SUDHAGAD
TYPE : HILL FORT
DISTRICT : RAIGAD
HEIGHT : 1900 FEET
GRADE : MEDIUM
सह्याद्रीच्या डोंगररांगेत घाटावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. यातील पुणे जिल्ह्यातुन कोकणात उतरणारा महत्वाचा घाट म्हणजे सवाष्णी घाट. पुणे-रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या घाटाचा पहारेकरी म्हणजे सुधागड किल्ला. अतिशय प्रशस्त पठार लाभलेला सुधागड उर्फ भोरपगड किल्ला पाली गावापासून फक्त १० किमीवर आहे. या किल्ल्याच्या परीसरात हा गड भोरपगड/ भोराईचा डोंगर म्हणुन जास्त प्रचलीत आहे. गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत. १.पालीहून नाडसूर/धोंडसे गावी पोहचून तेथुन दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर जाता येते. या वाटेने गड चढण्यास अंदाजे २.५ ते ३ तास लागतात. २.तेलबैला जवळून उतरणारा सवाष्णीचा घाट हा आपल्याला याच मार्गावर घेऊन येतो. येथून गडाच्या गोमुखी महादरवाजातून प्रवेश करत आपण थेट भोराई देवीच्या मंदिरात पोचतो. ३.पालीपासून भिराकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर ८ किमी वर पाच्छापूर गाव आहे.
...
येथून पुढे ठाकूरवाडी अथवा दर्यागाव वसलेले आहे. येथून एका सोप्या पायवाटेने २ तासात आपण गडावर पोहचतो. गडावर जाण्यासाठी हा सर्वात सोपा व जवळचा मार्ग आहे. ठाकूरवाडीतून गडावर जाताना वाटेत लोखंडी शिडी लागते. याशिवाय पाच्छापूर गावातूनही एक वाट वर येते. या दोन्ही वाटा एका घळीपाशी एकत्र येतात. येथे महाकाय चिलखती बुरुज आपले स्वागत करतात. या घळीत असलेल्या पायऱ्या चढुन वर गेल्यावर आपण एका पडक्या दरवाजातून गडावर प्रवेश करतो. हा झाला गडाचा पाच्छापूर दरवाजा. पाच्छापूर दरवाजातून वर आल्यावर सर्वप्रथम येथील चिलखती बुरुज पाहुन घ्यावे. यातील एक बुरुज पाच्छापूरच्या दिशेने असुन दुसरा बुरुज ठाकूरवाडीच्या दिशेने आहे. हे दोन्ही बुरुज आजही चांगल्या स्थितीत असुन बुरुजाच्या खालच्या चिलखतामध्ये उतरण्यासाठी लहान दरवाजा व त्यात पायऱ्या आहेत. हे दोन्ही बुरुज ठाकूरवाडी व पाच्छापुर परिसरावर नजर ठेवण्यासाठी बांधलेले आहेत. येथून साधारण १० मिनिटे चढल्यावर आपण गडमाथ्यावर असलेल्या तलावाजवळ पोहचतो. येथे तलाव डाव्या बाजूस ठेवून तेलबैला डोंगराच्या दिशेने सरळ चालत जाताना डाव्या बाजूस मोठ्या प्रमाणात वास्तु अवशेष व घरांची जोती दिसतात. या वाटेने १० मिनिटात आपण एका वाड्यात पोहचतो. किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा हा चौसोपी वाडा इ.स. १७०५ साली बांधलेला असुन श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने याची अलीकडील काळात दुरुस्ती केली आहे. दोन दरवाजे असलेल्या या वाड्याला ऐसपैस व्हरांडा असुन दोन बंद खोल्या आणि माडी आहे. या वाड्यात ५० जणांची राहण्याची सोय होते. वाड्याशेजारी असलेल्या छोट्या घरात रहाणारी वयस्कर मामी पुर्ण वाड्यात शेण सारवण्याचे आणि वाडा स्वच्छ ठेवण्याचे काम करते. या वाड्यासमोर नव्याने बांधलेली धर्मशाळा आहे. वाड्याच्या मागील बाजुस एक चौथरेवजा शिवमंदिर असुन त्यात अनेक देवतांच्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. या मंदिराच्या आसपास मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असुन या झाडीत काही वास्तुची जोती व चौथरे आहेत. जंगलात काही अवशेष आढळून येतात. वाड्याच्या मागील भागात कोरडी पडलेली चौकोनी आकाराची बांधीव विहीर आहे. सुधागड किल्ला तीन भागात विभागलेला असुन गडाचा पहिला भाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात