SURAT

TYPE : GROUND FORT

DISTRICT : SURAT

HEIGHT : 0

GRADE : EASY

शिवचरित्र वाचताना आपल्याला त्यात अनेक रोमहर्षक घटना वाचायला मिळतात. महाराजांनी राजगड किल्ल्यापासुन साधारण ३०० कि.मी. दुर असलेल्या सुरत शहराची केलेली लुट हि अशीच एक रोमांचकारी घटना. इ.स.१६६४ जानेवारी मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील श्रीमंत शहर असा लौकीक असलेल्या सुरत शहरावर हल्ला करून ते लुटले व मुघल दरबाराची इभ्रत धुळीस मिळवली. या घटनेचे वर्णन वाचताना आपल्या मनात सुरत शहराबद्दलची उत्सुकता निर्माण होते. या सुरत शहरात किल्ला असुन देखील तेथील सुभेदार प्रतिकार तर सोडाच पण या शहराचे रक्षण करू शकला नाही याचे आश्चर्य वाटते. केवळ या उत्सुकतेमुळेच मी सुरत किल्ला व त्याच्या परीसरात असणाऱ्या इतर किल्ल्यांची भटकंती केली. सुरत हे देशातील महत्वाचे शहर असल्याने अनेक शहरांशी रेल्वेमार्गाने तसेच गाडीमार्गाने जोडले गेले आहे. सुरत रेल्वे स्थानकापासून सुरत किल्ला केवळ ३ कि.मी. अंतरावर आहे. वेळोवेळी डागडुजी झाल्याने किल्ला आजही सुस्थितीत आहे. ... सुरतेचा किल्ला तापी नदीच्या काठावर बांधलेला असुन जमीनीच्या दिशेने ५० फुट रुंद व तितकाच खोल खंदक खोदलेला आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी पुलावरून किल्ल्यामागे जाऊन मागील परीसर पाहुन घ्यावा. या बाजुस नदीकाठावर त्याकाळात गलबते थांबण्यासाठी धक्का बांधलेला असुन या धक्क्याच्या बांधकामात असलेला गोलाकार आकाराचा बुरुज आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. धक्क्याच्या बाजुने किल्ल्यात जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. किल्ल्याची मागील बाजु पाहुन झाल्यावर किल्ल्यात जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारासमोर यावे. किल्ल्यात सरकारी कार्यालये तसेच वस्तुसंग्रहालय असुन आत जाण्यासाठी प्रवेशशुल्क आकारले जाते. किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोरील खंदकावर अलीकडे नवीन पुल बांधलेला असुन या पुलावरून आपण किल्याच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. किल्ल्यात जाण्याचा हा मूळ मार्ग नसुन या पुलाच्या डाव्या बाजुस आपल्याला दुसरा लहान पुल दिसतो तेथुन किल्ल्यात प्रवेश करण्याचा खरा मार्ग आहे. हा लहान पुल देखील नंतरच्या काळात बांधलेला असुन या पुलाखालील खंदकात आपल्याला मुळ पुलाचे दगडी खांब पहायला मिळतात. या पुलावरून किल्ल्यात प्रवेश करताना बाहेरील तटबंदीत असलेला लहान दरवाजा पार केल्यावर उजवीकडे वळुन आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजासमोर येतो जेथे आपण सध्या उभे आहोत. या दरवाजावर इंग्रजी शिलालेख असुन त्यावर का किल्ला गुजरातचा सुलतान महम्मद खान तिसरा याच्याकाळात खुदावंद खान पदवी असलेल्या ख्वाजा जफर याने इ.स. १५४० साली बांधल्याचा उल्लेख आहे. याच लेखात शिवाजी महाराज यांनी दोन वेळा सुरतेवर हल्ला केला पण किल्ल्यावर हल्ला न केल्याचे नमूद केले आहे. किल्ल्याचा लाकडी दरवाजा आजही सुस्थितीत असुन त्यावर अणकुचीदार लोखंडी खिले ठोकलेले आहे. किल्ल्यात सरकारी कार्यालय असल्याने मर्यादीत तटबंदी व वस्तुसंग्रहालयात प्रवेश दिला जातो. किल्ल्याचा एकुण परिसर साधारण १.