TORNA-PRACHANDGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : PUNE

HEIGHT : 4603 FEET

GRADE : MEDIUM

सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे !!!. अशी अप्रतिम उपमा देऊन इंग्रज अधिकारी जेम्स डग्लस याने गौरवलेला दुर्ग म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला तोरणा उर्फ प्रचंडगड. ईस्ट इंडिया कंपनीत असलेला एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904) यांनी मुंबई व आसपासच्या स्थळांना भेटी देऊन त्यांच्या तत्कालीन परिस्थितीवर लेख लिहिले होते. या संदर्भात त्यांनी इ.स.१८८०मध्ये तोरणा किल्ल्यास भेट दिली होती. उंची व आकार या दोन्ही बाबतीत प्रशस्त असलेला हा गड चढाईच्या बाबतीत देखील दुर्गप्रेमींची परीक्षा पहाणारा आहे. याचा प्रचंड आकार पाहुनच बहुदा महाराजांनी याचे नाव प्रचंडगड ठेवले असावे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेतील दोन उपरांगा पूर्वेला पसरलेल्या असुन यातील एका रांगेवर तोरणा व राजगड तर दुसऱ्या रांगेवर पुरंदर किल्ला बांधलेला आहे. वेल्हे हे तालुक्याचे ठिकाणच तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सध्या चार वाटा वापरात असुन त्यातील वेल्हे गावातुन गडावर जाणारा मार्ग सोयीचा म्हणजे कमी वेळ व कमी श्रम घेणारा आहे. ... दुसरा मार्ग राजगड ते बुधला माची (भगत दरवाजा), तिसरा मार्ग भट्टी गाव ते बुधला माची (वळंजाई दरवाजा) व चौथा मार्ग म्हणजे मेट पिलवरे ते बुधला माची (कोकण दरवाजा). याशिवाय गडावर येण्यासाठी स्थानिकांचे अजुन दोन मार्ग असुन ते फारसे वापरात नसल्याने धोकादायक आहेत. कानंद मावळात असलेल्या या किल्ल्याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे तर गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंड आहे. पुणे-नसरापुरमार्गे वेल्हे हे अंतर ६३ कि.मी. असुन स्वारगेट बस स्थानकातून वेल्हे येथे जाण्यासाठी दर तासाला बस आहे. वेल्हा गावाच्या पश्चिमेला थोड्या उंचावर एक लहानसे पठार असुन तोरणा किल्ल्याची एक डोंगरसोंड या पठारावर उतरलेली आहे. या डोंगर सोंडेवरून गडावर जाणारी वाट असुन आता या पठारापर्यंत गाडीमार्ग करण्यात आला आहे. खाजगी वहानाने पठारापर्यंत जाता येते. झुंजारमाची व बुधलामाची याच्या मध्यभागी असलेली उंच टेकडी म्हणजे बालेकिल्ला असे तोरणा किल्ल्याचे स्वरूप असुन वेल्हे गावातुन गेल्यास दोन दरवाजे पार करून आपला थेट बालेकिल्ल्यावरच प्रवेश होतो. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यासाठी साधारण दोन तास लागतात. वाटेमध्ये कोठेही पाणी नसल्याने सोबत पुरेसे पाणी घेऊनच गड चढण्यास सुरवात करावी. तोरणा किल्ल्याच्या मुख्य डोंगराला भिडण्यापूर्वी आपल्याला दोन टेकड्या पार कराव्या लागतात. पुर्वी गडाच्या परीघात अशा या टेकाडांवर गडाची संरक्षक मेटे असत. म्हणजे गड नांदता असताना गडावर जाणाऱ्याची चौकशी व झाडाझडती करूनच त्याला गडावर सोडले जाई. तोरणा किल्ल्याभोवती वरली पेठ, वाघदरा, भट्टी, बार्शीमाळ , पिलवरे अशा नावाची एकुण सात मेटे होती व त्यांची जबाबदारी भुरूक, देवगिरीकर, कोकाटे, पिलवरे या घराण्यावर