SONGIR

TYPE : HILL FORT

DISTRICT : DHULE

HEIGHT : 900 FEET

GRADE : EASY

नाशिक-आग्रा महामार्गाने धुळे शहराकडे जाताना महामार्गाच्या डावीकडे लळिंग व सोनगीर हे मध्यम उंचीचे दोन किल्ले नजरेस पडतात. यातील धुळे शहराच्या अलीकडे एका लहानशा टेकडीवर वसलेला किल्ला म्हणजे किल्ले सोनगीर. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले सोनगीर गाव हे धुळ्याच्या अलीकडे १८ कि.मी.अंतरावर आग्रा महामार्गावर वसलेले आहे. सोनगीर फाट्यावरून गावात शिरताना चौकात गडावरून आणलेली तोफ आणि दक्षिणोत्तर पसरलेला सोनगीरचा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. गावातील ग्रामपंचायती कार्यालया समोरुन एक छोटीशी वाट गडावर जाते. गडावर जाणारी ही एकमेव वाट असुन गडाच्या पाय-यांची सुरुवात नव्यानेच बांधलेल्या कमानीने होते. सुरुवातीच्या पाय-या या अलीकडील काळात सिमेंटने बांधलेल्या आहेत. या वाटेच्या शेवटी सोनगीर किल्ल्याचा कसाबसा तग धरुन उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. ... पायथ्यापासून या पुर्वाभिमुख दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. या वाटेने चढताना उजव्या हातास गडाची तटबंदी व त्यामध्ये असणारे चौकोनी बुरूज पहायला मिळतात. किल्ल्याच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंच्या बुरूजांची पडझड झाली असुन त्यातील कमान मात्र उभी आहे. दरवाजावर कसलेच नक्षीकाम दिसुन येत नाही. पुर्वी या दरवाजावर एक शिलालेख होता. २७ इंच लांब आणि ९ इंच रुंद असलेला हा शिलालेख निखळुन पडल्याने येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेवून ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेतील ओळी कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर सुंदर नक्षीकाम केलेले चार दगडी स्तंभ व एक थडगे आपल्या नजरेत येते. हे स्तंभ पाहता इथं दरवाजापाशी एखादे देउळ असावे अथवा प्रवेशद्वाराची अतिशय सुंदर रचना केलेली असावी. ते पाहून आपण कातळात खोदून काढलेल्या पायऱ्यांच्या वाटेने वर जाताना डाव्या हातास सतीआसरा देवीचे ठाणे आहे. पुढे माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पंधरा-वीस पायऱ्या चढून आपण गडावर पोहोचतो. पायथ्यापासून अर्ध्या तासात आपण किल्ल्याचा माथा गाठतो. सोनगीरचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असुन रुंदीला १६० फुट तर लांबीने १२०० फुट आहे. माथा बऱ्यापैकी सपाट असुन वर फारशी झाडी नाही. गडमाथ्यावर आपल्याला चुनाविरहीत तटबंदी दिसते. ती छोटे-छोटे दगड एकमेकांवर रचून केलेली असुन बऱ्याच ठिकाणी ढासळलेली आहे. आहे. ही तटबंदी पाहुन गडाच्या मधून जाणाऱ्या पायवाटेने दक्षिण बाजूला असणाऱ्या बुरूजाच्या माथ्यावर जायचे. या बाजूस तट व बुरूज वगळता दुसरे कोणतेही दुर्गअवशेष नाहीत. उत्तरेकडील तटबंदीवर बुरुजांचे अवशेष आपल्याला पहायला मिळतात. या टोकावर काळ्या पाषाणात बांधलेला गोलाकार बुरूज असून त्यात तोफेची तोंडे बाहेर काढण्यासाठी दगडी झरोके आहेत. या वाटेवर पडीक घरांचे अवशेष तसेच साठविण्यासाठी वापरले जाणारे चार बळद (दगडी रांजण) दिसतात. हे रांजण जमिनीच्या पोटात असून त्याच्या शेजारीच गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठी आयताकृती १०० फूट खोल विहीर आहे. विहिरीतील झाडांच्या दाटीमुळे तिची खोली लक्षात येत नाही. आता या विहीरीत