५ एकरचा असुन तटबंदीत पाच मोठे बुरुज आहेत. तटावर फेरी मारताना फांजी व बुरुजावर मध्यम आकाराच्या १२ तोफा व्यवस्थितपणे मांडलेल्या दिसुन येतात. संपुर्ण किल्ला फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. शाहिस्तेखानाने ३ वर्ष महाराष्ट्रात राहुन स्वराज्याचे बरेच नुकसान केले होते. हे नुकसान भरून काढणे गरजेचे होते आणी याच कारणासाठी महाराजांनी सुरतेची मोहीम आखली. त्याकाळी गुजरातमधील सुरत शहर हे मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते. युरोप, आफ्रिका तसेच मध्यपूर्वेशी येथून मोठ्या प्रमाणात व्यापार होई. या व्यापारातुन मोगलांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळे. सुरतेचे शहर मोगलांच्या राजधानीपासुन दूर असूनसुद्धा सुरत शहराला तटबंदी केलेली नव्हती पण एक लहानसा किल्ला नदीकाठी होता. या किल्ल्यावर व आसपास ५,००० सैनिकांची तरतूद होती. सुरतेची बित्तंबातमी काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईक याची नेमणूक केली व सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला. यासाठी मराठ्यांनी घोडदळ सज्ज केले. इ.स. १६६३ डिसेंबर १५ रोजी ८,००० शिबंदी राजगडावरून मुघलांपासून दूर रहात तापी खोर्यायत उतरली. वेगाने वाटचाल करीत मराठे २० दिवसांत जानेवारी ५ रोजी १० वाजण्याचा सुमारास सुरतेजवळील गणदेवी गावाजवळ आले. तेथून त्यांनी मोगलांच्या सुरतेतील सुभेदार इनायतखानकडे वकील पाठवून त्याने व सुरतेतील व्यापार्यांदनी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी असा संदेश पाठवला व त्यांच्या उत्तराची वाट न पाहता सुरतेच्या हद्दीवरील उधना गाव गाठले. कागदोपत्री ५,००० सैनिक असलेल्या सुरतेत प्रत्यक्ष १,०००च्या आसपास सैनिक होते. मराठे गणदेवीस आलेले कळता इनायतखानाने सामोरे येऊन लढाई करण्याऐवजी सुरतेच्या किल्ल्यात पळ काढला. किल्ल्यात लपून बसलेल्या इनायतखानाकडून काहीही प्रतिकार न होता मराठे शहरात घुसले व त्यांनी जागोजागी चौक्या बसविल्या. त्याचबरोबर त्यांनी सुरतेच्या बंदरावर हल्ला केला व तेथील धक्क्याला आग लावून टाकली. जरी बंदर नष्ट केले तरी मराठ्यांनी कोणत्याही युरोपीय वकिलाती, किल्ले किंवा आरमारांना धक्का लावला नाही. मराठे असे अचानक येऊन धडकलेले पाहून युरोपीय दबकलेले होते व त्यांनीही मराठ्यांची कुरापत काढली नाही. शहराबाहेरून तसेच आतूनदेखील होणार्याह हल्ल्यांविरुद्ध बंदोबस्त करतानाच मराठ्यांनी शहराची लूट सुरू केली. इंग्रज, डच या यूरोपीय व्यापाऱ्यांनी आपापल्या वखारींचे संरक्षण करण्याच प्रयत्न केल्याने मराठे त्यांच्या वाटेला गेले नाहीत पण पोर्तुगीजांकडे स्वतःचा बचाव किंवा हल्ला करण्यासाठी पुरेसी शिबंदी नाही हे लक्षात येताच त्यांनी पोर्तुगीजांकडूनही खंडणी घेतली. त्याच बरोबर चार दिवस मराठा सैनिकांनी शहरातील सावकारांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा केली. (६ ते ९ जानेवारी १६६४). या सावकारांत वीरजी वोरा, हाजी झहीद बेग, हाजी कासम सारख्या मातब्बर व्यापार्यांतचा समावेश होता. मराठ्यांनी मोहनदास पारेख हा दानधर्मी व एतद्देशीयांना मदत करणारा असल्याने तो मृत असला तरी त्याची संपत्ती लुटली नाही. दरम्यान इनायतखानाने मराठ्यांकडे वाटाघाटींसाठी वकील पाठवला. शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी तो आला असता त्याने महाराजांवर हल्ला चढवला. हे पाहताच त्यांच्या अंगरक्षकांनी वकिलास ठार मारले आणि पकडून आणलेल्या कैद्यांवरी हल्ला चढवला. यात चार कैदी मारले गेले. संतप्त झालेल्या मराठ्यांनी इतर २४ कैद्यांचे हात छाटून टाकले. शक्य तितक्या कमी वेळात शक्य तितकी संपत्ती गोळा करून सुरतेतून पसार होणे मराठ्यांना अत्यावश्यक होते. गोळा केलेला मुबलक खजिना घेउन १० जानेवारी रोजी मराठ्यांनी सुरतेतून काढता पाय घेतला. मागावर असलेल्या मोगल तुकड्यांना झुकांड्या देत मराठे पुन्हा तापी खोर्याडत व तेथून राजगडाकडे आले. महाराजांच्या सुरतेवरील या स्वारीचे तपशीलवार वर्णन यूरोपीय वखारवाल्यांच्या कागदपत्रांतून आढळते. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चिले जाऊ लागले. सुरतेहून आणलेल्या लुटीतून महाराजांनी सिंधूदुर्ग बांधला व मराठा आरमाराचा विस्तार केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!