होती. किल्ल्याची वाट धोकादायक असलेल्या ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले असल्याने आता चढउतार करणे सोपे झाले आहे. किल्ल्याच्या मुख्य डोंगराला भिडल्यावर जेथुन कातळात कोरलेल्या पायऱ्या सुरु होतात त्याच्या अलीकडे कड्याखाली कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. वापरात नसल्याने याचे पाणी हिरवेगार झाले आहे. येथुन उभ्या कातळात कोरलेल्या ३०-४० पायऱ्या चढुन आपण कड्यावर बांधलेल्या दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा दोन लहान बुरुजात बांधलेला असुन मुख्य दरवाजाचा संरक्षक दरवाजा आहे. येथुन पुन्हा ५०-६० बांधीव पायऱ्या चढुन आपण कोठी दरवाजा नावाने ओळखला जाणाऱ्या बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा दोन प्रशस्त बुरुजात लपवलेला असुन त्यावर नव्याने लाकडी दार लावण्यात आले आहे. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजाने आत शिरल्यावर डावीकडील तटावरून आपल्या दुर्गभ्रमंतीस सुरवात करावी. सुरवातीस दरवाजा जवळ तटाला लागुन एक दगडी घुमटी असुन त्यात तोरणजाई व इतर दोन देवतांच्या मुर्ती आहेत. महाराजांना तोरणावरील धनाचा लाभ याच ठिकाणी झाल्याचे मानले जाते. येथे समोरील घळीत पाणी अडविण्यासाठी लहानशी दगडी भिंत घातलेली असुन कोरडा पडलेला बंधारा आहे. या बंधाऱ्याच्या पुढील भागात काहीशा अंतरावर पाण्याने भरलेले टाके आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन पुढे जाताना तटात बांधलेली काही शौचकुप तसेच खालील वाटेवर मारा करण्याच्या जागा पहायला मिळतात. तटबंदीच्या या टोकावर मोठा बुरुज बांधलेला असुन हा बुरुज हनुमान बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजाच्या भिंतीतील लहानशा देवळीत हनुमानाची मुर्ती स्थापन केलेली आहे. येथुन सरळ पुढे आल्यावर आपण गडाच्या पुर्व टोकावर असलेल्या भेल बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाखाली दोन उतरत्या टप्प्यात लांबवर पसरलेली निमुळती डोंगरसोंड असुन हे दोन्ही टप्पे प्रत्येक टोकावर चिलखती बुरुज व काठावर तटबंदी बांधुन बंदिस्त करण्यात आले आहेत. गडाची हि डोंगरसोंड झुंजारमाची म्हणुन ओळखली जाते. या बुरुजाच्या डावीकडे तटाला लागुन एक लोखंडी शिडी असुन हि शिडी उतरून झुंजार माचीवर जाता येते. डोंगर भटकंतीची सवय नसणाऱ्यानी या वाटेला शक्यतो जाऊ नये. शिडीने खाली उतरल्यावर दरीच्या काठाने चालत आपण पहिल्या टप्प्यावरील चिलखती बुरुजावर पोहोचतो. या बुरुजात एक बांधीव भुयारी दरवाजा असुन त्यातील पायऱ्या उतरून आपण बुरुजाबाहेरील चिलखतात पोहोचतो. येथुन माचीच्या पुढील भागात जाण्यासाठी एक कातळटप्पा उतरावा लागतो. हा टप्पा उतरल्यावर सुरवातीस अवशेष स्वरूपात शिल्लक असलेली झुंजार माचीची सदर पहायला मिळते. सदरेच्या पुढील भागात डावीकडील तटबंदीत एक शौचकुप असुन उजवीकडील तटात एक शौचकुप व एक मारा करण्याची जागा आहे. येथुन पुढे जाताना वाटेवर पाण्याची दोन बुजलेली टाकी असुन तटबंदीच्या दोन्ही बाजुस बाहेर जाण्यासाठी दोन कमानीदार दरवाजे आहेत. यातुन खाली उतरणाऱ्या वाटा मात्र मोडलेल्या आहेत. येथुन पुढे