TALANI

TYPE : FORTRESS

DISTRICT : JALNA

HEIGHT : 0

GRADE : EASY

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला किल्ल्यायेवजी मोठ्या प्रमाणात गढी पहायला मिळतात. जालना जिल्ह्यात देखील रोहीलगड व मस्तगड हे दोन किल्ले वगळता मोठ्या प्रमाणात गढी दिसुन येतात. हे प्रमाण अगदी ३० कि.मी. वर एक गढी असे धरले तरी वावगे ठरणार नाही. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अगदी अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने सुस्थितीत राहीले. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने आता हे गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. तळणी येथील गढी त्यापैकी एक. तळणी गाव मंठा-लोणार मार्गावर मंठा या तालुक्याच्या ठिकाणाहून ३४ कि.मी. अंतरावर आहे. कधीकाळी तटबंदीच्या आत वसलेले हे गाव वाढत्या शहरीकरणामुळे अगदी महामार्गापर्यंत पसरले आहे. पुर्वी तळणी गावाला तटबंदी असुन गावात प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे होते. यातील दोन दरवाजे काळाच्या ओघात नष्ट झाले असुन दोन दरवाजे आजही तग धरून आहेत. गढीसोबत गावाचा फेरफटका केल्यास हे दरवाजे आपल्याला पहायला मिळतात. ... यातील एका दरवाजावर दोन्ही बाजुस शरभ कोरलेले आहेत. तळणी गढी साधारण अडीच एकरवर पसरलेली असुन गढीच्या तटबंदीत एकुण सात बुरुज आहेत. गावात हि गढी पाटलांची गढी म्हणुन ओळखली जाते. गढीच्या मुख्य दरवाजाच्या भागात परकोट उभारलेला असुन त्यामुळे गढीचे परकोट व मुख्य गढी असे दोन भाग पडलेले आहेत. गढीची तटबंदी साधारण ५० फुट उंच असुन खालील १५ फुटाचा भाग दगडांनी तर वरील उर्वरीत भाग पांढऱ्या मातीत बांधलेला आहे. परकोटची भिंत देखील अशाच प्रकारे बांधलेली असुन त्याची उंची साधारण २० फुट आहे. परकोटात प्रवेश करण्यासाठी दोन दिशांना एका लहान व एक मुख्य दरवाजा असे दोन दरवाजे आहेत.परकोटात दोन विहिरी असुन एक विहीर मध्यात तर दुसरी विहीर परकोटाच्या मुख्य दरवाजा जवळ आहे. परकोटाचा मुख्य दरवाजा पश्चिमाभिमुख असुन घडीव दगडात बांधलेला आहे. दरवाजाच्या कमानीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. गढीचा पहिला दरवाजा पुर्वाभिमुख असुन दोन बुरुजामध्ये वळण देऊन अशा खुबीने बांधला आहे कि तो समोरून नजरेस पडत नाही. हा दरवाजा देखील घडीव दगडात बांधलेला असुन दरवाजाच्या वरील भागात तसेच तटबंदीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. दरवाजावर असलेल्या विटांच्या बांधकामात विटांवर नक्षीकाम केलेले असुन दरवाजाची लाकडी कवाडे आजही शिल्लक आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण पहिल्या चौकात येतो. दरवाजाच्या आतील बाजुस तटबंदीत पहारेकऱ्याची देवडी असुन त्याशेजारी कोरडी पडलेली ४० फुट खोल विहीर आहे. चौकात उजवीकडे घोड्यांच्या पागा असुन समोर काटकोनात गढीचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा पहिल्या दरवाजाची प्रतिकृती असुन उंच जोत्यावर असलेल्या या दरवाजात जाण्यासाठी चार पायऱ्या चढाव्या लागतात. पहिल्या दरवाजापेक्षा या दरवाजावर जास्त कलाकुसर केलेली आहे. हा दरवाजा पार करून आपण दुसऱ्या चौकात येतो. या चौकात डावीकडे गढीचा तिसरा दरवाजा आहे. गढीचे सर्व दरवाजे काटकोनात बांधलेले असुन प्रत्येक दरवाजाचे सौंदर्य वाढवत नेलेले आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण तिसऱ्या चौकात येतो. या ठिकाणी दोन्ही बाजुस उंच चौथरे असुन कधीकाळी हे ठिकाण म्हणजे गढीची सदर (कार्यालयीन जागा ) होती. आता या चौथऱ्यावर पाटील यांच्या वंशजांची घरे आहेत. येथे समोरच चौथा प्रशस्त दरवाजा असुन पाच पायऱ्या चढुन त्यातुन आत आल्यावर आपण गढीच्या अंतर्गत भागात येतो. आत एका मोठ्या तीन मजली चौसोपी वाड्याचे अवशेष असुन त्याच्या चौथऱ्यावर नव्याने बांधलेली घरे आहेत. गढी मालकाचे हे निवासाचे ठिकाण असुन वाड्याच्या उजवीकडे ६० फुट खोल विहीर आहे. वाड्याच्या अंतर्गत भागात फिरताना पावसाचे पाणी गढीबाहेर जाण्याच्या जागा, जमिनीखालील कोठारे तसेच धान्य साठविण्याची बळद पहायला मिळतात. गढीचा हा भाग सर्वात उंचावर असल्याने येथुन संपुर्ण गाव व आसपासचा परीसर नजरेस पडतो. गढी बाहेर तटबंदीतील बुरुज मोजत फेरी मारताना तटबंदीला लागुन असलेली अजुन एक विहीर नजरेस पडते. गढीत २ परकोटात २ तर बाहेरील तटबंदी जवळ १ अशा एकुण ५ विहिरी या गढीत पहायला मिळतात. संपुर्ण गढी फिरण्यासाठी पाउण तास पुरेसा होतो. गढीचे मालक पाटील हे गढीत वास्तव्यास असल्याने गढी फिरण्यास त्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!