VAJRAGAD
TYPE : COASTAL FORT
DISTRICT : PALGHAR
HEIGHT : 160 FEET
GRADE : EASY
वज्रगड.... सध्या हा किल्ला जवळ जवळ नामशेष झालेला आहे. या गडावर बांधलेल्या दत्त मंदिरामुळे हा किल्ला दत्त डोंगरी/ गिरीज डोंगरी कींवा हिरा डोंगरी या नावाने परीसरात ओळखला जातो. वसई हे फार प्राचीन आणि ऎतिहासिक शहर आहे. परशुरामांनी निर्मिलेले आणि आद्य शंकराचार्य यांच्या वास्तव्याने पावन झालेले निर्मळ हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिदध आहेच. निर्मळ-वसई मार्गावर गिरिज येथे एक टेकडी आहे. चिमाजी आप्पांनी वसईच्या रणसंग्रामाच्या वेळी ही टेकडी ताब्यात घेतली आणि वसई किल्ला ते अर्नाळा किल्ला या दोन किल्ल्यांच्या दरम्यान असलेल्या या टेकडीवर मराठ्यांनी वसई मोहीमेच्या ऎन धामधुमीत वज्रगडाची उभारणी केली. वसई ते अर्नाळा या दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पोर्तुगिजांवर वचक बसविण्यासाठी मराठ्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती.
...
या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला व वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली. इ.स. १५२६ साली पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरु केली. त्याच बरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव, माहीम, केळवे या परिसरात किल्ल्यांची साखळीच तयार केली. पोर्तुगिजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अगणीत अत्याचार केले. या जुलमाच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर इ.स १७३७ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाईक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर इ मातब्बर सरदार पोर्तुगिजांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पुढे सरसावले. या वसई मोहिमेत वज्रगडाची उभारणी करण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील वसई व नालासोपारा या स्थानकांवरुन वज्रगडवर जाता येते. वसई पासून १४ किमी व नालासोपाऱ्या पासून ८ किमी अंतरावर गिरीज गाव आहे. दोन्हॊपैकी कुठल्याही स्थानकावर पश्चिमेला उतरून गिरीज गावात जाणाऱ्या बसने किंवा ६ आसनी रिक्षाने वज्रगडाच्या पायथ्याशी जाता येते. हा गड छोट्या झाडीभरल्या टेकडीवर उभा आहे. गिरीज गावाच्या ईशान्येकडे असलेल्या या गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. पायथ्यापासून १० मिनिटात आपण वज्रगडाच्या भग्न प्रवेशद्वारातून माचीवर प्रवेश करतो. प्रवेशव्दाराचे दोन्ही बुरुज जवळ जवळ नष्ट झालेले आहेत. डाव्या बाजूचा बुरुज झाडा- झुडुपांमध्ये लपलेला आहे. तो पाहाण्यासाठी पायऱ्या सोडून डावीकडे थोडे पुढे चालत जावे लागते. किल्ल्याचे बुरुज व तटबंदी मोठ मोठे दगड एकमेकांवर रचुन केलेली आहे. किल्ल्याची उभारणी युध्द पातळीवर केल्यामुळे या बांधकामात चून्याचा वापर केलेला आढळत नाही. बुरुज पाहुन पुन्हा पायऱ्याच्या मार्गावर येऊन वर चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडमाथ्यावर समोरच पाण्याचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले मोठे टाके दिसते. टाक्यात भरपूर पाणीसाठा आहे. गडावर असणाऱ्या बंद घराच्या जागी पुर्वी सदर होती व या सदरेखाली तळघर आहे. गडाच्या मागील बाजूने तटाखालुन या तळघरात जाता येते. टाक्याच्या काठावर व गडावर पिंपळ, औदुंबर, कडुलिंब आदीकरून वृक्ष आहेत. गडावर दत्तमंदिर आहे. बाजूलाच एका झाडाखाली मारुतीची मुर्ती आहे. गडावरून उत्तरेला अर्नाळा किल्ला व दक्षिणेला वसई किल्ला व आजुबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. या गडाच्या वाटेवर खांदेरी गडासारखेच काही लोह्जन्य खडक आहेत ज्यावर दुसऱ्या दगडाने ठोकले असता भांडयावर ठोकल्यासारखा आवाज येतो. दीडशे फुट उंचीच्या या टेकडीवरून पश्चिमेला अर्नाळ्याच्या बुरूजापासून पश्चीमेला पसरलेल्या अथांग सागर नजरेत येतो तर पुर्वेला जीवदानीचा डोंगर, तुंगारेश्वरचे पठार नजरेस पडते.
© Suresh Nimbalkar