आल्यावर माचीच्या टोकाशी असलेल्या बुरुजात हिरव्यागार पाण्याने भरलेले आयताकृती आकाराचे पाण्याचे टाके पहायला मिळते. माचीच्या टोकावर असलेला झुंजार बुरुज चांगलाच मोठा असुन याच्या दोन्ही बाजुस असलेल्या तटावरून बुरुजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. बुरुजाचा तळातील भाग कातळात कोरलेला असुन वरील बांधकाम मात्र घडीव दगडात केलेले आहे. बुरुजाच्या तळाशी बाहेरील चिलखतात जाण्यासाठी भुयारी मार्ग असुन हा संपुर्ण मार्ग कातळात कोरलेला आहे. बुरुजाबाहेरील चिलखत काही प्रमाणात कातळात कोरलेले असुन वरील भाग दगडांनी बांधलेला आहे. सर्पासारखे वळसे घेत बांधलेल्या तटबंदीने झुंजारमाचीला नावाप्रमाणेच झुंजार बनवले आहे. झुंजार बुरुजावरून राजगड किल्ल्याचे एक वेगळेच रूप पहायला मिळते. पावसाळ्यात झुंजार माचीवर जाणे धोकादायक आहे. झुंजारमाची पाहुन झाल्यावर पुन्हा भेल बुरुजावर यावे व आपली पुढील दुर्गभ्रमंती सुरु करावी. भेल बुरुजाच्या परिसरात नव्याने उभारलेला ध्वजस्तंभ असुन त्याच्या आसपास अनेक घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. पुढे एका जुन्या चौथऱ्यावर अलीकडील काळात बांधलेली छप्पर उडालेली पण भिंती शिल्लक वास्तु पहायला मिळते. येथुन पुढे आल्यावर कातळात कोरलेले एक प्रचंड मोठे खांब टाके पहायला मिळते. टाक्याचा विस्तार व त्यातील खांब पहाता हे टाके म्हणजे एखादी लेणी असल्याचे भासते. गडावरील मेंगाई देवीच्या नावाने हे टाके मेंगाई टाके म्हणुन ओळखले जाते. तटावरून सरळ पुढे आल्यावर आपण टकमक बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाशेजारी तटाला लागुन पाण्याचे एक टाके असुन त्याच्या पुढील भागात एक लहान गुहा आहे. या गुहेत बांधीव तोंड असलेले दोन लहान बळद असुन परंपरेने त्याला तेला-तुपाचे रांजण समजावे. बुरुजाच्या उजवीकडे भलामोठा समाधी चौथरा असुन त्याच्या वरील बाजुस पुरातत्व खात्याने नव्याने बांधलेले तोरणेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात दोन समाधी,एक तुळशी वृंदावन व दिपमाळेचे अवशेष आहेत. यातील एक समाधी धानेबच्या दिवेकर आडनावाच्या ब्राह्मणाची असल्याचे सांगितले जाते. वेल्हे गावातील स्थानिक या ब्राह्मणाच्या पिशाच्चाच्या काही कथा सांगतात इतकेच नव्हे तर पण तोरण्यावरील मुक्कामात काही दुर्गप्रवाशांनी त्यांना झालेल्या विचित्र भासाबद्दल लिहून ठेवले आहे. तोरणेश्वर मंदिरासमोर काही अंतरावर मेंगाई देवीचे जिर्णोद्धार केलेले मंदिर आहे. मंदीरात एक लहानशी घुमटी बांधलेली असुन त्यात मेंगाई देवीची व इतर तीन मुर्ती आहेत. मंदिराशेजारी सदरेचा अथवा किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा असुन या परिसरात असलेले घरांचे अवशेष पहाता गडाची मुळ वस्ती याच भागात असावी. गडावरील हे सर्वात उंच ठिकाण असुन या ठिकाणी किल्याची उंची समुद्रसपाटीपासून ४६०३ फूट असुन संपुर्ण किल्ल्याचा विस्तार साधारण ४०० एकर इतका आहे. या भागातुन संपुर्ण किल्ल्याचा विस्तार तसेच केंजळगड, रोहीडा,सिंहगड, पुरंदर-वज्रगड, लिंगाणा, हे किल्ले सहजपणे ओळखता येतात. मंदीराच्या दुसऱ्या बाजुस उतारावर नव्याने बांधलेला