TEREKHOL

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : GOA

HEIGHT : 0

GRADE : EASY

तेरेखोल किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतीकारकांना आश्रय देण्याचे काम या किल्ल्याने केले आहे. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र गोवा सरकारच्या ताब्यात आहे. तेरेखोल किल्ल्याचा भूभाग जरी गोवा राज्याच्या हद्दीत असला तरी तेथे जायचा जमिनीवरचा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो. सह्याद्रीत मनोहरगडापाशी उगम पावणारी तेरेखोल नदी जेथे समुद्राला मिळते तेथील एका मोक्याच्या जागी २०० फुट उंचीच्या टेकडीवर हा गड वसलेला आहे. तेरेखोल नदी ही महाराष्ट्र व गोवा राज्यांची सीमा असून या नदीच्या उत्तर तीरावर असलेल्या तेरेखोलला जायला सावंतवाडीपासून चांगला गाडी मार्ग आहे. सन १९७६ मधे ह्या किल्ल्याचे हॉटेलमधे रुपांतर करण्यात आले पण त्यात किल्ल्याचे मूळ स्वरुप बऱ्याच प्रमाणात तसेच ठेवले गेले आहे. ... हॉटेलच्या परवानगीने हा किल्ला आपण आतून पाहू शकतो. किल्ल्याच्या बांधकामात कोकणी आणि पोर्तुगीज वास्तुशैलीची छाप दिसते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ गोवा मुक्ती संग्रामात लढलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक आहे. संपूर्ण किल्ला जांभ्या दगडात बांधलेला आहे. गडाचे दरवाजे जुनेच असुन गडाच्या दक्षिणमुखी प्रवेशद्वाराने आत गेल्यावर समोर भिंतीलगतच एक जुना भला मोठा पेटारा ठेवण्यात आला आहे. आत शिरल्यावर समोरच दिसते ते पोर्तुगीज धाटणीचे सेंट अॅंथोनी चर्च. किल्ल्याच्या समुद्राकडील तटबंदीला लागून हॉटेलसाठी खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. या खोल्या आणि चर्च हे कायमच बंद असतात. इथून प्रवेशद्वारावरील सज्ज्यावर जाण्यासाठीचा जिना आहे तर चर्चच्या मागे उजव्या बाजूस असलेल्या जिन्याने मागील बुरुजावर जाता येते. तिथे पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेला कॅप्सुल बुरुज पाहाता येतो. समोर दिसणारा केरीमचा किनारा, पांढरी शुभ्र रेती आणि अरबी समुद्राचे निळेशार पाणी पाहून मन सुखावते. किल्ल्याच्या तटावरुन प्रवेशद्वारापर्यंत फेरी मारुन गड दर्शन आटोपते घ्यावे लागते. तटावरून आसपासचा परिसर बघत किल्ल्याच्या पाठीमागे पायऱ्या आहेत ज्या समुद्रापर्यंत जातात. या पायऱ्याच्या शेवटी समुद्रकिनारी जांभ्या दगडात बांधलेला एक बुरुज आहे. किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. सावंतवाडीचे राजे खेमसावंत भोसले यांनी १७ व्या शतकात तेरेखोल नदीच्या उजव्या किनाऱ्यावर उत्तरेकडे उंच डोंगरावर तेरेखोलचा किल्ला बांधला. १७४६ मध्ये गोव्याच्या ४४व्या विजराईच्या नेतृत्वाखाली पेद्रो मिगेल दे अल्मेडा, पोर्तुगाल इ व्हेस्कॉन्सिलस तसेच कोंडे दे असुमर, मार्किस दे अलोर्ना यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करण्यासाठी राजे खेमसावंत भोसले यांच्याविरुद्ध मोहीम उभारली. १६ नोव्हेंबर १७४६ रोजी दे अल्मेडा याने नदीच्या पात्रात आपल्या बोटी आणुन सावंतांच्या आरमाराविरुद्ध युद्ध छेडले. या युद्धात पोर्तुगीजांनी राजे खेमसावंत भोसले यांचा पराभव केला. अनेक चकमकी झडल्या आणि तेरेखोलचा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. या विजयानंतर हा किल्ला पोर्तुगीजांसाठी समुद्री संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र बनला. १७६४ मध्ये मराठ्यांनी बांधलेला किल्ला पोर्तुगीजांनी पाडला व त्यांच्या रचनेप्रमाणे तो पुन्हा बांधला. किल्ल्यातील चर्च व पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेले कॅप्सुल बुरुज त्यावेळी बांधण्यात आले. पूर्णतः डागडुजी केल्यानंतर १७८८मध्ये तेरेखोलचा गोव्यात समावेश केला गेला. इ.स. १७९६ मधे हा गड परत मराठ्यांनी जिंकुन घेतला पण काही काळातच तो परत पोर्तुगिजांकडे गेला. सन १९५४ साली पोर्तुगिजांनी हा किल्ला व आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी इथे एक चौकी बसवली. एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला पोर्तुगिजांनी भारतातील त्यांच्या ताब्यातील भागासाठी स्थानिक माणसाला विजरई नेमायचे ठरवले. त्याप्रमाणे गोव्यात जन्मलेल्या डॉ. बर्नार्डी पेरेस डिसिल्वा ह्याला सन १८२० च्या दशकात विजरई नेमले गेले. पण लवकरच सन १८२५ मधे अंतर्गत कलहामुळे त्याने पोर्तुगालपासून वेगळे होत स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याचे ठरवले. त्यांनी तेरेखोलच्या किल्ल्यातून पोर्तुगिजांविरुध्द उठाव केला पण तो उठाव पोर्तुगिजांनी मोडून काढला. या पराभवामुळे व्हॉईसरॉय डी सिल्वा गोव्यात नंतर कधीच परतला नाही. त्यानंतर पोर्तुगिजांनी कधीही स्थानिक माणसाकडे विजरईचे पद दिले नाही. १५ ऑगस्ट १९५४ रोजी अल्फ्रेड आल्फांसो यांच्या नेत्वृत्वाखाली गोवा मुक्ती संग्रामच्या कार्यकर्त्यांनी किल्ला १ दिवसासाठी ताब्यात घेतला होता. १५ ऑगस्ट १९५५ रोजी पनवेल येथील हिरवे व शेषनाथ वाडेकर यांच्यासह १२७ निशस्त्र कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर सत्याग्रह केला. त्यावेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर शहीद झाले. त्यांचे स्मारक किल्ल्यासमोर डाव्या हाताला आहे. शेवटच्या काही वर्षात गोवा मुक्ती पोर्तुगीजांनी किल्ला बेवारसपणे सोडला होता. पोर्तुगिज मराठा झटापटीतील काही वर्ष सोडली तर सन १९६१ च्या गोवा मुक्ती आंदोलनापर्यंत म्हणजे जवळपास २१५ वर्ष हा पोर्तुगिजांकडे राहिला. १९६१ मध्ये भारतीय उपखंडातून पोर्तुगीज गेल्यावर हा किल्ला भारताच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!