THIBA PALACE

TYPE : PALACE / MONUMENTS

DISTRICT : RATNAGIRI

थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली असुन १९१६ पर्यंत या राजवाड्यात ब्रम्हदेशच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. सध्या हा पॅलेस पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन त्यात वस्तुसंग्रहालय उभारले आहे. या राजवाड्यात थिबाची बेडरूम, कपडे आणि थिबाने वापरलेल्या काही गोष्टी आजही जतन करून ठेवल्या आहेत. थिबा रोडने या ठिकाणी आल्यावर भव्य पटांगणातील लाल रंगाची व मेंगलोरी कौलांची सुंदर वास्तु नजरेस पडते. विस्तीर्ण कातळावर वसलेला हा राजवाडा अशा ठिकाणी आहे जिथून समुद्राचे आणि शेजारच्या भाटये खाडीचे विलोभनीय दृष्य दिसते. ह्या राजवाडयाचे क्षेत्रफळ १४५०० चौ.फूट आहे. बांधकामावर ब्रिटीश व ब्राह्मी ह्या दोन्ही स्थापत्य शैलीचा प्रभाव जाणवतो. ... बाहेरील व्हरांडयांना असलेल्या कमानी ब्रिटीशशैली दर्शवितात तर उतरती छपरे पॅगोडांची आठवण करून देतात. राजवाड्याचे ठळक असे दोन भाग आहेत. पुढची बैठक आनि मागची शयनगृहे. या दोन्ही भागाना जोडण्यासाठी तळमजल्यावर व्हरांडा व त्याचे वरच्या मजल्यावर पूल आहे. थिबा राजाच्या मिडॉन घराण्याची राजमुद्रा पहिल्या मजल्यावरच्या गच्चीच्या दारावर विराजमान झालेली दिसते. तळतजल्यावरील बैठकीचा हॉल व पहिल्या मजल्यावरील दरबार हॉल सोडून एकूण 14 दालने आहेत. राजवाड्याच्या तळमजल्यावर संगमरवरी फरशीचं नृत्यगृह आहे. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्टया लावलेल्या असून अर्धवर्तुळाकार खिडक्यांना रंगबिरंगी इटालियन काचा लावलेल्या आहेत. सर्वात अप्रतिम आहे तो दरबार हॉल. दोन मजल्यांची उंची असलेला आणि लाकडी बाल्कनी असलेला हा दरबार हॉल थिबाच्या राजेपणाची ग्वाही देतो. याशिवाय जिना, स्वच्छतागृहे व मार्गिकांसाठी स्वतंत्र खोल्या आहेत. बांधकामात चिऱ्याबरोबर सागवानचा अत्यंत मुबलक व कल्पक वापर केलेला दिसतो. पहिल्या मजल्यावरील बेडरुमला जोडून असलेल्या न्हाणीघरात बाथटब दिसून येतो. मधल्या चौकामध्ये बांधलेला कारंजा राजवाडयाचे सौंदर्य वाढवतो तर राजवाड्याच्या मागे थिबा राजाने ब्रम्हदेशातुन आणलेली बुद्धमुर्ती स्थापन केलेली आहे. राजवाड्याच्या मागील बाजूच्या भागात आता पुरातन वस्तूसंग्रहालय आहे. तळमजल्यावर कोकणातील व देशातील इतर भागात सापडलेल्या विविध प्राचीन मूर्ती मांडल्या आहेत तर वरच्या मजल्यावर टूटू यांचा फोटो, जुन्या लाकडी खुर्च्या आणि कोकणातील प्राचीन मंदिरांची चित्र प्रदर्शनी आहेत. सोमवार सोडून इतर दिवशी हे वस्तूसंग्रहालय पर्यटकांसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुले असते. मार्च १९०७ला सुरू झालेल्या ह्या प्रशस्त राजवाडयाचे बांधकाम सुमारे चार वर्ष चालू होते. २७ एकर आणि साडेअकरा गुंठे विस्ताराच्या मोठ्या भूखंडावर एक लाख सदतीस हजार चारशे शहाऐंशी रुपये खर्च करून हा तीन मजली राजवाडा उभारला गेला आणि १३ नोव्हेंबर १९१० रोजी थिबा राजा आपल्या परिवारासह येथे राहण्यास गेला. राजवाडयाला लागूनच कर्मचाऱ्यांसाठी निवासव्यवस्था होती. येथून पूढे थिबा पॅाईंट स्थानावर जिजामाता गार्डन आहे. इथल्या