लक्कडखाना व अंबरखाना वास्तु असुन त्याशेजारी खोकड टाके हे पाण्याचे बांधीव टाके आहे. या टाक्यात बारमाही पाझरणारा झरा असुन याचे पाणी पिण्यासाठी वर्षभर उपलब्ध असते. या टाक्याजवळ एक मोठी व दोन लहान अशा तीन घुमटी असुन त्या समाधीच्या कि देवतांच्या याचा बोध होत नाही. जवळील पाणी संपले असल्यास येथे पाणी भरून व पुढे मोठा पल्ला फिरायचा असल्याने थोडीफार पोटपूजा व विश्रांती करून पुढील भटकंतीस सुरवात करावी. आपली पुढील भटकंती हि समोर दिसणाऱ्या कोठी दरवाजाच्या उजवीकडील तटावरून सुरु करावी. येथुन भटकंतीला सुरवात केल्यावर सर्वप्रथम सफेली बुरुज,दुसरा माळेचा बुरुज तिसरा फुटका बुरुज अशी भटकंती करत आपण कोकण दरवाजा जवळ पोहोचतो. कोकणच्या दिशेला असल्याने या दरवाजाला कोकण दरवाजा नाव पडले असावे. कोकण दरवाजाच्या बुरुजावरून गडाच्या पश्चिमेला पसरलेल्या बुधला माचीचे विलोभनीय दर्शन घडते. या दरवाजाच्या अलीकडे असलेल्या उंचवट्यावर कातळात कोरलेली दोन पाण्याची टाकी पहायला मिळतात. यातील एक टाके म्हसोबा टाके तर दुसरे टाके तोरण टाके म्हणुन ओळखले जाते. यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. कोकण दरवाजाचा भाग चांगलाच प्रशस्त असुन पुर्वाभिमुख असलेला हा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला आहे. मुख्य दरवाजाला कवेत घेण्यासाठी हा दरवाजा एका बुरुजात बांधलेला असुन समोरील दुसरा बुरुज त्यासमोर वळणदार बांधुन दरवाजा समोर अरुंद बोळ निर्माण केले आहे जेणेकरून जास्त सैनिक दरवाजाबाहेर थांबु शकत नाहीत. दरवाजाच्या आतील बाजुस असलेल्या बंदिस्त चौकाचे छप्पर आता ढासळलेले असुन या चौकातुन तसेच दोन्ही बाजुस असलेल्या तटबंदी वरून दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाची दगडी कमान आजही सुस्थितीत असुन त्यात नव्याने लाकडी दारे बसवलेली आहेत. या दरवाजाने बाहेर पडल्यावर आपली बालेकिल्ल्याची फेरी पुर्ण होते व बुधला माचीच्या प्रदक्षिणेस सुरवात होते. बुधला माची एका अरुंद सोंडेने बालेकिल्ल्याशी जोडलेली असुन दरवाजातून १५-२० पायऱ्या उतरल्यावर आपला या सोंडेवर प्रवेश होतो. सोंडेवरील वाट घसाऱ्याची असुन सुरक्षेसाठी पुरातत्व खात्याने या सोंडेवर लोखंडी कठडे उभारलेले आहेत. बुधला माचीवर उतरत जाणारी हि वाट तीन टप्प्यात खाली उतरते. या वाटेच्या पहील्या टप्प्याच्या टोकावर झुंजार माचीप्रमाणे चिलखती बुरुज बांधलेला असुन हा बुरुज चिलखत बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावर जाण्यासाठी दोन्ही बाजुस पायऱ्या बांधलेल्या असुन बुरुजाबाहेरील चिलखतात जाण्यासाठी कातळात कोरलेला भुयारी मार्ग आहे. बाहेरील चिलखत तळाशी कातळात कोरलेले असुन वरील भागात बांधकाम करून त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. चिलखत बुरुजाला उजवीकडे वळसा घालुन आपण सोंडेच्या दुसऱ्या टप्प्यावर उतरतो. या टप्प्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या तीव्र उतारावर तटबंदी बांधलेली असुन या तटबंदीच्या मध्यावर व टोकावर बुरुज बांधलेले आहेत. जसजसे आपण खाली उतरत जातो तसतशी गडाची सोंड रुंद होत जाते. हि सोंड खाली दोन्ही