VADHU TULAPUR

TYPE : MONUMENTS

DISTRICT : PUNE

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वढू तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ आहे यापेक्षा जास्त माहीती शिवप्रेमींना नसते. पण कधीतरी या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधीवर जाऊन नतमस्तक होण्याचा विचार त्याच्या मनी असतो. मुळात वढू तुळापुर हे एक गाव नसुन वढू बुद्रूक व तुळापुर हि दोन स्वतंत्र गावे आहेत व या दोन्ही गावामध्ये एका रेषेत साधारण ४ कि.मी.अंतर आहे. तुळापूर व वढू बुद्रुक या दोन्ही गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळ पाहायला मिळतात. हि दोन्ही गावे भीमा नदीच्या दोन काठावर वसलेली असुन गाडी रस्त्याने जायचे ठरवल्यास या दोन्ही गावात १४ कि.मी. अंतर आहे. वढू बुद्रुक हे गाव पुणे-नगर महामार्गावरील तुळापूर फाट्यापासून ७ कि.मी अंतरावर भीमा नदीच्या काठावर आहे तर तुळापुर हे गाव भीमा-इंद्रायणी नदीच्या संगमावर वसलेले आहे. पुणे स्थानकापासून साधारण २५ कि.मी. अंतरावर श्री क्षेत्र तुळापूर आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार या गावाचे पूर्वीचे नाव नांगरवास असे होते. शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ नांगरवास गावी पडला होता. आज येथे असलेले संगमेश्वराचे प्राचीन मंदिर त्याकाळात देखील तेथे होते. ... इ.स.१६३३ च्या सुमारास मुरारपंत जगदेव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला व मंदीराच्या आवारात आपली सुवर्णतुला करून आपल्या वजना इतके सोने येथुन दान केले तेव्हापासुन हे गाव तुळापूर म्हणुन ओळखले जाऊ लागले. स्वराज्यासाठी ऐन तारुण्यात आपले जीवन अर्पण करणारे, छत्रपती संभाजी महाराज यांचे हे समाधी स्थळ. या समाधी स्थळाशेजारी कवी कलश यांची देखील समाधी आहे. ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज व त्यांचा मित्र कवी कलश यांना औरंगजेबाने याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे ठार केले होते. औरंगजेबाने शंभुराजांचा अनन्वित छळ करून त्यांचा अंत घडवून आणला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते नदीच्या परिसरात टाकले. मृत्यूसमयी राजांचे वय अवघे ३२ वर्षे होते. पुढे याच ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मृती स्थळ बांधण्यात आले आहे. तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर संभाजी महाराजांचे शौर्य प्रकट करणारे शिल्प लावलेले आहे. या शिल्पात संभाजी महाराजांना सिंहाचा जबडा फाडताना दाखवलेले आहे. आत गेल्यावर उजव्या बाजुस एखाद्या किल्ल्याची दगडी तटबंदी वाटावी असे बुरुजासहीत बांधलेले दगडी कुंपण असुन या कुंपणात शंभू राजांचा पुतळा उभारलेला आहे. हाती तलवार घेऊन वर आकाशाकडे नजर असणारा हा पुतळा एका मध्यम आकाराच्या स्तंभवजा चौथऱ्यावर उभारलेला आहे. या कुंपणाच्या डावीकडे एक छोटा चौकोनी चौथरा अशा स्वरूपाची कवी कलशांची समाधी आहे. या चौथऱ्यावर कवी कलशांचे बलिदान स्थळ असे लिहिलेले आहे. कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे मित्र व सल्लागार होते. संभाजी महाराजां सोबत त्यांना देखील या ठिकाणी ठार करण्यात आले. कवी कलश हे शंभू राजांचे बंधू, सखा आणि एक निष्ठावंत सेवक होते. आयुष्यभर त्यांनी राजांना साथ दिली. मृत्यूच्या दारापर्यंत ही मैत्री कायम होती. या समाधीच्या पुढील भागात एका दगडी प्रांगणात संगमेश्वराचे म्हणजे भगवान महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदीराच्या आवारात एक उंच दीपमाळ व त्या सोबत गणपती व हनुमानाचे लहान मंदिर आहे. संगमेश्वर मंदीर आजही त्याचा मुळ बाज टिकवून असल्याने मंदिरातील खांबांवर सुंदर नक्षीकाम पहायला मिळते.गर्भगृहाबाहेर गणपती व विठ्ठल रखुमाई यांच्या मुर्ती पहायला मिळतात.या मंदिराच्या खालील बाजूस इंद्रायणी-भीमा व भामा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. या संगमाच्या घाटावर महाबल्लाळेश्वर मंदिर,रामेश्वर मंदिर, कोटेश्वर मंदिर यासारखी अनेक छोटी-मोठी मंदिरे पहायला मिळतात. हा संपुर्ण परिसर पहाण्यासाठी व छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होण्यासाठी एक तास पुरेसा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजेंनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्यावर त्यांच्या पश्चात खुद्द औरंगजेब चालून आला, प्रचंड मोठी फौज त्याच्या सोबत होती. पहिल्या तीन वर्षात त्यानी कुतुबशहा आणि आदिलशहा यांचा पूर्ण पराभव केला आणि आता मराठ्यांचा पराभव करून संपूर्ण हिंदुस्थानावर मोगली कब्जा प्रस्थापित करायचा, असे ठरवून तो स्वराज्यावर चालून आला.बलाढ्य औरंगजेब चालून आला या गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी सिद्धी आणि पोर्तुगीज पण सरसावून उठले. सगळीकडून शत्रू चालून येत होते पण संभाजीराजांनी अत्यंत साहसाने चहूबाजूच्या शत्रूंना आपल्या तलवारीचे पाणी पाजले. परंतु फेब्रुवारी, १६८९ साली संभाजी महाराजांना औरंगजेबाने, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले. तब्बल ४० दिवस त्यांचा प्रचंड छळ करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली गेली.आता आपल्याला स्वराज्य सहजपणे गिळता येईल असे औरंगजेबाला वाटत होते. परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही. तुळापुर बरोबर वढू येथे देखील संभाजी राजांचे एक स्मारक उभारलेले आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!