मनोऱ्यावरून भाट्ये नदी, राजीवडा बंदर, अथांग समुद्र आणि भगवती किल्ला यांचे सुंदर दृश्य दिसते. थिबा राजाच्या भारतातील वास्तव्याशी निगडीत एक दुखरी किनार आहे. ब्रह्मदेशचा हा शेवटचा राजा ब्रिटीशांनी बंदिवान बनवून भारतात आणला आणि मृत्युपर्यंत येथेच बंदिवान म्हणून राहिला. २९ नोव्हेम्बर १८८५ ला ब्रिटीश सैन्याने त्याचा पराभव केला आणि त्याचे साम्राज्य संपले. थिबाचा जन्म मंडाले येथे १८५९ साली झाला आणि मृत्यु रत्नागिरी येथे १९ डिसेम्बर १९१६ ला झाला. ब्रम्हदेशाचे राजे मिडॉन यांचा हा राजपुत्र. १८७८ मध्ये मिडॉनच्या मृत्युनंतर तो राजा झाला. थिबा हा धार्मिक वृत्तीचा माणूस होता. तो राज्यावर आला त्या वेळी अर्धा ब्रम्हदेश ब्रिटीशानी काबीज केला होता. त्यामुळे ब्रिटीशांचा अन त्याचा संघर्ष होऊ लागला. ब्रिटीश अधिकारी त्याच्या दरबारात पादत्राणे उतरवून येण्याची प्रथा असतानाही बूट घालून प्रवेश करीत. थिबाने त्यावर आक्षेप घेतला व ब्रिटीशाना शह देण्यासाठी त्याने फ्रेंचाशी संधान बांधले व ब्रिटीशव्याप्त ब्रम्हदेशाची मुक्ती करण्यासाठी जनतेला प्रोत्साहन दिले. शेवटी ब्रिटीशांच्या सैन्यापुढे निभाव न लागल्याने हे राजघराणे ब्रिटीशांच्या हातात सापडले व २८ नोव्हेंबर १८८५ला ब्रम्हदेशाचे पारतंत्र्य सुरू झाले. थिबा त्याची राणी सुपायलती आणि त्यांच्या दोन मुली याना ब्रिटीशानी अटक केली. त्याने पुन्हा उठाव करु नये व त्याचा प्रजेशी संबंध राहु नये यासाठी ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरीत बंदिवान म्हणुन ठेवायचे ठरवले. १७ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजाला त्याच्या परिवारासह कॅनिंग बोटीने मद्रासला व तेथुन क्लाईव्ह बोटीने रत्नागिरीत आणले गेले. रत्नागिरी येथे आणून अक्कलकोटचे दिवाण रावबहादूर सुर्वे व रावसाहेब विष्णू फडके यांचे बंगले भाड्याने घेऊन तेथे त्यांना कैदेत ठेवण्यात आले. पण या जागा अपुऱ्या पडू लागल्याने ब्रिटीशानी रत्नागिरीच्या दक्षिण बाजूस भाट्ये खाडीच्या कडेस हा राजवाडा बांधला. हा राजवाडा थिबाच्या पसंतीने व देखरेखीखाली बांधण्यात आला. स्वतः थिबाने लाकडे व इतर साहित्य निवडून डिझाईन पसंत करून बांधकाम केले आहे. राजा सौंदर्याचा किती भोक्ता होता हे या राजवाडयावरून कळते. सरकारकडून तुटपुंजं पेन्शन मिळत असल्याने स्वत:बरोबर आणलेले जडजवाहीर विकुन थिबा राजाने हा राजवाडा सजवला. राजवाडयातील फर्निचरकरता बर्माचं सागवानी लाकूड ब्रह्मदेशातून मागवलं होतं. १९१० मध्ये थिबा तेथे रहावयास आला. थिबा आयुष्याच्या अंतापर्यंत म्हणजे १९.१२.१९१६ पर्यत या राजवाड्यात नजरकैदेत होता. मृत्युनंतर त्याचे पार्थिवसुध्दा ब्रह्मदेशला नेण्याची परवानगी तत्कालीन ब्रिटीश सरकारने नाकारली. थिबा राजाचे आयुष्यच नाट्यपूर्ण आणि नियतीचे क्रूर खेळ दाखविणारे आहे. राजाच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी राजवाडा आपल्या ताब्यात घेतला व राणीला तीन मुलींबरोबर ब्रह्मदेशात पाठवले. थिबा आणि त्याच्या कुटुंबियाच्या समाध्या रत्नागिरीतील शिवाजीनगर भागात आहेत असे सांगितले जाते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!