बाजुस तटाने बंदीस्त केलेली असुन सोंडेचा दुसरा टप्पा हत्तीमाळ म्हणुन ओळखला जातो. या माळाच्या सुरवातीला वाटेवर असलेली आडवी तटबंदी पहाता या तटबंदीत कधीकाळी लहान दरवाजा असावा असे वाटते. सोंडेच्या टोकावर असलेला बुरुज आज पुर्णपणे नष्ट झाला असुन येथे बुरुज असल्याच्या केवळ खुणा शिल्लक आहेत. हत्तीमाळ बुरुजाला थोडे अलीकडे डाव्या बाजुने वळसा घालत आपण सोंडेच्या तिसऱ्या टप्प्यावर म्हणजे मुख्य माचीवर उतरतो. माची उतरल्यावर उजवीकडे खालील बाजुस तटबंदीत दगडमाती पडुन बुजलेला एक लहान दरवाजा असुन हा दरवाजा चिणला दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या दरवाजाकडे जाणारी वाट मात्र तीव्र उताराची व घसाऱ्याची असल्याने धोकादायक आहे. येथुन थोडे पुढे आल्यावर डावीकडे कातळात कोरलेली तीन टाकी पहायला मिळतात. हि टाकी महाळुंगे टाके ,वेताळ टाके व पाताळगंगा या नावाने ओळखली जातात. या टाक्याजवळ एक दगडी ढोणी पडलेली आहे. येथुन मागे न वळता तटबंदीच्या काठाने कारवीच्या झुडुपातून वाट काढत सरळ पुढे आल्यावर तटबंदीला लागुन बुजलेल्या अवस्थेतील अजुन एक टाके पहायला मिळते. हे टाके शिवगंगा टाके म्हणुन ओळखले जाते. या टाक्याकडून समोरील तटबंदीत उतारावर असलेला चिलखती बुरुज व त्याच्या अलीकडे भगत दरवाजा नजरेस पडतो. येथुन भगत दरवाजाकडे जाण्यासाठी मळलेली वाट नसुन झाडीझुडपातुन वाट काढतच तेथे पोहचावे लागते. भगत दरवाजा म्हणजे पुर्वी तोरण्यावरून राजगडाकडे जाणारा राजमार्ग. पण आज या दरवाजाने खाली उतरणारी वाट पुर्णपणे मोडलेली आहे. भगत दरवाजा हा बुधला माचीवरील प्राचीन दरवाजा असुन उत्तराभिमुख असलेल्या या दरवाजाच्या बाहेरील बाजुस कमानीवर दोन शरभ कोरलेले आहे. यातील एका शरभाची मोठ्या प्रमाणात झीज झालेली असुन दुसरा शरभ आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. या दरवाजा पासुन काही अंतरावर बुरुजाबाहेरील चिलखतात उतरण्यासाठी लहान दरवाजा असुन, हा दरवाजा लक्ष न दिल्यास बुजण्याच्या मार्गावर आहे. या चिलखतात उतरले असता पुढील बाजुस आत येण्यासाठी दुसरा दरवाजा असुन दगडमाती पडुन हा दरवाजा बंद झालेला आहे. माचीचा हा भाग पाहुन उजवीकडे उंचावर असलेल्या मळलेल्या वाटेवर जावे. या वाटेवर असलेला वास्तुचा चौथरा पहाता येथे बुधला माचीचे दारूगोळ्याचे कोठार असावे. येथुन पुढे आल्यावर एक पायवाट खाली तटबंदीच्या दिशेने जाताना दिसते. या वाटेने खाली उतरले असता आपण वळंजाई दरवाजात पोहोचतो. पश्चिमाभिमुख असलेला हा दरवाजा एक बुरुज व तटबंदीच्या आडोशाने बांधलेला असुन पुढील बाजुस वळणदार बुरुज बांधुन त्याचा दर्शनी भाग लपवलेला आहे. या दरवाजाचा वापर किल्ल्याखालील स्थानिक आजही करत असल्याने यातुन खाली उतरणारी पायवाट भट्टी गावात जाते. या वाटेने थोडे खाली उतरले असता कड्याखाली कातळात कोरलेले पाण्याचे टाके पहायला मिळते. यातील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. हे टाके पाहुन मागे फिरावे व पुन्हा मुख्य वाटेवर यावे. वाटेला पुढे उजवीकडे व डावीकडे अशा दोन पायवाटा असुन या दोन्ही वाटा माचीवरील बुधला व विशाळा या दोन्ही सुळक्याला वळसा घालत एकत्र येतात. आपण