SUPE

TYPE : GADHI

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

GRADE : EASY

शिवकाळात सुपे हा एक महत्वाचा परगणा म्हणुन ओळखला जात होता. इतिहास काळात महत्वाचे शहर असलेल्या या गावात उभा असलेला भुईकोट आज पुर्णपणे नष्ट झाला असुन सुपे ग्रामपंचायतीने त्या जागेवर बुलडोझर फिरवुन तेथे खेळाचे मैदान बनविले आहे. सुपे भुईकोट नष्ट झाला असला तरी आजही या गावात बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तु व वाडे पहायला मिळतात. यातील तुकोबा मंदीर म्हणुन ओळखले जाणारा नगरे वाडा व सुभेदार वाडा या दोन वास्तु प्रामुख्याने आहेत. तुकोबा वाड्यात आजही त्यांचे वंशज राहत असुन हा वाडा सुस्थितीत आहे तर सुभेदार वाडा मात्र मोठया प्रमाणात कोसळला आहे. सुभेदार वाड्याशेजारी आपल्याला अजुन दोन तीन जुने वाडे पहायला मिळतात. सुभेदार वाडा गावातच असुन त्याच्या भोवताली अजुन तीन चार वाडे पहायला मिळतात. या सर्व वाड्यांचे बांधकाम पेशवेकाळात झालेले असुन वाड्याचा खालील भाग घडीव चिऱ्यानी बांधलेला असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. ... यातील दोन वाडे दुमजली असुन उर्वरित एक मजली आहेत. या सर्व वाड्यांचे बांधकाम मोठया प्रमाणात कोसळले असुन काही भिंती व प्रथमदर्शनी दरवाजा असलेला भागच शिल्लक आहेत पण या अवशेषांतुन देखील या वाड्यांचे सौंदर्य दिसुन येते. सुपा गावातील दुसरी वास्तु म्हणजे तुकोबा मंदिर म्हणुन ओळखला जाणारा नगरे वाडा. गावाबाहेर नदीकाठी असलेला हा वाडा आजही सुस्थितीत आहे कदचित गावाबाहेर असल्यानेच तो सुस्थितीत असावा. एक एकरपेक्षा जास्त परीसरात पसरलेल्या या वाडयाला चारही बाजुंनी घडीव दगडांची ८-१० फुट उंचीची घडीव दगडांची तटबंदी आहे. आत जाण्यासाठी या तटबंदीत दक्षिणेकडे मुख्य दरवाजा असुन पुर्वेला दुसरा दरवाजा आहे. मुख्य दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन त्याला लागुनच ५-६ ओवऱ्या आहेत. वाडयाच्या आवारात चौथऱ्यावर घडीव दगडांनी बांधलेली व सुंदर कोरीवकाम असलेली दोन समाधी स्थळे आहेत. तुकोजी नगरे यांची ही जिवंत समाधी असून त्याच्यासमोर त्यांच्या मुलाची नागोजी नगरे यांची समाधी आहे. नगरे यांचे वंशज आजही या वाड्यात वास्तव्यास असुन ते या वाड्याची डागडुजी व व्यवस्था चांगल्या प्रकारे बघतात. वाडयाच्या आवारातच बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा आहे पण त्याचे दगडी चाक तुटले आहे. तटबंदीच्या आतील चौकोनी वाडा एका चौथऱ्यावर पुर्वपश्चिम बांधलेला असुन वाड्याचा दरवाजा पुर्वाभिमुख आहे. दुमजली असलेल्या या वाडयाचा दरवाजा अत्यंत कलात्मक रीतीने सजविलेला असुन त्यावर विविध प्राणी व प्रसंग तसेच नक्षी कोरलेली आहे. दरवाजाच्या वरील बाजूस नगारखाना आहे. वाडयाच्या आतील भाग चौसोपी असुन आतील चौकाच्या मध्यभागी मंदिर आहे. वाडयाच्या उजव्या बाजूस एक उध्वस्त वास्तु असुन या वास्तुच्या आत एक दगडी कारंजे पहायला मिळते. या वास्तुचा आकार व रचना पहाता हि या वाड्यातील कचेरी असल्याचे जाणवते. इतिहासात सुपे गाव पुरंदरे यांना वतन मिळाल्याचे कळते पण सुपे गावात फिरताना त्यांचा कोठेही उल्लेख येत नाही. पुरंदरे हे इ.स. १७०० पर्यंत पुरंदर किल्ल्याचे सुभेदार होते. हे घराणे सासवड-सुप्याला स्थायिक झाल्यावर त्यांच्या दोन शाखा झाल्या. राजाराम महाराज जिंजीवर असताना झुल्फिकारखानाने जिंजीस वेढा दिला. हा वेढा हटविण्यासाठी शंकराजी नारायण, रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे लढत होते. झुल्फिकार खानाने जिंजीचा वेढा उठवल्यावर राजाराम महाराजांनी या लोकांचा बक्षिसे देऊन गौरव केला. सेनापती धनाजी जाधव यांच्या लष्करात असलेल्या तुको त्र्यंबक पुरंदरे यांना सुपे व ब्राह्मणी या दोन गावची जहागिरी मिळाली. या सनदेवर छत्रपती राजाराम महाराजांची मुद्रा व प्रल्हाद निराजी यांचा शिक्का आहे. तुको पुरंदरे यांनी धनाजी जाधवांबरोबर जिंजी येथे जाऊन राजाराम महाराजांकडून हे इनामपत्र करवून आणले. त्यांपैकी अंबाजी त्र्यंबक यांना सुपे तर तुको त्र्यंबक यांना मोढवे गाव मिळाले व त्यांनी त्या ठिकाणी वस्ती करून गढीवाडे बांधले. शाहुराजे मोगली कैदेतून सुटल्यावर वारसाहक्काच्या तंट्यात अंबाजी पुरंदरे यांचा पुतण्या मल्हार तुकदेव हा खानदेशात लांबकानीच्या मुक्कामात शाहूपक्षाला सामील झाला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!