बऱ्यापैकी सपाटी असल्याने मोठ्या प्रमाणात वास्तु अवशेष असुन येथेच तलाव व मोठी पाण्याची टाकी आहेत. वाड्याच्या आवारातून बाहेर पडून सरळ चालत गेलो कि टोकावरून आपल्याला सरसगड आणि वातावरण स्वच्छ असेल तर दुरवर कर्नाळा किल्ल्याचे टोक नजरेस पडते. वाड्यातून भोराई मंदिराकडे जाताना मुख्य वाटेच्या डावीकडे एक लहान पायवाट जाताना दिसते. या पायवाटेने खाली उतरून डावीकडे गेलो असता बुरुजात बांधलेला लहान दरवाजा दिसतो. बुरुजातील या लहान दरवाजा म्हणजे प्रसंगी गडाबाहेर पडण्याचा गुप्त मार्ग आहे. या दरवाजाच्या आत असलेल्या पायऱ्या उतरून आपण तटबंदी बाहेर पडतो पण पुढील मार्ग मात्र मोडलेला आहे. या भागातील तटबंदी आजही शिल्लक असुन तटावरून फेरी मारता येते. गडाचा हा भाग पाहुन झाल्यावर मागे वळुन मुख्य वाटेवर यावे. झाडीतून जाणाऱ्या या वाटेने आपण भोराईच्या देवळाकडे पोहोचतो. सुधागड किल्ला या परीसरात आजही भोराईचा डोंगर म्हणून ओळखला जातो. मंदिराच्या आवारात एक दीपमाळ असून या दिपमाळेच्या तळाशी एक हत्ती कोरलेला आहे. ऐसपैस असलेल्या या मंदिरात २५ जणांची राहण्याची सोय होते. मंदिरात भली मोठी घंटा असुन मंदिराच्या आवारात जवळ जवळ ३५ वीरगळी आहेत. मंदिराकडून सरळ जाणारी वाट महादरवाजाकडे जाते तर उजवीकडील वाट टकमक टोकाकडे जाते. भोराई मंदिराकडून टकमक टोकाकडे जाताना आपल्याला उजवीकडे गडाचा अंबरखाना म्हणजेच धान्यकोठारे पहायला मिळतात. हि सर्व कोठारे एका चौथऱ्यावर बांधलेली असुन एकसमान आकाराची आहेत. ६०x१५ फुट लांबीरुंदीची हि कोठारे पुर्णपणे बंदिस्त असुन केवळ एका दिशेला दरवाजा आहे. येथून पुढे जाताना सपाटीवर काही प्रमाणात वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. थोडे पुढे आल्यावर डावीकडे एक पायवाट खाली उतरताना दिसते. हि वाट आपल्याला उतारावर कोरलेल्या एका टाक्याकडे घेऊन जाते. या टाक्याजवळ गोमुख असल्याचे वाचनात येते पण सध्या ते तिथें दिसून येत नाही. टाके पाहुन वर येऊन सरळ गेल्यास आपण गडाच्या टकमक टोकावर पोहोचतो. हे टोक रायगडाच्या टकमक टोकासारखे दिसत असल्याने त्याला टकमक नाव पडले आहे. ठाकूरवाडीतुन गडावर येताना हे टोक सतत आपल्या नजरेसमोर असते. टकमक टोक पाहून झाल्यावर पुन्हा भोराई मंदिराकडे यावे व सरळ जाणाऱ्या वाटेने महादरवाजाकडे निघावे. भोराई मंदिरावरून महादरवाजाकडे जाताना दरवाजाच्या थोडे अलीकडे उजवीकडे जंगलात एक पायवाट जाते. या पायवाटेने गेले असता आपण गडाच्या पुर्वेकडे असलेल्या उंच टेकाडाजवळ येतो. या टेकाडाच्या खालील बाजूस घनगडाच्या दिशेने गडावरील सर्वात मोठा बुरुज बांधलेला आहे. सावधगीरीने खाली उतरल्यास हा बुरुज व्यवस्थीत पहाता येतो. हा बुरुज पाहुन मागे फिरावे व महादरवाजाकडे निघावे. सुधागडाचा महादरवाजा म्हणजे रायगडावरील महादरवाजाची हुबेहुब प्रतिकृती आहे. दोन बुरुजात बांधलेल्या या दरवाजाच्या दोन्ही बाजुस शरभ कोरलेले असुन मध्यभागी नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांसाठी देवड्या असुन चौकटीखाली पाणी वाहून जाण्यासाठी नाळी कोरली आहे. दरवाजाच्या वरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. बुरुजावर उभे राहून पुढील घळीतून येणारा शत्रू सहज टप्प्यात येतो. महादरवाजाने खाली उतरून गेल्यावर अजुन दोन दरवाजांचे अवशेष पहायला मिळतात. हे दोन दरवाजे पार करून खाली उतरल्यावर तिसरा पडझड झालेला दरवाजा दिसतो. हा दरवाजा जवळपास नष्ट झाला आहे. या वाटेवर कातळात कोरलेली पाण्याची दोन टाकी असुन यातील एका टाक्यावर सैनिकाचे शिल्प कोरले आहे. या टाक्याला तानाजी टाके नाव असुन दुसरे टाके हनुमान टाके म्हणुन ओळखले जाते. या दोन्ही टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याच्या खालील भागात एक भग्न शिवमंदिर व मारुतीची मुर्ती आहे. कधीकाळी येथे कासारआळी असल्याने हा मारुती आजही कासारपेठ मारुती म्हणुन ओळखला जातो. या वाटेने खाली उतरत गेल्यास आपण धोंडसे गावात पोहोचतो. गडाचा माथा चांगलाच प्रशस्त असल्याने आपल्याला अनेक ठिकाणी बांधीव तसेच कोरीव टाकी पहायला मिळतात.