उजवीकडील वाटेने आपली गडफेरी सुरु ठेवावी. या वाटेवर डाव्या बाजुस बुधला सुळक्यावर जाणारी वाट आहे. बुधला सुळक्यावर कोणतेही अवशेष नाहीत पण साहस म्हणुन हा सुळका चढता येईल. या सुळक्याचा शेवटचा टप्पा चढण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. वाटेने पुढे जाताना उजवीकडील तटबंदीत अजुन एक दरवाजा पहायला मिळतो. पश्चिमाभिमुख असलेला हा दरवाजा दोन लहान बुरुजामध्ये बांधलेला असुन चित्ता दरवाजा म्हणुन ओळखला जातो. येथुन पुढे जाताना डावीकडे कातळात कोरलेले पण सध्या तोंडावर माती व गाळ साठून बुजत आलेले पाण्याचे टाके दिसते. हे खांब टाके अथवा लेणे असुन ते कापुरलेणे म्हणुनच ओळखले जाते. या लेण्यात सध्या पाणी जमा झाले असुन ते पिण्यायोग्य आहे. स्थानिक या टाक्याला आजही पुजत असुन येथे वाहिलेली खणबांगडी पहाता येथे देवीचे मंदिर असावे. बुधला माचीवर गंगजाई-घंगाळजाई व वरदानी यांची मंदिरे असल्याचे उल्लेख येतात पण त्याची स्थान निश्चिती होत नाही. कापुरलेणे पाहुन विशाळा टेकडीला वळसा मारत आपण बुधला माचीच्या डाव्या टोकाला असलेल्या घोडजिन टोकावर पोहोचतो. विशाळा टेकडीवर काहीच अवशेष नसल्याने तेथे जाण्याची गरज नाही. पण लिंगाणा व त्यामागील रायगड पहायचा असल्यास विशाळा टेकडीवर जाणे गरजेचे आहे. घोडजीन टोकावर दुहेरी तटबंदीचे चिलखत असलेला प्रशस्त बुरुज असुन या चिलखतात उतरण्यासाठी दोन लहान दरवाजे आहेत. या दोन्ही दरवाजांच्या तोंडावर दगडमाती जमा झाल्याने ते अर्धवट बुजलेले आहेत. यातील एका दरवाजाने सरपटत या चिलखतात जाता येते. या बुरुजाजवळ एका वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. येथे वाट विशाळा टेकडीला वळसा घालत डावीकडे वळते. या वाटेने तटबंदीच्या काठावरून आपण बुधला माचीच्या उजव्या टोकावर पोहोचतो. या वाटेने जाताना तटबंदीच्या काठावर असलेले चौकीचे अवशेष पहायला मिळतात. बुधला माचीचे हे टोक झुंजार बुरुजाप्रमाणे प्रशस्त बुरुजाने बांधलेले असुन या बुरुजाला दुहेरी तटबंदीचे कवच घातले आहे. बुरुजाबाहेरील या चिलखतात जाण्यासाठी दोन दरवाजे असुन दगडमाती साठल्याने ते बंद झाले आहेत. त्यामुळे या चिलखतात जाता येत नाही. या बुरुजाला विशिष्ट असे नाव दिसत नाही पण काही ठिकाणी बुधला माचीवर भेद बुरुज असल्याचा उल्लेख येतो, तो बहुधा हाच बुरुज असावा. हा बुरुज पाहुन झाल्यावर आल्या वाटेने मागे न फिरता विशाळा सुळक्याला फेरी मारत तसेच पुढे निघावे. येथे कड्याला गोलाकार तटबंदीचे जाडजुड पागोटे घालुन आतील बाजुस टाके खोदुन त्यात पाणी साठवलेले आहे. संरक्षण व पाण्याची गरज अशा दोन्ही गोष्टी यातुन साध्य केल्या आहेत. असेच दुसरे टाके आपल्याला वाटेच्या पुढील भागात पहायला मिळते पण या टाक्यात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला आहे. या टाक्याजवळ शेंदूर फासलेले एक सप्तमातृका शिल्प आहे. मेंगाई मंदिरातील नकाशात या टाक्याचा खांब टाके असा उल्लेख येतो पण येथे कोणतेही भुमिगत टाके दिसत नाही. येथुन बुधला सुळक्याला वळसा मारत आपण भगत दरवाजाच्या पुढील भागात असलेल्या डोंगर सोंडेवर पोहोचतो. या डोंगरसोंडेवर आपल्याला कातळात कोरलेले