SINDKHEDA

TYPE : GADHI

DISTRICT : DHULE

HEIGHT : 0

GRADE : EASY

खानदेश प्रांत साडे बारा रावलांचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी, परमार, प्रतिहार अशी वेगवेगळी कुळे आहेत. हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा ८.लामकानी ९.चौगाव १०.हातमोइदा ११.रनाळे १२.मांजरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. यातील आष्टे, लांबोळा, चौगाव, हटमोईदा या ४ गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या आहेत तर उरलेल्या ५ गढी त्यांचे अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आहेत. यातील ४ गढी मात्र आजही त्यांच्या मूळ रुपात शिल्लक आहेत. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत आहेत. स्थानिकांची उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. सिंदखेडा गढी यापैकी एक आहे. ... आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या गढीची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व गढीचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. सिंदखेडा गढी आजही तिच्या मूळ स्वरुपात असली तरी मोठया प्रमाणात उध्वस्त झाली आहे. अगदी अलीकडील काळापर्यंत या गढीत राहणारे विजयसिंह रावळ आणि परीवार गढी जीर्ण झाल्याने गढीच्या खालील भागात घरे बांधुन तेथे राहण्यास गेल्याने गढी ओस पडली आहे. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा गढी हि सिंदखेडा या तालुक्याच्या ठिकाणी धुळे शहरापासुन ४५ कि.मी. अंतरावर आहे. सिंदखेडा शहरात स्थानिकांना परिचित असलेली हि गढी बुराई नदीच्या पश्चिम तिरावर असुन अलीकडील काळात या गढीची मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे. या गढीचे वैशिष्ट म्हणजे या गढीला दोन मुख्य दरवाजे आहेत. यातील एक दरवाजा दोन बुरुजामध्ये तर एक दरवाजा एका बुरुजाच्या आधारे बांधलेला आहे. दोन बुरुजात बांधलेला दरवाजा हा कचेरीच्या कामासाठी तर दुसरा दरवाजा हा खासगी वापरासाठी असावा. गढीच्या तटबंदीत एकुण सहा बुरुज असुन गढीच्या उत्तराभिमुख मुख्य दरवाजाला लहान दिंडी दरवाजा आहे. हा मुख्य दरवाजा त्याची लाकडी चौकट व कमानीसह आजही सुस्थितीत आहे. या दरवाजा समोर भैरवाची मुर्ती असुन या मुर्तीवरील तटबंदीत एक शिलालेख पहायला मिळतो. गढीवर असे एकुण ३ शिलालेख असुन दुसरा शिलालेख दुसऱ्या दरवाजासमोर व तिसरा शिलालेख दुसऱ्या दरवाजाबाहेरील विहिरीत पहायला मिळतो. कचेरीच्या कामासाठी असलेला हा दरवाजा सध्या बंद असुन तटबंदीला वळसा घालुन दुसऱ्या दरवाजाने गढीत प्रवेश करता येतो. पुर्वाभिमुख असलेल्या या दरवाजात एक विहीर असुन तटावरून या विहीरीतील पाणी काढण्याची सोय केलेली आही. विहिरीतच आपल्याला दुसरा शिलालेख पहायला मिळतो. दरवाजाच्या उजव्या बाजुला एक बुरुज असुन तटाबाहेर काही अंतरावर दुसरा बुरुज आहे. या बुरुजावर एक मुस्लीम समाधीस्थळ आहे. गढीची जमीनीकडील १५-२० फुट उंचीची तटबंदी आजही सुस्थितीत असुन नदीकडील तटबंदी काही प्रमाणात कोसळली आहे. दरवाजा समोर असणारा शिलालेख या नदीकडील तटबंदीच्या बांधकामातील आहे. तटबंदीचा फांजीपर्यंतचा भाग अघडीव दगडांनी बांधलेला असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. गढीचा अंतर्गत परीसर अर्धा एकर असुन आतील भागात मोठया प्रमाणात वास्तु अवशेष पहायला मिळतात. आतील भागात असलेले बांधकाम पुर्णपणे कोसळलेले असुन काही भिंती व लाकडी वासे शिल्लक आहेत. यात एका भिंतीवर नैसर्गीक रंगाने रेखाटलेली देवदेवतांची भित्तीचित्रे पहायला मिळतात. येथे आपले गढीदर्शन पूर्ण होते. संपुर्ण गढी व परीसर पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ल्यातील बुरुजावरून बुराई नदीचे दूरवर पसरलेले पात्र व लांबवरचा प्रदेश दिसुन येती. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर राजपुतांची २४ कुळे अभयसिंह रावल यांच्या नेतृत्वाखाली मांडूच्या दिशेने गेली. नंतरच्या काळात रावळाचे परमार कुळातील एक महालकरी दुर्जनसिंह रावळ यांनी बुराई नदीकाठी असलेल्या कोळी शासकांवर हल्ला करून हा भाग आपल्या ताब्यात घेतला. येथे तापी नदीकाठी त्यांनी विजयगड नावाची गढी बांधली व पाटण गाव वसवून आशापुरा देवीचे मंदिर बांधले. सिंदखेडा वतनाअंतर्गत ५५ गावे या रावळाच्या ताब्यात होती. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी या रावलांचे अधिकारात त्या सत्ताधीशांनी कोणतेच बदल केले नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!