्र पांढऱ्या चिकट मातीची आहे. किल्ल्याचा परीसर अर्धा एकरमध्ये सामावलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एकुण चार बुरुज आहेत. किल्ल्याचा उत्तराभिमुख असलेला दरवाजा आजही संपुर्णपणे शिल्लक असुन त्याची बांधणी दगडविटा अशी मिश्र स्वरुपाची आहे. दरवाजाशेजारी असलेला बुरुज कोसळलेला असला तरी दरवाजावर बंदुकीच्या मारगिरीसाठी असलेल्या जंग्या पहाता बुरुजाला देखील जंग्या असाव्या. दरवाजाच्या वरील बाजूस राहण्याची सोय असुन तेथे टेहळणीसाठी कमानी दिसुन येतात. किल्ल्याची नदीच्या बाजुने असलेली तटबंदी आजही शिल्लक आहे. किल्ल्यात शिरल्यावर डाव्या बाजुला असलेल्या दुसऱ्या बुरुजाला लागुनच तटबंदीत असलेली ७०-८० फुट खोल विहीर दिसुन येते. या विहिरीचे आतील बांधकाम दगडविटांनी केले आहे. किल्ल्याच्या तिसऱ्या बुरुजाच्या अलीकडे गावकऱ्यांनी सिमेंटमध्ये नव्याने बांधलेले देवीचे लहान मंदिर आहे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. संपुर्ण किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गावातील लोक हा किल्ला गोंड राजाने बांधला असुन वारी परगणा नरनाळा किल्ल्याचा सुभा असल्याचे सांगतात. येथे मुक्काम करायचा असल्यास गावातील मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. मंदिरासमोरच पाण्यासाठी हातपंप आहे. येथुन रिक्षाने जाण्यासाठी हनुमान मंदिराकडे चालत जावे कारण रिक्षा मंदिराकडे भरत असल्याने येथे थांबत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!