SONGADH

TYPE : HILL FORT

DISTRICT : TAPI

HEIGHT : 1075 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्राच्या गुजरात सीमा प्रांतात असलेल्या अनेक किल्ल्यांवर मराठयांच्या पाउलखुणा उमटलेल्या आहेत. यात गुजरात-नंदुरबार सीमेवर असलेल्या तापी जिल्ह्यातील सोनगड या मराठमोळ्या किल्ल्याचे नाव प्रामुख्याने येते. बडोदा संस्थानाचे संस्थापक असलेल्या पिलाजीराव गायकवाड यांनी वसवलेला हा किल्ला. या किल्ल्याचे नावच या तालुक्याला दिले गेले आहे. सोनगड हे तालुक्याचे ठिकाण व बऱ्यापैकी मोठे शहर असल्याने ते अनेक शहरांशी थेट जोडले गेले आहे. त्यामुळे वाहतुकीची चांगली सोय आहे. सुरत येथुन सोनगडला जाण्यासाठी सुरत-बारडोली-व्यारा-सोनगड असा गाडीमार्ग असुन हे अंतर ८२ कि.मी.आहे तर महाराष्ट्रातुन सोनगडला जाण्यासाठी नंदुरबार हे जवळचे शहर असुन नंदुरबार-सोनगड हे अंतर ८७ कि.मी.आहे. सोनगड गावात प्रवेश करतानाच गावामागे असलेला हा भव्य किल्ला नजरेस पडतो. किल्ला पाहिल्यावर आपल्याला थोडीफार देवगिरी किल्ल्याची रचना आठवते. ... सोनगड बस स्थानकापासुन किल्ल्याचा पायथा २ कि.मी. अंतरावर असुन तेथवर जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. तेथुन पुढे गडमाथ्यावर जाण्यासाठी वनखात्याने कच्चा रस्ता बांधला असुन केवळ जीपसारखे वाहन या रस्त्याने वर जाते. आपण रस्त्याने न जाता पायवाटेने गडावर निघावे. हा गडावर जाण्याचा मुळमार्ग असुन या वाटेवर काही ठिकाणी दगडी पायऱ्या व बांधीव दगडी पायवाट पहायला मिळते. गडाच्या सोंडेवरून जाणाऱ्या या मार्गाने आपण तुटलेल्या तटबंदीतुन गडाच्या घेऱ्यात प्रवेश करतो. या वाटेच्या उजव्या बाजुस अनेक ठिकाणी गडाची सोंडेवरील तुटलेली तटबंदी पहायला मिळते. हि तटबंदी बालेकिल्ल्याच्या उतारावरील सोंडेच्या मोठया बुरुजास जोडलेली आहे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण बालेकिल्ल्याच्या तटबंदीत बांधलेल्या पहिल्या उत्तराभिमुख दरवाजासमोर पोहोचतो. यानंतर उजवीकडे वळुन गडाचा दुसरा पुर्वाभिमुख दरवाजा आहे. या दोन्ही दरवाजामधील चिंचोळा भाग तटबंदीने बंदीस्त केला असुन याची रचना राजगडच्या पाली दरवाजाच्या आतील भागासारखी आहे. पहिल्या दरवाजाने आत शिरल्यावर २५-३० पायऱ्या चढुन आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजासमोर येतो. हा दरवाजा दोन षटकोनी बुरुजात बांधलेला असुन हे बुरुज दुमजली आहेत. दरवाजाने आत शिरल्यावर या दोन्ही बुरुजात रहाण्याची सोय दिसुन येते. आतील दोन्ही बाजुच्या तटबंदीला लागुन चौथरे असुन पुर्वी हा भाग पुर्णपणे छपराने बंदीस्त केलेला असावा. येथुन पुढे आल्यावर डावीकडे एक दर्गा असुन उजवीकडे नव्याने बांधलेले मंदिर आहे. या मंदीरात एक शिवलिंग असुन तांदळा स्वरूपातील काही देवता आहेत. या मंदिराकडून मुख्य दरवाजा व त्याच्या शेजारील दोन्ही बुरुजाच्या माथ्यावर जाता येते. येथुन पुढे आल्यावर डावीकडे नव्याने बांधलेले महालक्ष्मी दिसते. येथुन पुढे आल्यावर एक वाट डावीकडे खाली उतरताना दिसते तर सरळ जाणाऱ्या वाटेशेजारी अनेक नवीन बांधकामे आहेत. या पोलिस चौकी, रेल्वे वायरलेस केंद्र, वनविभाग यांच्या इमारती आहेत. आपण सरळ न जाता डावीकडे वळावे. येथे तटबंदीजवळ विहिरीसारखे पाण्याचे भूमिगत खांबटाके असुन काही अंतरावर त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या काही ठिकाणी ढासळल्या असल्याने हा मार्ग जाळी लाऊन बंद करण्यात आला आहे. पाणी मात्र पोहऱ्याने काढता येते. येथुन थोडे पुढे आल्यावर गडाच्या दुसऱ्या सोंडेच्या वरील बाजुस बांधलेला मोठा बुरुज आहे.