पाण्याचे टाके पहायला मिळते. या उताराचा खालील भाग तटबंदीने बंदिस्त केलेला असुन वरील भागात दुसरी तटबंदी उभारण्यात आली आहे. या तटबंदीत तोफा तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. तटबंदीच्या पुढील भागात असलेल्या बुरुजाखाली लोखंडी शिडी लावलेली असुन राजगडहुन आल्यास याच शिडीवरून आपला बुधला माचीवर प्रवेश होतो. भगत दरवाजा येथुन बराच दूर आहे. येथुन पठारावरून राजगडकडे जाणारी वाट स्पष्टपणे दिसुन येते. येथुन बुधला सुळक्याला वळसा मारत पुढे आल्यावर आपण वाटेच्या सुरवातीला दोन फाटे फुटलेल्या ठिकाणी पोहोचतो. येथुन कोकण दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी साधारण सहा तास लागतात. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील एक प्रमुख किल्ला म्हणुन तोरणा किल्ल्याची ओळख आहे. तोरणा किल्ला नेमका कोणत्या काळात बांधला गेला याचे संदर्भ आज जरी उपलब्ध नसले तरी बालेकिल्ल्यावरील खांबटाके व बुधला माचीवरील कापुरटाके पहाता याची निर्मीती प्राचीन काळात झाली हे निश्चित. बहमनीकाळात इ.स. १४७० ते १४८६ दरम्यान मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. बहमणीशाहीच्या विभाजननंतर हा किल्ला निजामशाहीत आला. या काळात या किल्ल्याचा तरोनी/ तोरनाह असा उल्लेख येतो तर अब्दुल हमीद लाहोरीच्या बादशहानाम्यात याचा उल्लेख नूरुंद असा येतो. शाळेत शिकवलेल्या इतिहासापेक्षा मूळ इतिहास खूपच वेगळा असुन गडाच्या घेऱ्यात तोरण फळाची मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने या किल्ल्याला तोरणा नाव पडल्याचे मानले जाते. शिवाय तोरणा किल्ला घेण्यापुर्वी महाराजांच्या ताब्यात पुरंदर,कोंढाणा, रोहीडा,मुरुंबदेव डोंगर(राजगड) हे किल्ले आधीच आले होते. इ.स.१६२४ मध्ये आदिलशाही काळात कानद खोऱ्याचे देशमुख कान्होजी झुंजारराव मरळ हे या किल्ल्याची व्यवस्था पहात होते. अदिलशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला किल्लेदाराशी गोडी-गुलाबीचे धोरण अवलंबत रक्ताचा एकही थेंब न सांडता शिवाजी महाराजांनी इ.स.१६४७ साली ताब्यात घेतला. गडाचा प्रचंड विस्तार पाहुन त्यांनी त्याचे प्रचंडगड असे नामकरण केले. किल्ला ताब्यात आल्यावर त्याची दुरुस्ती करीत असतांना कोठी दरवाजा जवळ मोठ्या प्रमाणात धनाचा साठा हाती आला. या धनाचा वापर महाराजांनी तोरण्याची दुरुस्ती व राजगड किल्ल्याच्या बांधणीसाठी केला. इ.स.१६४८ साली बळवंतराव कोकाटे हे तोरणा किल्ल्याचे किल्लेदार होते. तोरणा किल्ला राजधानी राजगडला बिलगुनच असल्याने पुरंदरच्या तहात हा किल्ला महाराजांनी आपल्याच ताब्यात ठेवला. आग्र्यातील सुटकेनंतर इ.स. १६७१-७२ मध्ये महाराजांनी त्यांच्या ताब्यातील अनेक किल्ल्यांची दुरुस्ती केली. यावेळी तोरणा किल्ल्यासाठी पाच हजार होन इतकी रक्कम खर्च करण्यात आली. यावेळी किल्ल्यावर काही इमारती बांधण्यात आल्या. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर झालेल्या धामधुमीत इ.