SONGIRI-AAVLAS

TYPE : HILL FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 1510 FEET

GRADE : MEDIUM

महाराष्ट्रात सोनगड/सोनगीर अथवा सोनगिरी या नावाने एकुण पाच किल्ले आहेत. यातील पहिला सोनगीरी धुळ्याचा दुसरा सोनगिरी नाशिकचा, तिसरा सोनगड उर्फ सोनगिरी सिंधुदुर्गचा व उर्वरित दोन रायगड जिल्ह्यात पेण तालुका व कर्जत तालुक्यात आहेत. यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळ असणारा सोनगीरी किल्ला इतिहासाबाबत पुर्णपणे अबोल असुन पायथ्या जवळ असलेल्या आवळस गावामुळे तो आवळसचा किल्ला म्हणुन देखील ओळखला जातो. सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेवर बोरघाटाच्या तोंडाशी असलेला हा किल्ला त्याची भौगोलिक रचना पहाता बहुदा टेहळणीसाठी वापरला केला जात असावा. मुंबई-पुण्याहुन जवळ असलेला हा किल्ला एका दिवसात सहजपणे पहाता येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी कर्जत स्थानकापुढील पळसदरी व जामरुंग या दोन रेल्वे स्थानकातून मार्ग आहे. जामरुंग येथुन जाणारी वाट फारशी वापरात नसल्याने तसेच या वाटेवर अनेक फसव्या ढोरवाटा आहेत ... शिवाय या वाटेवर गडावर जाण्यासाठी वाटाड्या देखील भेटत नाही. त्यामानाने पळसदरी-आवळस-नेवाली या मार्गाने किल्ल्यावर जाणे जास्त सोयीचे आहे. मुंबई- पळसदरी- नेवाली हे अंतर ६७ कि.मी. असुन कर्जतपासुन नेवाली हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव फक्त ७ कि.मी.वर आहे. कर्जत रेल्वे स्थानक पुर्व येथुन तेथे जाण्यासाठी खाजगी रिक्षा आहेत. नेवाली गावातुन समोरच किल्ला नजरेस पडतो. गावकरी या किल्ल्याखालील पठारावर त्यांची गुरे चरायला नेत असल्याने वाट पुर्णपणे मळलेली आहे तरीही गावकऱ्याकडून वाट नीट समजुन घ्यावी. किल्ल्यावर जाणारी वाट थेट किल्ल्यावर न जाता बाजुच्या टेकडावर चढत किल्ल्याच्या पायथ्याशी जाते व तेथुन किल्ल्याच्या टेकाडाला वळसा घालत मागील बाजुने वर चढत जाते. किल्ल्याच्या टेकाडाखाली आल्यावर दोन वाटा लागतात. यातील डावीकडची वाट अस्पष्ट व दाट काटेरी झुडुपांमधून थेट किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट किल्ल्याच्या टेकाडाला वळसा घालत जाते. हि वाट काही ठिकाणी घसाऱ्याची असुन एका बाजुला किल्ल्याचा डोंगर तर दुसऱ्या बाजुस दरी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी हिच योग्य वाट आहे. किल्ल्याखालील पठारावर आल्यावर तेथुन किल्ल्यावर जाण्यासाठी मार्गदर्शक बाण दाखवले आहेत. या वाटेने आपण किल्ला व त्याच्या सोंडेमधील लहानशा खाचेत येतो. हि खाच मानवनिर्मित असुन सोंडेपासुन किल्ला वेगळा करण्यासाठी हि खाच खोदली गेली आहे. नावली गावातुन इथवर येण्यास एक तास पुरेसा होतो. येथे किल्ल्याचा नामशेष झालेला बुरुज असुन या बुरूजा शेजारील उध्वस्त तटबंदीतुन आपण किल्ल्यावर प्रवेश करतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १४१० फुट असुन किल्ल्याचा परीसर साधारण १ एकर आहे. किल्ल्याच्या टेकडावर कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी व काही वास्तुचे तुरळक अवशेष आहेत. गडमाथा फारच चिंचोळा असल्याने गडफेरीस १० मिनिटे पुरेसी होतात. किल्ल्यावरून बोरघाट, इरशाळगड, माथेरान,प्रबळगड, राजमाची,ढाकबहिरी,भिवगड,उल्हासनदी व पळसदरी तलावाचं सुंदर दर्शन होते. सोनगिरी किल्ल्याचा फारसा कुठे उल्लेख येत नसल्याने फारच कमी गिरीमित्र या किल्ल्यास भेट देतात. अपरीचीत अशा या किल्ल्याची इतिहासात कोठेही नोंद आढळत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!