या बुरुजाची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. या बुरुजाखालील सोंडेवर बांधलेली तटबंदी थेट जमिनीवर गेलेली आहे. या बुरूजातून बाहेरील भागात जाण्यासाठी बंदीस्त पायऱ्यांची वाट आहे. या वाटेने किल्ल्याबाहेरील घेऱ्यात जाता येते. या बुरुजाजवळ कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याच्या उजवीकडे दुसरा दर्गा असुन त्यासमोर खंडोबाचे मंदिर आहे. येथुन थोडे पुढे आल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकावर पोहोचतो. येथे तटबंदीजवळ लहान तोंड असलेले एक भुमिगत कोठार असुन आता या कोठाराचे मंदीरात रुपांतर झाले आहे. या कोठाराचे तोंड जमीनीवर असुन यात एकावेळी एकच व्यक्ती प्रवेश करू शकते. या कोठाराजवळ वाडयाची भिंत व चौथरा पहायला मिळतो. गडाचा हा सर्वोच्च माथा असुन या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासुन उंची १०७५ फुट आहे. येथुन पुढे तटबंदीच्या काठाने फेरी मारताना लहानमोठे सहा बुरुज असुन यातील एक बुरुज कधीकाळी तीन मजली असल्याचे दिसुन येते. हि वाट आपल्याला मुख्य दरवाजाच्या अलीकडील भागात घेऊन येते. या ठिकाणी कातळात कोरलेले ३० x ६० फुट आकाराचे मोठे टाके असुन या टाक्याला आतील बाजुने चुन्याचा गिलावा केलेला आहे. टाक्यासमोरील वाट आपल्याला मुख्य दरवाजाजवळ घेऊन येते व आपली बालेकिल्ल्याची गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याखाली पश्चिम आणि दक्षिण दिशेला अनेक दगडाच्या खाणी आहेत. तिथे दगड काढण्यासाठी केलेल्या सुरुंगाच्या स्फोटांमुळे किल्ल्याची तटबंदी मोठया प्रमाणात ढासळत असुन कमकुवत होत आहे. किल्ल्याच्या घेऱ्यातील अवशेष पहायचे असल्यास खांब टाक्याजवळील बुरुजाच्या चोरवाटेने सोंडेवरील तटबंदीवर उतरावे किंवा अर्धा किल्ला उतरल्यावर एक पायवाट उजवीकडे वळते त्या वाटेने घेऱ्याच्या खालील भागात यावे. सुमारे एक कि.मी. परिसरात एका मध्यम उंचीच्या डोंगरावर हा किल्ला बांधला असुन जमीनीकडे उतरत जाणाऱ्या डोंगराच्या दोन सोंडावर तटबंदी बांधलेली आहे. जमिनीवर या दोन्ही सोंडा तटबंदीने एकमेकांना जोडल्या असुन या संपुर्ण तटबंदीची लांबी पावणे दोन कि.मी. आहे. कधीकाळी सोनगड गाव या तटबंदीच्या घेऱ्यातच असावे. या घेऱ्यात पिलाजीराव गायकवाड यांचा सातमजली वाडा व तलाव असुन इतर अनेक अवशेष मोठया प्रमाणात विखुरलेले आहे. सध्या येथे झाडी वाढलेली असल्याने वाडा व तलाव वगळता इतर अवशेष पहाण्यासाठी शोध मोहीम करावी लागते. या तटबंदीत लहानमोठे अनेक बुरुज व दिंडी दरवाजे असुन किल्ल्याच्या जमिनीकडील टोकावर महाकाय गोलाकार बुरुज आहे. या संपुर्ण तटबंदीचा खालील भाग दगडांनी बांधला असुन वरील बांधकाम विटांमध्ये केलेले आहे. तटबंदीच्या या घेऱ्यातुन दोन्ही बाजुची तटबंदी फोडुन उकाई रेल्वेमार्ग नेल्याने घेऱ्याचे दोन भाग झाले आहेत. इ.स.१५३१ मध्ये फारुकी सुलतानांच्या ताब्यात असलेला हा प्रांत १५६० पर्यंत गुजरात सुलतानांच्या ताब्यात व त्यानंतर मुघलांकडे आणि शेवटी १७३० मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. सोनगड किल्ल्याचा इतिहास सुरु होतो तो पेशवेकाळापासुन. सरदार खंडेराव दाभाडे सोबत असलेल्या पिलाजीराव गायकवाड यांना शाहू महाराजांनी सेना सरनोबत ही पदवी देऊन पेशव्यांबरोबर त्यावेळच्या खानदेशातील डांग भागात रवाना केले. त्यावेळेपर्यंत सुरत हे महत्वाचे बंदर असल्याने सुरत-बुरहानपुर हा महत्वाचा मार्ग होता. बंदरात येणारा माल सुरत-सोनगड-नवापुरमार्गे खानदेशात व तेथुन बुऱ्हानपूर व इतरत्र रवाना होत असे. डांग प्रांतातुन जाणारा हा मार्ग घनदाट जंगलाने व्यापलेला होता. पिलाजीराव गायकवाड यांनी १७१९ मध्ये येथील भिल्लांना पराभूत करून सोनगड टेकडी ताब्यात घेतली व येथील भिल्ल आदिवासी लोकांना आपलेसे करून १७२१ मध्ये सोनगड किल्ल्यांची निर्मिती केली. महाराष्ट्राशी संपर्क करणे सोयीचे ठरावे यासाठी त्यांनी सीमेवरील या किल्ल्याला आपले मुख्य ठाणे बनवले. सुरवातीस महाराष्ट्र सीमेवरील सुरक्ष चौकी असे स्वरूप असलेल्या या किल्ल्याला गायकवाड घराण्याचे संस्थापक पिलाजीराव गायकवाड यांनी राजधानीसारखे सजविले व त्याच्या घेऱ्यात आपला सातमजली राजवाडा बांधला. यानंतरच्या काळात गुजरात मधील इतर प्रांत ताब्यात आल्याने त्यांचा पुत्र दमाजीराव गायकवाड यांनी कारभाराच्या सोयीसाठी आपली राजधानी बडोदा येथे स्थलांतरित केली व सोनगड किल्ल्याचे ऐश्वर्य हरवले. सोनगड किल्ला हे मध्ययुगीन मराठा वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!