VADGAON NIMBALKAR

TYPE : GADHI

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्रात वाडे व गढीकोट यांची संख्या हजारोच्या घरात आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशवे जरी सत्तेच्या केंद्रस्थानी असले तरी त्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अनेक वतनदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोट व गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. वडगाव निंबाळकर गावात असलेली राजे निंबाळकर यांची गढी त्यापैकी एक. या गढीचा फारसा वापर न झाल्याने व लवकरच इंग्रजांचे राज्य भारतावर आल्याने इतिहासात या गढीची फारसी माहिती दिसुन येत नाही. ... या गढीची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील निंबाळकर गढी पुण्यापासुन सासवड-जेजुरी-निरामार्गे ८७ कि.मी.अंतरावर तर फलटण पासुन २२ कि.मी. अंतरावर आहे. फलटणचे निंबाळकर राजे यांच्या वंशजांचे वतन असलेले भरभराटीस आलेले हे गाव आजही त्याच्या अंगाखांद्यावर भैरवनाथ मंदीर,विष्णु मंदिराच्या रूपाने गतकाळाच्या वैभवशाली खुणा बाळगुन आहे. गढीकडे जाताना वाटेत एक चौपाळ असुन त्यावर शके १८१२ साली बांधल्याचा शिलालेख पहायला मिळतो. गावाच्या मध्यभागी असलेल्या या गढीचे बांधकाम पहाता या गढीची बांधणी शिवकाळानंतर झाल्याचे जाणवते. साधारण आयताकृती आकार असलेली हि गढी अर्धा एकर परीसरावर दक्षिणोत्तर पसरलेली असुन गढीची लांबीरुंदी १५० x १२० फुट आहे. संपुर्ण गढीची तटबंदी ओबडधोबड व घडीव दगडांनी बांधलेली असुन तटावरील काही भाग व चर्या विटांनी बांधलेल्या आहेत. गढीच्या एकंदरीत बांधकामात कोणतीही सुसूत्रता नसुन दरवाजाच्या वरील बाजूस असलेल्या लाकडी तुळयावर मोठया प्रमाणात कोरीवकाम केले आहे. गढीच्या तटबंदीत एकुण चार बुरुज असुन तटबंदीची रुंदी ८-१० फुट तर उंची २०-२५ फुट आहे. गढीच्या तटबंदीची आतील भिंत चिकणमातीने बांधलेली असुन काही ठिकाणी ती कोसळली आहे.या बांधकामात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. गढीचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वाभिमुख असुन यावर पुर्वी नगारखाना किंवा तत्सम वास्तु असल्याचे जाणवते. या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन तटबंदीचा आतील भाग मोठया प्रमाणात ढासळला असल्याने तटावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या नष्ट झाल्या आहेत. गढीची नंतरच्या काळात वाटणी झाली असल्याने गढीचे आतील बाजुस दोन भाग पाडण्यात आले आहेत. यातील एक भाग वापरात असुन दुसरा भाग पुर्णपणे ओस पडला आहे. वापरात असलेल्या भागात नव्याने घर बांधले असुन या बांधकामाने गढीच्या आतील मूळ अवशेष पुर्णपणे भुईसपाट केलेले आहे तर दुसऱ्या भागात वावर नसल्याने आतील वास्तुंची मोठया प्रमाणात पडझड झाली असुन मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. दुसऱ्या भागात जाण्यासाठी मुख्य दरवाजा शेजारी काही अंतरावर तटबंदी फोडुन दुसरा दरवाजा नंतरच्या काळात बांधण्यात आला आहे. गढीची बाहेरील तटबंदी आजही सुस्थितीत असली तरी आतील बाजुस मोठया प्रमाणात पडझड झाल्याने तर काही ठिकाणी झाडी वाढल्याने फांजीवरून फिरता येत नाही. गढीत सध्या वास्तव्यास असलेला परिवार गढीबद्दल फारशी माहिती देऊ शकले नाहीत. निंबाळकर घराण्याचे वैभव पहाणारी हि गढी आज मात्र ओंस पडली आहे. गढीच्या आत पाहण्यासारखे काहीच नसल्याने गढी फिरण्यास १५ मिनीटे पुरेशी होतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!