UMARKHEDA

TYPE : FORTRESS

DISTRICT : JALNA

HEIGHT : 0

GRADE : EASY

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला किल्ल्यायेवजी मोठ्या प्रमाणात गढी पहायला मिळतात. जालना जिल्ह्यात देखील रोहीलगड व मस्तगड हे दोन किल्ले वगळता इतरत्र मोठ्या प्रमाणात गढी दिसुन येतात. हे प्रमाण अगदी ३० कि.मी. वर एक गढी असे धरले तरी वावगे ठरणार नाही. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अगदी अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने आजही सुस्थितीत आहेत. पण या सर्व गढीना वरचढ ठरणारी व बलदंड भुईकोट वाटणारी गढी आपल्याला जालना जिल्ह्यातील मंठा या तालुक्याच्या ठिकाणाजवळ असलेल्या उमरखेड गावात पहायला मिळते. आसपासच्या परिसरात हि गढी किल्ला म्हणुनच ओळखली जाते. उमरखेड गाव मंठा या तालुक्याच्या ठिकाणाहून २ कि.मी. अंतरावर आहे. उमरखेड गावात प्रवेश करण्यापुर्वी रस्त्याच्या डाव्या बाजुस हि गढी आपल्याला नजरेस पडते. संपुर्ण तटबंदीचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन बांधकाम सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला आहे. या तटबंदीत लहानमोठ्या आकाराचे एकुण नऊ बुरुज आहेत. गढीचा उत्तराभिमुख असलेला दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला असुन मध्यम आकाराचा आहे. ... दरवाजाच्या दर्शनी भागात दगडी कोरीव कमळे असुन वरील भागात तसेच बुरुजावार व आसपास हैद्राबाद स्वतंत्र संग्रामावेळी निजामाच्या लष्कराने डागलेल्या तोफांच्या व बंदुकीच्या खुणा पहायला मिळतात. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाने आत शिरल्यावर आपण गढीच्या बंदिस्त चौकात पोहोचतो. या चौकाच्या एका बाजुस तटबंदीची भिंत व आपण आलेला दरवाजा असुन, दोन बाजुस ओवऱ्या तर चौथ्या बाजुस गढीत प्रवेश करणारा दुसरा पुर्वाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाच्या वरील बाजुस श्री व्यंकटेश अशी अक्षरे कोरलेली आहेत. ओवरीच्या दर्शनी भागात अष्टकोनी दगडी खांब असुन त्याच्या वरील कमानीवर मोराचे चित्र कोरलेले आहे. ओवरीच्या आतील भागात एक अर्धवट बुजवलेली खिडकी असुन येथुन गढीबाहेर पडणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या ओवरीच्या कोपऱ्यात ७ फुट लांबीची जमीनीत अर्धवट गाडलेली लांब पल्ल्याची तोफ पहायला मिळते. या ओवऱ्या म्हणजे एकेकाळी घोडे बांधण्याची जागा होती. कधीकाळी हा चौक वरील बाजूने देखील बंदिस्त असल्याच्या खुणा दिसुन येतात. या संपुर्ण चौकाचे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. हा चौक पाहुन आपण समोरील दरवाजाने गढीच्या दुसऱ्या चौकात प्रवेश करतो. या दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या चौकात समोरील बाजुस व आपण आलेल्या दरवाजाच्या वरील बाजुस माळवदी खोल्या आहेत. डावीकडे गढीत माथ्यावर प्रवेश करणारा तिसरा मोठा दरवाजा आहे. या संपुर्ण दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. या दरवाजाने आत प्रवेश केल्यावर उजवीकडे तटबंदीला लागुन एक कोठार आहे. या कोठारातून गढीच्या आतील चौकात जाण्यासाठी लहान दरवाजा असुन कोठाराला लागुनच तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजुस गढीला पाणी पुरवठा करणारी गोलाकार विहीर असुन या विहिरीचे बांधकाम दगडविटा व चुन्यात केलेले आहे. या विहिरीजवळ एक दगडी ढोणी पहायला मिळते. गढीची तटबंदी व बुरुज आजही सुस्थितीत असल्याने त्यावरून फेरी मारता येते. गढीचे माथ्यावरील बांधकाम अचानकपणे थांबल्याने त्यावर फांजी व जंग्या बांधलेल्या नाहीत. तटबंदीवर पडलेले पावसाचे पाणी खाली वाहुन जाण्यासाठी जागोगाजी नाली बांधलेल्या आहेत. गढीच्या दक्षिणेला असलेल्या मध्यवर्ती बुरुजावर एक मिश्र धातूची तोफ पहायला मिळते. या तोफेच्या मागील बाजुस स्त्री मुखवटा कोरलेला असुन मध्यावर श्री व्यंकटेश अशी अक्षरे कोरलेली आहेत. तटबंदीवर फेरी मारून दरवाजाजवळ आल्यावर आपली गढीची प्रदक्षिणा पुर्ण होते. संपुर्ण गढी पहाण्यास पाउण तास पुरेसा होतो. गढीच्या तटबंदीची उंची जमिनीपासुन साधारण ४० फुट असुन येथुन संपुर्ण गाव व दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गढीचे मालक जोशी हे गढीत वास्तव्यास असल्याने गढी फिरण्यास त्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. हि गढी गोपाळकृष्ण केशवराज सुभेदार यांनी बांधलेली असुन हे घराणे मुळचे जांब-बावी,ता-भुम, जिल्हा-उस्मानाबाद येथील आहे. गोपाळकृष्ण सुभेदार यांना सेलु,जिवाजी जावळा व उमरखेड या तीन गावाच्या जहागीरी होत्या.त्यांनी सेलु व उमरखेड या दोन ठिकाणी गढी बांधल्या पण ते राहिले मात्र सेलु येथेच. वास्तुदोषामुळे त्यांनी हि गढी अर्धवटच बांधली व त्यांच्या मुनिमास रहायला दिली. गोपाळकृष्ण केशवराज हे साईबाबांचे समकालीन मानले जातात. हैद्राबाद निजामाशी हे घराणे एकनिष्ठ असूनही हैद्राबाद स्वतंत्र संग्रामावेळी निजामाच्या लष्कराला या गढीत स्वतंत्र सैनिक लपुन बसल्याचा संशय आल्याने त्यांनी या गढीवर तोफा व बंदुका यांचा मारा केला पण गढीचा ताबा त्यांना मिळवता आला नाही. या खुणा आजही आपल्याला गढीवर पहायला मिळतात. टीप- गढीत पाळीव कुत्रे मोकळे असल्याने थेट शिरण्याचे धाडस करू नये.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!