TALEGAON DHAMDHERE

TYPE : CITY FORT

DISTRICT : PUNE

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूरपासून ६ कि.मी अंतरावर तळेगाव ढमढेरे गाव आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे हुतात्मा गणेश पिंगळे यांचे गाव म्हणुन भारताच्या नकाशात या गावाची नोंद आहे. या गावात क्रांतिरत्न गणेश पिंगळे यांचा वाडा असुन अलीकडील काळात गावाबाहेर त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. गणेश पिंगळे यांच्या हौतात्म्यामुळे हे गाव प्रसिद्धीस आले असले तरी या गावची ओळख तशी जुनीच म्हणजे शिवकालीन आहे. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक नारो बाबाजी ढमढेरे यांचा वाडा होता जो अलीकडील काळातच पाडण्यात आला आहे. वाडा जरी पाडण्यात आला असला तरी शिवकाळाशी ओळख सांगणारी या गावची वेस व त्यातील लाकडी दरवाजा आजही शिल्लक आहे. मुख्य दरवाजाला लहान दिंडी दरवाजा असुन दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकरी बसण्यासाठी देवड्या आहेत. दरवाजाच्या बाहेरील बाजुस मोठमोठे अणकुचीदार खिळे ठोकलेले आहेत. दरवाजाबाहेर समोरच जीर्णोद्धार केलेले हनुमानाचे मंदिर आहे. हि वेस व दरवाजाची रचना पहाता पुर्वी या गावाभोवती कोट असावा पण गावाचा विस्तार झाल्याने कोटाचा दरवाजाचा हा भाग वगळता इतर कोणतेही अवशेष आज शिल्लक नाहीत. ... गावात प्रवेश करण्यापुर्वीच गावाबाहेर विष्णू पिंगळे यांचे स्मारक पहायला मिळते. गावातील पिंगळे आळीमध्ये विष्णू पिंगळे यांचा दुमजली वाडा असुन आता त्याचे आधुनिकीकरण झालेले आहे. गावचा फेरफटका केला असता मोठ्या प्रमाणात जुने वाडे व एक पेशवेकालीन राममंदीर पहायला मिळते. गावचा फेरफटका करण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक नारो बाबाजी ढमढेरे यांच्यामुळे या गावची ओळख थेट शिवकालाशी जोडली गेली आहे. इ.स.१६७७ साली शिवरायांची स्वारी दक्षिण दिग्विजयास गेली असता महाराजांसोबत असलेल्या कबिल्यात बाबाजी ढमढेरे यांचे नाव येते. दिलेरखानाच्या छावणीतून संभाजीराजे स्वराज्यात परतल्यावर शिवाजी महाराजांनी अंगरक्षक म्हणून बाबाजींची नेमणूक केली होती. नंतरच्या काळात छत्रपती राजाराम महारांजाचे अंगरक्षक प्रमुख हरजी ढमढेरे होते. राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाल्यावर त्यांच्या समाधीची उभारणी व देखभालीची जबाबदारी हरजी ढमढेरे यांच्यावर सोपवण्यात आली. त्यासाठी त्यांना खडकवाडी(अगळंबे) ता.हवेली,जि. पुणे येथे वतन देण्यात आले. याशिवाय गावातील दुसरे प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू गणेश पिंगळे होय. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पंतप्रधान (पेशवा) मोरोपंत पिंगळे यांचेच वंशज होते. विष्णू पिंगळे यांचा जन्म २ जानेवारी १८८९ रोजी तळेगाव ढमढेरे येथे झाला. त्यांचे वडील हे शेतकरी होते व त्यांच्या आई सरस्वतीबाई या आयुर्वेदीक औषधे देणाऱ्या व बाळंतपणे करणाऱ्या होत्या. प्राथमिक शिक्षण हे तळेगावात समर्थ विद्यालयात झाले. सुरवातीपासूनच राष्ट्राभिमानी असलेल्या विष्णुपंतांसाठी लोकमान्य टिळकांनी अमेरिकेत असलेल्या डॉ. खानखोजे यांना स्वहस्ताक्षरात पत्र दिले. वॉशिंग्टन येथील विद्यापीठात ते दाखल झाले. अत्यंत श्रमाची कामे करून त्यांनी आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि वायरलेस टेलिग्राफीचे शिक्षण पूर्ण केले (सन १९१२). हे शिक्षण घेत असतानाच बाँब तयार करण्याचे शिक्षणही त्यांनी घेतले. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा त्यांच्यावर प्रभाव होता. गदर पार्टीचे सभासद होऊन त्यातील प्रहारी विभागाचे ते प्रमुख झाले.पुढे लाला हरदयाळ यांच्या परवानगीने विष्णू गणेश यांनी अमेरिका सोडून राष्ट्रीय चळवळीसाठी आपल्या मायभूमीचा रस्ता धरला. प्रथम ते बंगालमध्ये आले व नंतर पंजाबात गेले. बंगालच्या क्रांतिकारकांच्या बरोबर त्यांचे संबंध प्रस्थापित झाले. रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ संन्याल हे बंगाली क्रांतिकारक त्यांना मिळाले. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि अनेक भाषांच्या जाणकारीमुळे ते सर्व लोकांत अतिशय प्रिय झाले. बाँब बनविण्यात तरबेज असलेल्या प्रो. सुरेंद्र बोस यांची कलकत्त्यास भेट घेण्याचे ठरले. दि. ३ जानेवारी १९१५ रोजी पिंगळे यांना गदर पार्टीकडून ५०० रुपये मिळाले व ते बनारसला आले. आपल्या योजनेची पूर्ण तयारी करण्यासाठी पिंगळे कलकत्त्यास आले. तेथुन रासबिहारी आणि पिंगळे लाहोरला गेले. त्यांनी व रासबिहारी यांनी अनेक ठिकाणांहून लाहोर येथे ८० बाँब जमा केले. क्रांतीचे प्रमुख म्हणून रासबिहारी यांच्या प्रेरणेने पिंगळे क्रांतीचे प्रचारक बनले. दिल्ली आणि लाहोर या ठिकाणी ही क्रांतीची चळवळ उभी केली जात होती. ब्रिटिश सरकारला या सर्व गोष्टींचा सुगावा लागल्याने पोलीस पार्टीच्या लोकांच्या मागावर होते. पंजाबमधील मीरत या ठिकाणी लष्करी छावणी होती. रात्रीचे विष्णू गणेश झोपले असताना लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना घेरले व कैद केले. विष्णू गणेश पिंगळे झोपलेल्या ठिकाणी त्यांना एका पेटीत १८ बॉम्ब, गन कॉटन कॅप्स, उठावाचा प्लॅन यासारख्या गोष्टी सापडल्या व ते मुद्देमालासह जेरबंद झाले. त्यात ८१ क्रांतिकारकांवर खटला भरला गेला. कर्तारसिंग, हरनामसिंग, विष्णू गणेश यांच्यासह अनेकांना एप्रिल १९१५ रोजी लाहोर येथे फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यांपैकी कर्तारसिंग आणि विष्णू गणेश यांना फाशीची शिक्षा कायम झाली. दि. १६ नोव्हेंबर १९१५ रोजी लाहोर सेंट्रल जेलमध्ये त्यांना फाशी देण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विष्णू गणेश पिंगळे यांना क्रांतिरत्न हा किताब बहाल केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!