SUBHANMANGAL

TYPE : GROUND FORT

DISTRICT : SATARA

HEIGHT : 0

GRADE : EASY

स्वराज्याच्या पहिल्या रोमांचक लढाईचे वर्णन वाचले कि आपल्याला वेध लागतात ते शिरवळ येथील सुभानमंगळ भुइकोटाचे. स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याची सध्याची अवस्था मात्र अतिशय बिकट आहे. पुणे-बंगलोर महामार्गावर नीरा नदीच्या काठी सुभानमंगळ हा भुईकोट आहे म्हणण्यापेक्षा होता असे म्हणणे जास्त योग्य ठरेल कारण आजमितीस या कोटाचा नदीकाठचा एक बुरुज वगळता इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. ढासळलेल्या या बुरुजाची डागडुजी करण्याऐवजी या बुरुजाला लागुन एक लहानसे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात प्रवेश करताना डावीकडे बुरुजातील काही दगडांना शेंदुर फासलेला दिसतो. येथे बुरुजाच्या तळाशी दोन विरगळ पहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी पुर्णपणे ढासळलेली असुन आतील बाजुस मोठया प्रमाणात बाभळीची काटेरी झाडी वाढलेली आहे. या झाडीमुळे संपुर्ण परिसर झाकला गेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वप्रथम आपण शिरवळ गाठावे. शिरवळ येथील ब्राह्मण गल्लीतुन किल्ल्यावर जाणारी वाट असुन ही वाट शिरवळ बाजारपेठेतुन जाते. ... येथे किल्ला विचारण्यायेवजी प्रगती शाळा विचारल्यास आपण सहजपणे किल्ल्याच्या बुरूजा समोर पोहोचतो. किल्ला पाहण्यासारखे काहीच नसल्याने ५ मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात एक महत्त्वाची घटना या शिरवळ परिसरात घडुन आली. (१६४८-४९). मावळातील काही किल्ले व महसुल ठाणी शिवाजी महाराजांनी आपल्या अंमलाखाली आणली होती (१६४८). आपण घेतलेली ठिकाणे विजापुर राज्याच्या सुरक्षिततेच्या हेतुने घेतल्याची भूमिका महाराजांनी घेतल्याने विजापूर दरबारानेही सुरुवातीस याकडे फारसे लक्ष दिले नाही पण महाराजांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला आणी विजापुर दरबार हादरला. आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजीराजांना कैद केले व महाराजांवर फ़तेहखाना बरोबर विजापूरचे सैन्य चालून आले. सन १६४८चा पावसाळा संपल्यावर फतेहखान ऑक्टोबर अखेरीस भीमा आणि नीरा ओलांडून जेजुरीजवळील बेलसर येथे पोहोचला. शत्रूला आपल्या स्वराज्यात शिरु द्यायच नाही असा विचार करून महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करायचा निर्णय घेतला. त्या प्रमाणे पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर हे युध्दक्षेत्र ठरवण्यात आले. त्यांनी पुरंदर किल्ला सामंजस्याने मिळवून तेथूनच या मोहिमेस तोंड देण्याचे ठरवले. महाराजांच्या या योजनेमुळे फतेहखानाला बेलसरच्या मैदानावर आपला तळ ठोकावा लागला. त्याने महाराजांच्या ताब्यातील सुभानमंगळ जिंकून शिरवळचे ठाणे ताब्यात ठेवायचे ठरवले. फतेहखानाच्या बाळाजी हैबतराव नावाच्या सरदाराने शिरवळ गाठले आणि सुभानमंगळ भुईकोट व शिरवळचे ठाणे जिंकून घेतले. यावेळी बाळाजी हैबतरावाला फारसा प्रतिकार न झाल्याने फतेहखान निर्धास्त झाला. शिरवळचे ठाणे गेले तरी विचलित न होता महाराजांनी पुरंदरवर खानाशी लढण्याची तयारी केली होती. सुमारे तीन हजारांहून अधिक जमाव पुरंदरवर जमा होता. या जमावात बारा मावळचे देशमुख तसेच गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, कावजी