SINDOLA

TYPE : HILL FORT

DISTRICT : PUNE

HEIGHT : 3695 FEET

GRADE : MEDIUM

इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासाने त्याची नोंद घेतली नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे सिंदोळा किल्ला. मुंबई- पुण्याहून जवळ असलेला माळशेज घाट व हरिश्चंद्रगड यामुळे या भागात पर्यटक तसेच गिरिमित्रांची सतत वर्दळ असते. हरिश्चंद्रगडाला मिळालेल्या वारेमाप प्रसिद्धीमुळे सिंदोळा गडाचे अस्तित्व झाकोळले गेले असुन गिरीमित्रांचे पाय देखील येथे सहजपणे वळत नाही. सतत उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती किल्ल्यांची माहीती देणाऱ्या संकेतस्थळावर देखील सहजतेने सापडत नाही. पुण्याच्या उत्तरेस असलेल्या जुन्नर तालुक्याच्या वायव्येस सिंदोळा किल्ला वसलेला आहे. मुंबई-ठाणे येथुन नगरकडे जाताना माळशेज घाट पार केल्यावर हरिश्चंद्रगडाकडे जाणारा खुबी फाटा आहे. या फाट्याच्या पुढे साधारण १.५ कि.मी. अंतरावर करजाळे गाव आहे. खुबीफाटा ओलांडल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजुस दिसणारा डोंगर म्हणजेच सिंदोळा किल्ला. ... करजाळे गावाकडे जाणाऱ्या फाट्याच्या अलीकडे माउली हॉटेल असुन या हॉटेलच्या मागील बाजुस करजाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराकडून सिंदोळा किल्ल्याला जोडलेल्या डोंगरसोंडेवर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून खाली आलेल्या डोंगरधारेखालील पठारावर पोहोचतो. या पठारावर मढ-पारगाव गावातुन आलेली बैलगाडीची वाट आहे. या वाटेने कोठेही न वळता सिंदोळा किल्ल्याच्या डोंगराच्या दिशेने निघावे. या वाटेने साधारण १० मिनिटे चालत गेल्यावर डावीकडे सोंडेच्या खाली एक पायवाट झाडीत शिरताना दिसते. खुणेसाठी या ठिकाणी दगड रचलेले असुन त्यावर चुना फासलेला आहे. तसेच वाटेवर काही ठिकाणी दिशादर्शक बाण आहेत. झाडीतुन जाणाऱ्या या वाटेने ५-१० मिनीटात आपण किल्ल्याखाली असलेल्या डोंगरसोंडेवर पोहोचतो. पुण्याहुन जुन्नरमार्गे आल्यास मढ-पारगाव गावातुन येणारी वाट याच डोंगर सोंडेवर येते. या वाटेने ५ मिनीटात आपण किल्ल्याच्या अलीकडे असलेल्या कातळटप्प्यावर येतो. या ठिकाणी वाट बनविताना दगड दरवाजाच्या आकारात खोदलेले असुन उजवीकडील दगडात झेंडा रोवण्यासाठी खळगा कोरलेला आहे. हा कातळटप्पा पार करून पुढे आल्यावर आपण सिंदोळा किल्ल्याच्या डोंगराला भिडतो. किल्ल्यावर जाणारी वाट किल्ल्याचा डोंगर उजव्या बाजुस तर दरी डाव्या बाजुस ठेवत पुढे सरकते. या वाटेने थोडे पुढे आल्यावर माथ्यावरुन आलेली घळ दिसते. या घळीच्या तळाशी कातळात कोरलेली चौकोनी गुहा असुन जवळच पाण्याचा झरा आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची हि एकमेव सोय असुन हे पाणी साधारण मार्चपर्यंत वहात असते. ही घळ पार करून तसेच आडवे चालत गेल्यावर आपण डोंगराच्या पश्चिम बाजुस येतो. पावसाळ्यात हि वाट काहीशी अवघड होत असावी. या वाटेने जाताना काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी तुटलेल्या पायऱ्या लागतात. पश्चिमेकडील बाजुस डोंगरावरून येणारी दुसरी घळ असुन या घळीतुनच गडावर जाणारा मार्ग आहे. या घळीत असलेल्या बांधीव पायऱ्या तुटलेल्या असुन कातळात कोरलेल्या पायऱ्या मात्र शिल्लक आहेत. घळीच्या तोंडाशी असलेल्या कातळातील खुणा,पडलेले दगड व झीज झालेली गुहा पहाता कधीकाळी या घळीच्या तोंडावर देखील दरवाजा असण्याची शक्यता आहे. या वाटेने वर आल्यावर समोरच कातळात कोरलेले गणपतीचे शिल्प आहे. या शिल्पाच्या डावीकडे काही अंतरावर मारुतीचे भग्न शिल्प पडलेले आहे. घळीच्या डावीकडील कड्यावर किल्ल्याची तटबंदी असुन उजवीकडे कडा व बुरुजाच्या आधारे बांधलेला किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचा चौथरा व शेजारील बुरुज मात्र शिल्लक आहे. दरवाजाने आत शिरल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला वळसा घालुन गडाच्या माथ्यावर नेते. गडावर फारसा वावर नसल्याने या वाटेवर खुप मोठ्या प्रमाणात रानटी गवत वाढलेले असुन त्यातुन सावधगिरी बाळगत फिरावे लागते. या वाटेने जाताना गडाची घडीव दगडात बांधलेली तटबंदी व त्यातील बुरुज नजरेस पडतात. गडाच्या उत्तर टोकावर एकाशेजारी एक कातळात कोरलेली पाण्याची एकुण सात टाकी आहेत. यात पाच टाक्यांचा समूह असुन दोन टाकी वेगळी कोरलेली आहेत. या दोन टाक्यातील एक टाके कोरडे पडलेले आहे. यातील कोणत्याही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. टाकी पाहुन पुढे जाताना वाटेवर काही घरांचे अवशेष दिसुन येतात. या शिवाय वाटेच्या डाव्या बाजुस उघड्यावरच एक मंदिर आहे. येथे एका खडकावर काही त्रिशुळ उभे केलेले आहेत. येथुन पुढे आल्यावर आपण गडाच्या सर्वोच्च भागात पोहोचतो. गडाचा निमुळता माथा समुद्रसपाटीपासून ३६९५ फुट उंचावर असुन दक्षिणोत्तर ३ एकरवर पसरलेला आहे. गड माथ्यावरुन हडसर, चावंड, शिवनेरी, हरिश्चंद्रगड, निमगिरी,हनुमंतगड हे किल्ले तसेच माळशेज घाटाखालील प्रदेश नजरेस पडतो. गडाचा माथा फारच लहान असल्याने संपुर्ण गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. आल्यावाटेने खाली उतरून कोरलेल्या गणेश मुर्तीजवळ पोहोचल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. सिंदोळा किल्ल्याची भटकंती अंगातील रग जिरवणारी असुन आपल्याला एक दुर्लक्षीत किल्ला पाहिल्याचे समाधान देउन जाते. सिंदोळा किल्ल्याचा इतिहासातील ओळख बुजलेली असुन मराठयांनी इ.स.१६७०-७१ दरम्यान चावंड,हडसर, जिवधन या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील ताब्यात घेतला असावा. त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात मोगलांच्या ताब्यात गेलेला हा गड त्यांच्या वतीने जव्हार संस्थानाच्या ताब्यात होता. पेशवेकाळात इ.स.१७४४-४५ दरम्यान मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!