SUVARNADURG
TYPE : SEA FORT
DISTRICT : RATNAGIRI
HEIGHT : 0
GRADE : MEDIUM
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णे बंदरापासून साधारण १ कि.मी. अंतरावर समुद्रात असलेल्या V आकाराच्या बेटावर बांधलेला आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गाच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनाऱ्यावर कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा गड या तीन उपदुर्गांची साखळी उभी ठाकलेली आहे. सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी सर्वप्रथम दापोली गाठायचं. दापोलीहून हर्णे गावात जाण्यासाठी एस.टी.बस आहे. हर्णे बसस्थानकावरून १०-१५ मिनिटांत हर्णे बंदर गाठता येतं. ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावं. किल्ल्यावर जाण्यासाठी नियमित बोटसेवा नाही पण बंदरावरुन किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटया नौका ठेवल्या आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटं लागतात. होडीतून जाऊन येण्यासाठी माणसी ६०-७० रुपये आकारले जातात. सुवर्णदुर्गावर उतरण्यासाठी धक्का नसल्याने सुवर्णदुर्गाच्या किनाऱ्यावर गुडघाभर पाण्यात उतरावं लागतं.
...
इथली पांढरीशुभ्र वाळू तुडवत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचायचं. दरवाज्यासमोर वाळूची पूळण व त्यात पडलेल्या दोन तोफा आहेत. किल्ल्याच्या पूर्व तटबंदीत असलेला मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन त्याची बांधणी गोमुखी पद्धतीची आहे. दरवाजाला अधिक संरक्षण देण्यासाठी समोर बांधलेली जिभीची भिंत आज केवळ अवशेष रुपात शिल्लक आहे. महादरवाजाजवळ पोहोचताच पायरीवर कोरलेलं कासवाचं शिल्प नजरेस पडतं तर उजव्या बाजूला तटबंदीवर अलीकडच्या काळात कोरलेली हनुमानाची मुर्ती आहे. प्रवेशद्वारातून आत शिरताच दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. किल्ल्याचा एकूण परिसर साधारण ८ एकर असुन आजही सुस्थितीत असलेल्या तटबंदीत एकूण १५ बुरुज आहे. किल्ल्यावर पाण्याच्या विहीरी व पावसाचे पाणी साठवणारा तलाव असला तरी सद्यस्थितीत पिण्यायोग्य पाणी कोठेही उपलब्ध नाही. किल्ल्याच्या दरवाजातुन आत आल्यावर डाव्या बाजुस एक विहीर पहायला मिळते. तेथून पुढे आल्यावर एका मोठया वाड्याचे अवशेष व तटालगत दोन कोठारे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागात तटाजवळ अजुन एक कोठार पहायला मिळते. सुवर्णदुर्गाच्या तटबंदीवरुन फेरी मारताना हिरवेगार पाणी असलेले तलाव आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष सहजपणे नजरेस पडतात. दुर्गाच्या पश्चिम तटात समुद्राच्या दिशेने असलेला एक सुरेख चोरदरवाजा पहायला मिळतो. हा दरवाजा आजही सुस्थितीत आहे. या दरवाजाने खाली उतरलो की दहा फूट खोल किल्ल्याचा पायथा उरतो. जवळच तटाला लागून पावसाचे पाणी साठवण्याचा तलाव आहे. किल्ल्याच्या नैऋत्य टोकावरील बुरुजावरुन हर्णेच्या किनाऱ्यावरील कनकदूर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला हे किल्ले दिसतात. किल्ल्याच्या वायव्य टोकावर पाण्याच टाक, दारुचे कोठार व उध्वस्त वास्तु आहे. गडावर एक विहीर, एक हौद आणि चार तलाव आहेत पण कुठेही मंदीर दिसुन येत नाही. याचा मागोवा घेतल्यावर कळते की कान्होजी आंग्रेची कुलदेवता कलंबिका देवी सुवर्णदुर्गावरुन हलवून अलिबागच्या हिराकोटामध्ये प्रस्थापित केली गेली. किल्ल्याच्या सभोवार असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे व मधल्या उंचवट्यावर किल्ला बांधला आहे. नुकतेच पुरातत्व खात्याने साफसफाई सुरु केल्यामुळे किल्ल्यामध्ये फिरणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. तटबंदीवरुन कशीबशी फेरी मारावी लागायची. संपुर्ण किल्ला पहाण्यास दोन तासाचा अवधी गरजेचा आहे. हर्णे हे प्राचीनकाळी बंदर म्हणून प्रसिध्द होत. ह्या बंदराच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत येथे दुर्ग बांधण्यात