VAMBORI

TYPE : FORTRESS

DISTRICT : NAGAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

नगर जिल्ह्याची दुर्गभ्रमंती करताना आपल्याला केवळ गिरीदुर्गच नव्हे तर मोठ्या प्रमाणात नगरदुर्ग व गढी पहायला मिळतात. त्यातील बहुतांशी गावात जेथे गढी आहे ते गाव नगरकोटात वसल्याचे दिसुन येते. वांबोरी नावाचे असेच एक गाव आपल्याला नगर जिल्ह्यातील मांजरसुंबा परीसरात पहायला मिळते. वांबोरी हे गाव राहुरी या तालुक्याच्या ठिकाणाहुन १७ कि.मी. अंतरावर असुन अहमदनगर शहरापासुन ३० कि.मी.अंतरावर आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगातून वांबोरी घाटाने खाली उतरल्यावर आपण वांबोरी गावात पोहोचतो. गावात प्रवेश करण्यापुर्वी गावाबाहेर वाल्मिकीतीर्थ नावाची मोठी पुष्करणी आहे. हि संपुर्ण पुष्करणी घडीव दगडात बांधलेली असुन आत उतरण्यासाठी पायऱ्या चारही बाजुस पायऱ्या आहेत. पुष्करणी शेजारी जीर्णोद्धार केलेले महादेवाचे मंदिर पहायला मिळते. पुष्करणीच्या काठावर अज्ञात महापुरुषांच्या घडीव दगडात बांधलेल्या सुंदर समाध्या असुन या समाधी जवळ काही विरगळ ठेवलेले आहेत. या समाधीजवळच बाराव्या शतकातील पडझड झालेले मंदीर आहे. ... पुष्करणीच्या बाहेरील बाजुस मध्ययुगीन काळातील दोन मंदीरे असुन यातील एक मंदिर देवीचे तर दुसरे मंदिर खंडोबाचे आहे. या मंदिराजवळ चौकोनी आकाराची एक विहीर असुन जवळच विहिरीतील पाणी साठविण्याचा दगडी हौद आहे. या हौदाचा वापर जनावरांना पाणी पिण्यासाठी केला जात असावा. आजही हा दगडी हौद चांगल्या अवस्थेत असुन विहिरीचे पाणी मात्र वापरात नसल्याने खराब झालेले आहे. हा परिसर शांत व सुंदर असून आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. हा परीसर पाहुन झाल्यावर नदीवरील पुल ओलांडुन आपण गावात प्रवेश करतो. या ठिकाणी नगरकोटाचा पहिला दरवाजा असुन दरवाजा बाहेर हनुमानाचे तसेच शंकराचे मंदिर आहे. या दरवाजाचे खालील बांधकाम घडीव दगडात तर वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. कोटाचा लाकडी दरवाजा आजही शिल्लक असुन त्यात दिंडी दरवाजा आहे. हा दरवाजा नगर वेस तर दुसरा दरवाजा राहुरी वेस म्हणुन ओळखला जातो. कोटाचे हे दोन दरवाजे वगळता इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. गावाच्या मध्यवर्ती भागात वांबोरी गढी असुन आयताकृती आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली आहे. गढीच्या चार टोकावर चार बुरुज असुन पुर्व बाजुस मुख्य दरवाजा व पश्चिमेस दुसरा असे या गढीचे स्वरूप आहे. दरवाजाचे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले असुन त्यावर विटांनी सज्जे बांधलेले आहेत. तटबंदीचे खालील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. तटबंदीच्या वरील भागात फांजीवर विटांनी चर्या बांधलेल्या आहेत. गढीचा दरवाजा कमानीदार असुन त्यातील लाकडी दरवाजा आजही शिल्लक आहे. त्यातील दिंडी दरवाजाने आत शिरल्यावर आतील बाजुस चौक असुन या चौकात आत जाण्यासाठी दुसरा दरवाजा आहे. या चौकात पहारेकऱ्याना रहाण्यासाठी खोल्या असुन उजवीकडे दरवाजाच्या वरील भागात तसेच तटावर जाण्यासाठी जिना आहे. गढीची तटबंदी अखंड असल्याने या संपुर्ण तटावरून फेरी मारता येते. तटावर गढीच्या आत असलेल्या वाड्याची पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. यात एक विटांनी बांधलेली गोलाकार खोल विहीर असुन या विहिरीच्या तळापर्यंत जाण्यासाठी बंदिस्त पायरीमार्ग आहे. याशिवाय गढीच्या आतील बाजुस एका ठिकाणी तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटबंदीच्या काही भागात भिंतीत बांधलेली दालने पहायला मिळतात. गढीच्या वंशजांनी हि गढी इंग्रजांच्या काळात विकल्याने आता हि गढी एका जैन परीवाराची खाजगी मालमत्ता आहे. सध्या गढी कुलुपबंद असली तरी हे जैन कुटुंब गढी समोरच वास्तव्यास असुन गढी पहाण्यासाठी ते किल्ली व परवानगी सहजपणे देतात. गढीत मानवी वावर नसल्याने मोठ्या प्रमाणात वटवाघळे आहेत. संपुर्ण गढी पाहण्यास १५ मिनीटे पुरेशी होतात. याशिवाय वांबोरी गावाबाहेर नगर रस्त्याला लागुन खोलेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना असून मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. मंदीराची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन मंदिराची जेमतेम दुरुस्ती व रंगरंगोटी करून त्यावर नव्याने कळस बांधण्यात आला आहे. मंदिरा समोर दगडी बांधणीतील मोठी विहीर असुन आसपास काही विरगळी पहायला मिळतात. संपुर्ण वांबोरी गावाचा फेरफटका करण्यासाठी कमीतकमी दोन तास लागतात. खोलेश्वर मंदिर व वाल्मिकी तीर्थाशेजारी असलेले प्राचीन शिवमंदिर पहाता वांबोरी गाव बाराव्या शतकापासूनच अस्तित्वात असावे असे वाटते. वांबोरी गावाचा सुसंगत इतिहास आज जरी उपलब्ध नसला तरी शिवपूर्वकाळातील इतिहासाचे काही धागे वांबोरी गावापर्यंत पोहोचतात. शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे आठ गावाची पाटीलकी होती. मालोजी राजे व विठोजी राजे हि त्यांची दोन मुले. यातील मालोजींना पुणे व सुपे जहागिरी मिळाली तर विठोजी भोसलेंना मिळालेल्या आठ गावांमध्ये वांबोरी गावाचा उल्लेख येतो. मुंगी,पैठण,हिरडी,बेरडी,जिंती,वेरूळ, वांबोरी व वावी ही त्या आठ गावांची नावे होती. विठोजींनी आपल्या मुलांना हि गावे दिल्याचे वाचनात येते पण त्यापुढील इतिहास मात्र उपलब्ध नाही. वांबोरी गावात असलेले वाल्मीकी तीर्थ अहिल्याबाई होळकरांनी बांधल्याचे सांगीतले जाते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!