पण महादरवाजा, पाच्छापूर दरवाजा व वाडयाच्या परीसरात असलेले एक टाके वगळता कोठेही पिण्यायोग्य पाणी नाही. गडाचा माथा चांगलाच प्रशस्त असल्याने अनेक ठिकाणी आपल्याला बांधीव तसेच खोदीव टाकी दिसतात. यातील वाड्याजवळ असलेली तीन टाकी गडावरील पाण्याचा मुख्य स्त्रोत आहेत. यातील सर्वात मोठ्या टाक्यात उतरण्यास सोय असुन उन्हाळ्यात मधल्या टाक्यात पिण्यायोग्य पाणी असते. गडावर पाण्याचे अनेक तलाव असुन जंगलही बऱ्यापैकी आहे. सुधागडावरून सरसगड, घनगड, कोरीगड, तैलबैला.कर्नाळा हे किल्ले तसेच अंबानदीचे दुरवर जाणारे पात्र नजरेस पडते. संपुर्ण किल्ला व्यवस्थित पहाण्यासाठी एक पुर्ण दिवस लागतो. सुधागड हा या भागातील आजही चांगल्या स्थितीत असलेला किल्ला म्हणावा लागेल. सुधागड परिसरात असणारी ठाणाळे हि प्राचीन लेणी पहाता सुधागडची निर्मीती देखील प्राचीन काळात झाली असावी. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे उल्लेख असुन त्यांनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली म्हणून या देवीला "भृगुअंबा, भोरांबा, भोराई" अशी नावे आहेत. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असुन ह्या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल व नंतर मराठा अशा राजसत्ता पाहिल्या. इ.स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. यावेळी झालेल्या लढाईचा असा उल्लेख आढळतो की ‘साखरदऱ्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्यासमयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली. शिवरायांनी भोरपगडाचे सुधागड असे नामकरण केले. हिंदवी स्वराज्याची राजधानी करण्यासाठी सुधागडची पाहणी झाली होती पण महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणुन निवड केली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. पाच्छापूर हे पातशाहपूर या नावाचा अपभ्रंश आहे. राजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परळी गावात हत्तीच्या पायी दिले.छत्रपती राजाराम महाराजांनी भोरप्या गडावरील सबनीस नारोमुकुंद यांचा मुलगा शंकराजी नारायण याला पंतसचिव केले. शंकरजी नारायण याने पुढील काळात अतुलनीय पराक्रम करून मोगली सैन्यापासून राज्याचा बचाव केला. इ.स. १७१४ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सचिवपद वंशपरंपरेने दिले. त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते. इंग्रजी अमदानीत पंत सचिवांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली व ते भोर संस्थानाचे राजे झाले. आजही भोर मध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे. भोरच्या पंत सचिवांनी श्री भोराई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व या देवीला आपली कुलदैवत मानले. इ.स. १७५० मध्ये पंत सचिवांनी मंदिराचे सभागृह बांधले. स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात असल्याने त्याची नीट देखरेख होत होती. किल्ल्याची आज झालेली दुरावस्था हि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची आहे.
© Suresh Nimbalkar