थोडसे पाणी असले तरी गड राबता असताना या विहीरीचे पाणी खापराच्या नळ्यांनी गडपायथ्याच्या शिबंदीसाठी नेत असत. या विहिरीला सासू-सुनेची विहीर म्हणतात. या विहीरीतून पाणी काढण्यासाठी अंबाडीच्या दोरासाठी साडेतीन रु. खर्च झाल्याची १८०६-०७ मधील एक नोंद जमाखर्चात आहे. असे सांगितले जाते की शत्रूचा हल्ला झाल्यास पळून जाता यावे यासाठी ह्या विहीरीतून गडाखाली जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग आहे. या विहीरीच्या बाजूला एका पुष्करणीचे अवशेष असून तिच्या चारही बाजूंच्या भिंतीत प्रत्येकी पाच कोनाडे बांधलेले आहेत. पाणी पाझरु नये म्हणून ते चारही बाजूने चुन्याचा गिलावा देऊन सुरक्षीत केलेले आहे. माथ्यावरील पठारावर आज एकही वास्तू नाही. गडावरून पुर्वेला डोंगरगाव धरण, मुंबई- आग्रा तसेच धुळे- शहादा महामार्ग नजरेस पडतात. येथे आपली तासाभराची सोनगीरची गडफेरी पूर्ण होते. इ.स.१८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पहाणी केली त्यावेळी गडावर काही वास्तू असल्याची नोंद त्यांनी केलेली आहे. सोनगीरचा किल्ला पाहून आपण २-३ तासात धुळ्याला परतू शकतो. धुळ्यामध्ये इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन केंद्र असून या ठिकाणी अनेक दुर्मिळ हस्तलिखिते, शिलालेख, सुंदर दगडी मूर्ती व तोफा यांचे संग्रहालय असून सोनगीर भेटीत आपण तेही पाहू शकतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा आग्रा-नाशिक मार्ग मध्ययुगात अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे मध्ययुगात उत्तर महाराष्ट्रातील या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले. सुवर्णगिरी उर्फ सोनगीर किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नसली तरी प्राचीन सुरत - बुर्हा्णपूर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. २५० मध्ये अहिर राजांनी तो जिंकला. त्यानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट व देवगिरीच्या यादवांनी या प्रदेशावर राज्य केले. १२ व्या शतकात येथे यादवांचे राज्य असल्याने त्या राजांपैकी उग्रसेन नावाच्या राजाने हा किल्ला बांधल्याचे मानले जाते. १३-१४ व्या शतकात सोनगीर किल्ल्यावर हिंदू राजाची सत्ता होती. पुढे खानदेशाचा फारूकी घराण्याचा संस्थापक राजा मलिक याने इ.स. १३७० मध्ये सोनगीरवर हल्ला चढवून हिंदू सरदाराकडून हा किल्ला जिंकून घेतला. पुढे फारूकी घराण्याचे राज्य इ.स. १६०१ मध्ये संपुष्टात आले त्यावेळी सोनगीरचा किल्लेदार फौलादखान नावाचा सरदार होता. त्याने बहादूरशहाचा पराभव झाल्याचे पाहताच मोगल सम्राट अकबराचे स्वामित्व मान्य केले त्यामुळे अकबराने त्याला सोनगीरचा किल्लेदार म्हणून कायम ठेवले. हा किल्ला १७५२ पर्यंत मोगलांच्या ताब्यात होता पण याचवर्षी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व त्यावेळी झालेल्या भालकीच्या तहानुसार हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यावेळी बाळाजी बाजीराव पेशव्यांनी याचा ताबा नारोशंकरकडे दिला. १८१८ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा शरण आल्यानंतर या गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला. इतिहासातील अनेक राजवटीचा आणि घटनांचा साक्षीदार असलेला सोनगीरचा किल्ला आज मात्र उपेक्षीत ठरला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!