SULTANPURA
TYPE : FORTRESS
DISTRICT : AMRAVATI
HEIGHT : 0
GRADE : EASY
अमरावती जिल्ह्यात गढीकोटांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. यात गाविलगड सारखा बलाढ्य किल्ला,अचलपुरचा नगरदुर्ग व आमनेरचा लहानसा किल्ला यांचा सामावेश होतो. या भागात प्रशासकीय कामासाठी गढ्यांची निर्मीती करण्यात आली पण त्याही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहेत. यात करजगाव,सुलतानपुरा व हिंगलाज या गढ्या येतात पण यातील किती गढ्या प्रशासकीय कामासाठी वापरात होत्या यात शंकाच आहे. संपुर्ण अमरावती जिल्ह्यात मध्ययुगीन काळातील केवळ या तीन गढ्या दिसुन येतात. सुलतानपुरा हि गढी अचलपुर शहराबाहेरच असल्याने हि प्रशासकीय गढी नसुन एखाद्या सरदाराने अथवा सावकाराने स्वतःच्या सुरक्षित रहाण्यासाठी बांधली असावी. अमरावती जिल्ह्यात मध्ययुगीन काळातील केवळ या तीन गढ्या दिसुन येतात. अचलपूर गावाबाहेरील सुलतानपुरा गढी अचलपूर गावातुन १ कि.मी. तर परतवाडा शहरापासुन ६ कि.मी.अंतरावर आहे. अचलपूर किल्ला पाहुन सुलतानपुर गावात जाताना दुरूनच या गढीचे दर्शन होते. गढी गावाबाहेर नदीच्या काठी एका लहानशा उंचवट्यावर बांधलेली असुन गढीचा दरवाजा गावाच्या दिशेला आहे.
...
संपुर्ण गढीचे बांधकाम विटांनी केलेले असुन दोन बुरुजामध्ये गढीचा मुख्य दरवाजा आहे. गढीचे लाकडी दार आजही शिल्लक असुन त्याच्या वरील भागात टोकदार खिळे बाहेर काढलेले आहेत. साधारण २० पायऱ्या चढुन या दरवाजाने आपण गढीत प्रवेश करतो. अष्टकोनी आकाराची हि गढी दीड एकरवर पसरलेली असुन गढीच्या तटबंदीत लहानमोठे १२ बुरुज आहेत. यातील ११ बुरुज बाहेरील तटबंदीत असुन एक बुरुज दरवाजाच्या आतील बाजुस गढीचा माथा थेट नजरेस पडु नये यासाठी बांधलेला आहे. दरवाजाने आत शिरल्यावर समोर काही अंतरावर तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहे. या पायऱ्यांनी वर चढुन नदीकडील तटबंदीवर तसेच गढीच्या मुख्य दरवाजावरील भागात जाता येते. गढीच्या आतील वास्तु पुर्णपणे भुईसपाट करून ग्रामपंचायतीने तेथे खेळाचे मैदान केलेले असल्याने एक विहीर वगळता इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. गढीच्या अर्ध्या भागात फांजी व त्यावरील भिंत आजही शिल्लक असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. गढीतील विहीरीचे बांधकाम विटांनी केलेले असुन या विहिरीत मोठ्या प्रमाणात माती जमा झाली आहे. संपुर्ण गढी फिरण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. साधारण तीनशे वर्ष जुनी असणारी ही वास्तू आज केवळ दुर्लक्षपणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. स्थानिकांना या गढीची कोणतीही माहिती नाही हे या गढीचे व आपले दुर्दैव म्हणावे लागेल.
© Suresh Nimbalkar