TELBAILA

TYPE : HILL FORT

DISTRICT : PUNE

HEIGHT : 2515 FEET

GRADE : VERY HARD

पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साद घालणारी. सह्याद्रीच्या या भागातुन अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून तीन घाटमार्ग आहेत. कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली होती. घाटाच्या खाली असणारे सुधागड,सरसगड,मृगगड तर वरील भागात असणारे घनगड,तेलबैला कैलासगड, कोराईगड याची साक्ष देतात. तेलबैला हा यातील एक किल्ला त्याच्या दोन अजस्त्र कातळभिंतीमुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे स्थान,आकार आणि त्यावरील अवशेष पाहाता हा फक्त टेहळणीचा किल्ला होता. ... तेलबैला हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लोणावळ्यापासून भुशी धरण- कोरीगड-सालतर मार्गे ३५ किमी अंतरावर आहे. या मार्गावर रहदारी फ़ारशी नसल्याने खाजगी वहानाने गेलेले चांगले. या रस्त्यावर सालतर खिंडीच्या पुढे तेलबैला फाटा लागतो. या ठिकाणी किल्ले तेलबैला उर्फ़ भैरवनाथाचा डोंगर असा फलक लावलेला आहे. येथुन तेलबैला गाव ३ कि.मी. अंतरावर आहे. ज्वालामुखीतून तयार झालेला आपल्या सह्य़ाद्रीची रचना डाइक अश्मरचना पद्धतीची आहे. यात लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. यात रांगांमध्ये मध्येच कुठेतरी वर उसळलेले सुळके, कातळभिंती दिसतात. भू-शास्त्रीय भाषेत अशा सुळक्यांना व्होल्कॅनिक प्लग तर कातळभिंतींना डाइक म्हणतात. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तेलबैलाच्या या अजस्त्र भिंती म्हणजे या डाइकचीच अफलातून रचना आहे. या जुळ्या भिंतींचा निसर्गाविष्कार जगांत कुठेही नाही. समुद्रसपाटीपासून तेलबैलाच्या या भिंतींची उंची ३३२२ फूट उंच असून ती उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर V आकाराची एक खाच आहे जी खालूनही स्पष्टपणे दिसते. या खाचेमुळे या भिंतीचे २ भाग झालेले आहेत. सामान्य भटक्यांचे दुर्गभ्रमण हे या खिंडीपर्यंतच होते. या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. गडावर जाणारी वाट ही तेलबैला गावातुन निघते. गडाच्या डोंगराला लागल्यावर सुरवातीलाच आपल्याला उजवीकडे उध्वस्त मंदिराचे अवशेष व शेंदुर फासलेली देवीची मुर्ती दिसून येते. डोंगराच्या उजव्या धारेने उजव्या हाताच्या भिंतीखालून अर्ध्या-पाऊण तासात आपण तैलबैलाच्या माचीवर येऊन पोहोचतो. माचीवरून सरळ जाणारी वाट तैलबैलाच्या V" आकाराच्या खिंडीत घेऊन येते. खिंडीत उभं राहील्यावर तैलबैलाच्या कातळभिंतींच्या विशालतेचा अंदाज येतो. ह्या कातळभिंतींची उंची साधारण ९०० फुट असावी. दक्षिण दिशेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटामध्ये एक गुहा असून तेथे छोटेखानी मंदिर आहे. आहे. या गुहेमध्ये २-४ शेंदूर लावलेले दगड आहेत. गुहेमध्येच उजव्या बाजूला दोन बारामाही पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. या गुहेमध्ये ३ ते ४ जण व्यवस्थित राहू शकतात. खिंडीतून ५-६ पावलं खाली येऊन डाव्या बाजूस गेल्यावर उत्तरेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटात आपल्याला २ गुहा बघायला मिळतात. त्यामधील एक गुहा छोटी तर दुसरी गुहा थोडीफार मोठी आहे. एका गुहेच्या पुढे एक सुकलेल टाकं आहे. गिर्यारोहणाच सामान न वापरता आपण खिंडीतील ही ठिकाणे पाहू शकतो. तैलबैलाच्या दक्षिण दिशेकडे पसरलेल्या कातळ भिंतीवर चढाई करण्यासाठी खिंडीतल्या गुहेच्या उजवीकडून रोपच्या सहाय्याने चढाईची सुरुवात करावी. दक्षिण दिशेकडे पसरलेली ही कातळभिंत अर्धी चढून गेल्यावर डाव्या बाजूला कातळात खोदलेल्या ४ ते ५ पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून गेल्यावर एक लहानशी गुहा लागते. या गुहेवरून पुढे गेल्यावर कातळावर तीन ३ मूर्ती कोरलेल्या दिसतात. त्यापुढे दुसरी गुहा असुन गुहेच्या पुढे पिण्यायोग्य असे पाण्याचे खांब टाके आहे. हे टाके ओलांडून कातळावरून पुढे गेल्यावर १०-१५ पावलांवर दुसरे टाके आहे. हे सर्व पाहून परत दुसऱ्या गुहेच्या बाजूस असलेल्या टाक्यापाशी येऊन रोपच्या सहाय्याने वरचा कातळ चढून गेल्यावर डाव्या बाजूस कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसून येतात. या पायऱ्यावरून चढल्यावर आपण भिंतीच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर सपाटी असून टोकापर्यंत जायला वाट आहे. तेथे १-२ झाडे असुन बाकी परिसरात एकही झाड नाही. तैलबैला वरून नैऋत्येस सुधागड , आग्नेयेस घनगड आणि ईशान्येस कोरीगड नजरेस पडतात तर पश्चिमेच्या बाजूस सरसगडाचा माथा दिसतो. उत्तर दिशेकडे पसरलेल्या कातळभिंतीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी पण पूर्णपणे गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. या भिंतीमध्ये दक्षिणेकडील भिंतीप्रमाणे कुठेही गुहा किंवा पाण्याचे टाके नाही. खाचेच्या वर प्रत्यक्ष भिंतीवर चढण्यासाठी इथे प्रस्तरारोहणाच्या मोहिमा व शिबिरे होतात. तेलबैला गावातुन फक्त खिंडीपर्यंत जाऊन यायचे असल्यास दोन अडीच तास पुरेसे होतात पण कातळभिंतीवर चढायचे असल्यास हाताशी एक पुर्ण दिवस हवा. तैलबैला गावात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये रहाण्याची सोय होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!