THAL/KHUBLADHA

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 0

GRADE : EASY

उंदेरी या जलदुर्गावर करडी नजर ठेवून असलेला थळ समुद्रकिनाऱ्यावरील किल्ला म्हणजे थळचा किल्ला किंवा खुबलढा किल्ला होय. खांदेरी किल्ल्याच्या उभारणीवेळी व नंतरही या किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. थळचा किल्ला अलिबाग पासून १० किमी उत्तरेकडे आहे. खांदेरी - उंदेरी किल्ले पहाण्यासाठी थळला जावेच लागते तेव्हा या इतिहासात लुप्त झालेल्या किल्ल्याची मोक्याची जागा पहाता येते. थळच्या किनाऱ्यावर असणाऱ्या नैसर्गिक उंचवट्यावर खुबलढा किल्ला उभा होता. ऐतिहासिक कागदपत्रातील नोंदीप्रमाणे या किल्ल्याला साधारण १०० फुट लांब तर ९० फुट रुंद तटबंदी असुन या किल्ल्याला चार बुरुज होते. आता या किल्ल्याचे केवळ पायाचे अवशेषच शिल्लक आहे या पायातील दोन बाजुचे बुरुजाचे अवशेष स्पष्टपणे ओळखुन येतात. बाकी पहाण्यासारखे काही उरलेले नाही. इथून दूरवर समुद्रात उंदेरी व खांदेरीची बेटे आपल्याला दिसतात. ... किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला मराठयांच्या आरमारी पराक्रमाचा साक्षीदार व त्याचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या किल्ल्यास अवश्य भेट द्यावी. इ.स १६५९ खांदेरी किल्ल्याची बांधणी सुरु केल्यावर या किल्ल्याला बांधकामाची रसद व इतर मदत पुरविण्यासाठी चौकीवजा असलेल्या या लहानशा किल्ल्याची बांधणी शिवाजी महाराजांनी केली. खांदेरी किल्ल्यातील सैनिक व मजूरांना बांधकामाची सामुग्री व इतर रसद पुरवण्याची जबाबदारी तसेच इंग्रज व सिद्दी यांच्यापासून नवीन तयार होणाऱ्या किल्ल्याचे जमिनीकडील बाजूकडून संरक्षण करण्याची जबाबदारी थळ किल्ल्यावर होती. आकाराने छोटा असला तरी या किल्ल्याच्या अवतीभवती बऱ्याच लढाया झालेल्या आहेत आणि किल्ल्याचा इतिहास देखील रक्तरंजित आहे. संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीच्या ताब्यात गेला. सेखोजी आंग्रे यांनी 8 जुलै १७३३मध्ये पेशव्यांच्या मदतीने पुन्हा या किल्ल्यावर ताबा मिळवला.यानंतर परत काही वर्षांनी म्हणजे १६ जुन १७४७ला परत हा किल्ला सिद्दीच्या ताब्यात गेला. पुढे १७५० मध्ये मानाजी आंग्रे याने हा किल्ला परत जिंकून घेतला. या युध्दात सिद्दीची २०० माणसे मारली गेली. या लढाईच्या वेळेस मानाजी आंग्रे यांच्या पायास गोळी लागली व ते मुक्कामी कुलाब्यास गेले. पेशवेकाळात मराठ्यांना थळच्या किल्ल्याचे रक्षण करणे जिकरीचे झाल्याने त्यांनी किल्ला मोडून त्यावरील तोफा कुलाबा किल्ल्यावर पाठवल्या याबाबत १७५१ च्या पत्रातील उल्लेख असा आहे कि मानाजी आंग्रे यांनी थळचा कोट,रेवसचा कोट मोडून तोफादेखील कुलाबियास आणिल्या.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!