स. १६८९ मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. यावेळी औरंगजेबने तोरण्याचा किल्लेदार म्हणून हातमखानाची नेमणूक केली व त्याला किल्लेदारखान पदवी देण्यात आली. या हातमखानाने त्याचा गुरु अताउल्ला याला लिहिलेले पत्र उपलब्ध असुन त्यात या किल्ल्याचे मजेशीर वर्णन आलेले आहे. या पत्रात तो म्हणतो, साहेबजाद्यांचा निरोप घेवून मी दुर्गम मार्ग आणि संकटमय घाट पार करून तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. पायथ्यापासून टोकापर्यंत रस्ता काहीसा घोड्यावर बसून तर काहिसा पायी चालून पार करता येईल. यानंतर स्वारासाठी अगर पायी चालण्यासाठी वाट अशी नाही. किल्ल्याच्या एका बाजूला अलफलुस्साफलीन (पाताळातील नरक) वाटावी अशी खोल दरी आहे. किल्ल्यावर पुढे जाण्यास वाट नाही. येथे डोंगरात ओबडधोबड पायर्याा काढल्या असुन धडधाकट, तरुण, मजबूत आणि चपळ माणसेही त्या पायर्या चढून जाईपर्यंत काकुळतीला येतात. मग माझ्यासारख्या दुबळ्या म्हातार्यायची काय कथा ? या किल्ल्याची वाट अतिशय वेडीवाकडी असुन हा किल्ला आकाशाशी स्पर्धा करणारा आहे. दैवाच्या विलक्षण तडाख्यामुळे मी तोरण्यात येऊन पडलो आहे. हे स्थळ तिटकारा करण्यासारखे आहे. भुतांचे आणि राक्षसांचे निवासस्थान आहे. इ.स.१६९० च्या जुलै महीन्यात कान्होजी झुंजारराव यांनी तोरणा किल्ला जिंकून घेतला. यावेळी झालेल्या लढाईत किल्लेदार हातमखान मारला गेला. इ.स.१६९४ साली किल्लेदार आबाजी विश्वनाथ प्रभु शहाबुद्दीनच्या वेढ्यात मारले गेले. १० मार्च १७०४ रोजी मोगलांच्या वतीने अमानुल्लाखान त्याचा भाऊ अताउल्लाखान व हमीनुद्दिनखान यांनी हा किल्ला जिंकुन घेतला. यावेळी झालेल्या लढाईत किल्लेदार हरी बापुजी मारले गेले. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला हा मराठ्यांचा एकमेव किल्ला. इतर बहुतांशी किल्ले त्याने लाच देऊन व कपटनितीचा अवलंब करत ताब्यात घेतले होते. तोरणा किल्ला ताब्यात आल्यावर औरंगजेबने याचे नाव फतेहुल- घैब म्हणजे दैवी विजय असे ठेवले व अब्दुल्ला लोदीखान यांस किल्लेदार नेमले. यानंतर इ.स. १७०८ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात सरनौबत नागोजी कोकाटे यांनी गडावर मावळे चढवून पुन्हा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला. यावेळी सचिवानी त्यांना चापेत गाव इनाम दिले. पुढे हा किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात व इ.स.१८१८मध्ये इंग्रजांच्या ताब्यात आला. इंग्रजांनी हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात दिला. भोर संस्थान विलीन होईपर्यंत भोरच्या पंतसचिवांच्या आधिपत्याखाली असलेला हा किल्ला स्वातंत्र्यानंतर भारतात दाखल झाला. टीप- गडावर पाण्याची तसेच राहण्याची सोय असली तरी गडावर मुक्काम करण्यास मनाई आहे. गडाचे दरवाजे संध्याकाळी ५ वाजता बंद केले जातात ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता उघडले जातात. संपुर्ण किल्ला व्यवस्थीत पहायचा असल्यास साधारण ६-७ तास लागतात. यासाठी खाजगी वाहनाने गावात पहाटे पोहोचुन लवकर सुरवात केल्यास संपुर्ण किल्ला पहाता येतो. शिवाय खाजगी वाहन किल्ल्याखालील पठारावर जात असल्याने अर्ध्या तासाचा वेळ व काही प्रमाणात चढण्याचे श्रम देखील कमी होतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!