मल्हार, भिकाजी चोर व त्याचा भाऊ भैरोजी चोर हि मंडळी होती. या मोहिमेची सर्व सूत्रे महाराजांनी आपल्या हातात ठेवत कावजी मल्हार यांना शिरवळ ठाणे पुन्हा जिंकून घेण्यास रवाना केले. त्याने किल्ल्याचा तट फ़ोडुन किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफ़िल शत्रूवर हल्ला केला. बाळाजी हैबतरावाने कडवा प्रतिकार केला पण महाराजांच्या सैन्यासमोर त्याचा टिकाव लागला नाही व शिरवळ पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आले. मोठी लूट घेऊन शिरवळचा योग्य बंदोबस्त करून कावजी मल्हार पुरंदरवर परतला. महाराजांनी फौजेची एक तुकडी प्रत्यक्ष फतेहखानच्या तळावर म्हणजेच बेलसरवर पाठवली. या तुकडीचे नेतृत्व बहुधा बाजी पासलकरांकडे असावे. या तुकडीसोबत कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे, कावजीमल्हार, बाजीबांदल आणि झेंड्याची तुकडीही होती. या तुकडीने खानाच्या तळावर हल्ला केला. पण विजापुरी फौजेचा प्रतिहल्ला न सोसल्याने मराठा सैन्याला काढता पाय घ्यावा लागला. मराठ्यांचा जमाव फुटला आणि तिथे झालेल्या लढाईत बाजी पासलकर आणि बांदलांचे सुमारे अडीचशे लोक मारले गेले. पण विजापुरी सैन्य फक्त प्रतिहल्ला करून थांबले नाही, तर त्यांनी मराठ्यांचा काही अंतरापर्यंत पाठलागही केला. खळदबेलसरच्या सपाटीवर मराठ्यांनी माघार घेतल्याने फतेहखानाचा आत्मविश्वास दुणावला. त्यानेही वेळ न दवडता पुरंदरवर हल्ला चढवला. एरवी हत्ती घोडे आणि पालखीतून फिरणारे खानाचे सरदार पुरंदरची अवघड चढण पायी चढत होते. महाराजांनी गडावरील तयारीचा अंदाज खानाला येऊ दिला नाही.शत्रू माऱ्याच्या टप्प्यात येताच किल्ल्यावरून दगडधोड्यांचा, पेटत्या पलित्यांचा आणि बाणांचा वर्षाव झाला. त्यातून वाचलेल्या अशरफखान,मिनादशेख, रतनशेख, मताजी घाडगे राजेनिंबाळकर यांच्या विजापुरी सैन्यावर भैरोजीचोर, भिमाजीवाघ, गोदाजीजगताप यांची तुकडी तुटून पडली. या सगळ्यांचे नेतृत्व करणाऱ्या मुसेखानला गोदाजी जगतापाने ठार केले. मुसेखान पडल्यामुळे विजापुरी सैन्य चारीवाटांनी पळून गेले. या पळणाऱ्या सैन्याला स्वतः फतेहखानही रोखू शकला नाही. तो ही विजापूरच्या दिशेने पळत सुटला (१६४८अखेर). पुढे शहाजी राजेंच्या सुटकेसाठी महाराजांनी प्रयत्न केले. आदिलशहाने कोंडाणा किल्ला परत देण्याची अट घातली. महाराज किल्ला परत देण्यास नाखूष होते. सोनोपंत डबीर यांनी महाराजांची समजूत घातली व कोंडाणा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला. त्यानंतर शहाजीराजांची सुटका होऊन त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली (१६४९). अशा रीतीने स्वराज्यावर आलेले पहिले संकट छ. शिवाजीमहाराजांनी यशस्वीरीत्या परतवले. वयाच्या अठराव्या वर्षी महाराजांनी दाखविलेले हे धाडस पाहून सर्वांचेच मनोधैर्य उंचावले. या मोहिमेत मावळातील वतनदार मंडळींनी महाराजांना निष्ठेने साथ दिली. बाजी कान्होजी जेधे याने मराठयांचा पडता ध्वज सांभाळण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली, म्हणून महाराजांनी त्याला सर्जेराव ही पदवी दिली. या लढाईचे सुरस वर्णन कवीं द्रपरमानंद यांनी 'शिवभारत' या काव्यग्रंथातील १३व्या अध्यायात केले आहे. शिवाजी महाराजांची ही पहिली लढाई !!!!
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!