VAIJNATH- AROGYABHAVANI

TYPE : ANCIENT SHIVMANDIR

DISTRICT : KOLHAPUR

दत्त संप्रदायात नृसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणांमधे औदुंबर, नरसोबावाडी आणि गाणगापुर या ठिकाणांचा प्रामुख्याने समावेश होतो. गुरुचरित्रात उल्लेख असणाऱ्या ठिकाणांमधे गुरुंचे वास्तव्य जेथे १२ वर्षे होते अशा ठिकाणाची माहिती फारशी प्रचलित नाही पण यातील एक ठिकाण आहे कोल्हापूर- बेळगाव सीमेवरील देवरवाडी गावातील वैदयनाथ आरोग्यभवानी मंदिर. श्री गुरु चरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे. गुरुचरित्र पाठ करताना त्यात पुढिल श्लोक वाचनात येतो. ऐसेपरी सांगोनी !! श्रीगुरु निघाले तेथोनी !! जेथे असे आरोग्यभवानी !! वैजनाथ महाक्षेत्र !! (अध्याय १४) आजपर्यंत हे ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ असावे असेच वाटत होते परंतु नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य व वास्तव्य असणाऱ्या स्थानाशी या ठिकाणाची जवळीक व प्राचीनता तसेच श्लोकातील आरोग्यभवानी देवी मंदिर आणि तेथील दत्त पादुका स्थान पाहता वर उल्लेख केलेले ठिकाणच हेच असावे असे वाटते. ... वैदयनाथ आरोग्यभवानी मंदिर कोल्हापूर- बेळगाव सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यात असुन महाराष्ट्रात फारसे प्रसिद्ध नसणारे हे मंदिर कर्नाटकातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वैदयनाथ मंदिर महिपालगडाच्या पायथ्याशी रमणीय व शांत परीसरात वसलेले असुन या परिसरात अनेक दुर्मिळ वनौषधी सापडतात. बेळगावहून सावंतवाडी रस्त्याने साधारणतः १२ कि.मी. अंतरावर आपण पुन्हा कोल्हापूर हद्दीत येतो. तेथे शिनोळी गावातून उजव्या हाताला देवरवाडी फाटा लागतो. बेळगावहुन ४५ मिनिटात आपण गडपायथ्याच्या देवरवाडी गावात पोहचतो. या गावातून गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढल्यानंतर आपण प्राचीन वैदयनाथ व आरोग्य भवानी मंदिर संकुलाजवळ पोहचतो. मंदिर संकुलाच्या बाहेरच एक भला मोठा घडीव दगडांनी बांधलेला तलाव आहे. मंदीर संकुलात वैदयनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचे मंदिर आहे. वैदयनाथ व आरोग्यभवानी हि स्वतंत्र मंदिरे असुन मधील बांधकाम अलीकडचे आहे. मंदिराच्या पुर्व बाजुला धर्मशाळा असुन तेथे रहाण्याची सोय होते. मुख्य मंदिर ११ व्या शतकातील असुन सध्या ऑईल पेंटने रंगवले आहे. प्रवेशद्वारातच एक शिलालेख असुन मंदिरासमोर एक सुंदर नंदी आहे. वैजनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे तर आरोग्य भवानी मंदिरात भवानीची दोन हात उंचीची उग्र व अष्ट्भुजा मुर्ती आहे. मंदिराच्या मंडपात सुमारे ३ फूट उंचीचा काळ्या पाषाणातील गणपती आहे. या भागात काळा पाषाण नसल्याने ही मुर्ती किंवा त्याचा दगड बाहेरून आणला असावा. मंदिरातील खांब कोरीव असुन आकर्षक व घाटदार आहेत. मंदिरा मागील आवारात दत्त पादुकां असुन त्यासमोर पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले कुंड आहे. यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. या कुंडात दगडावर कोरलेली अनेक शिल्पे दिसून येतात. मंदिर परिसरातूनच महिपाल गडाचे दर्शन होते. मंदिरा पासून गड ३ कि.मी. अंतरावर आहे. वैजनाथाचे दर्शन करुन मंदिराच्या मागील वाटेने महिपालगडाकडे जाताना या वाटेवर काही गुहा आहेत. गुहा ऐसपैस असुन दर्शनी गुहेखाली आणखी एक गुहा आहे. तेथे जाण्यासाठी दोन वाटा असुन खालील गुहा वर्षभर पाण्याने भरलेली असते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!