आले. शिलाहारांनी उभारलेला हा किल्ला १६ व्या शतकात आदिलशहाकडे होता. १६६० च्या सुमारास मायनाक भंडारींनी हर्णे गावाजवळील सुवर्णदुर्ग स्वराज्यात दाखल केला. किल्ला ताब्यात आल्यावर शिवरायांनी गडाची फेरउभारणी करुन आपले आरमार तेथे ठेवले. किल्ल्याचे लपवलेले प्रवेशद्वार ह्याची साक्ष देत उभे आहे. राजाराम महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी सूवर्णदूर्गच्या किल्लेदाराची फितूरी मोडून काढली. १६८८ मध्ये मोगल सरदार सिद्दी कासीमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला असता किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितूर झाला. ही गोष्ट किल्ल्यावर असलेल्या एका तरूणाला कळताच त्याने गडावरील सहकाऱ्याना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला. हा हल्ला पुर्णपणे फसला व तो तरुण व त्याचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले. या तरुणाने मोठ्या शिताफीने मोगलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व पोहत सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे किल्ल्यावरील त्यांच्या सहकाऱ्यात उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्दीने वेढा उठविला. हा तरुण म्हणजे नंतरच्या काळात ज्यांना समुद्रावरील शिवाजी म्हणून गौरविले गेले ते कान्होजी आंग्रे. या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गाचे किल्लेदार बनले. पुढे पश्चिम किनाऱ्यावर कान्होजी आंग्रे यांची कारकिर्द सुरू झाली. इ.स.१६९६ मध्ये मराठय़ांच्या नौदलाचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचा तळ येथे होता. त्यानंतर १७१३ मध्ये कान्होजी आंग्रे शाहूमहाराजांच्या पक्षात आल्यावर त्यांनी हा किल्ला कान्होजींच्या ताब्यात दिला. कान्होजी आंग्रे यांनी याच सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले. कान्होजींचा उत्तराधिकारी तुळाजी याच्या अधिपत्याखाली सुवर्णदुर्ग सत्तेचे एक केंद्र झाले. तुळाजी आंग्रे व पेशवे यांच्यात बेबनाव झाल्याने पेशव्यांनी तुळाजी आंग्रे यांच्या आरमाराचे वर्चस्व कमी करण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली. इंग्रजानी विल्यम जेम्स याला या मोहिमेचा प्रमुख बनविले तर पेशव्यांचा कल्याण येथील सरदार रामाजीपंत त्याच्या मदतीला देण्यात आला. इ.स. १७५५ मध्ये पेशवे व इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने सुवर्णदुर्गावर हल्ला केला. या युध्दाच्या वेळेस सुवर्णदुर्गावर ५० तोफा होत्या. कमांडर जेम्स २२ मार्च १७५५ रोजी ४४ तोफा आणि १६ बंदुका यांच्या सहाय्याने किल्ल्यावर चालून गेला. या मोहिमेत पेशव्यांचे १० हजार सैन्य कमांडर जेम्सच्या मदतीला होते. ही लढाई २५ मार्च ते २ एप्रिल १७५५ इतकी काळ चालली. यात तुळाजी आंग्रे यांचा पराभव झाला. इंग्रजांकडून कमांडर जेम्सने किल्ला जिंकून पेशव्यांच्या स्वाधीन केला पण ह्या मदतीसाठी इंग्रजांना बाणकोट किल्ला द्यावा लागला. १८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने दुसरा बाजीराव पुणे सोडुन काही काळ सूवर्णदूर्गाच्या आश्रयाला आला व स्वत:चा कुटुंबकबिला तिथेच सोडून नंतर वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला. नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनडी, कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डॉमिनिसेट यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांनीशी हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला. १८६२ मध्ये सुवर्णदुर्गाच्या तटबंदीची दुरुस्ती केल्याचा उल्लेख इंग्रजी साधनांमध्ये आढळतो. इंग्रजांनी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात येथुन तळ हलविल्यानंतर किल्ल्यातील वास्तूंची पडझड झाली. इतिहासातील महत्त्वाचे प्रसंग अनुभवलेला सुवर्णदुर्ग आज मात्र पुर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत आहे.
© Suresh Nimbalkar